पिंडदान
पिंडदान
नीरजाच्या आईवडिलांना आता नीरजाच्या लग्नाची खूप काळजी लागली होती.
तिचं नुकतच graduatio पूर्ण झालं होतं. नीरजाला स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न करायचं नव्हतं पण तिच्या आईवडिलांना एका खूप चांगल्या स्थळाची माहिती मिळाली होती. म्हणून ते घाई करत होते.
एका मध्यस्थाने ते स्थळ आणलं होतं... एकुलता एक मुलगा निर्व्यसनी, मुलाचे आईवडील शिक्षक आणि खूप सारी प्रॉपर्टी. असं ते स्थळ होतं. घराणं सुशिक्षित तर होतंच पण ते आपल्या सुनेला नौकरी देखील करू देणार होते.त्यामुळे हे स्थळ नीरजाच्या आईवडिलांना हातचे जाऊ द्यायचे नव्हते. त्या मुलाचे नाव अनिल तर त्याच्या वडिलांचे नाव सुभाषराव होते.
नीरजाच्या आईवडिलांनी लग्नासाठी पुढाकार घेतला... त्यांनी अनिलसाठी सुभाषरावांकडे मागणी घातली. सुभाषरावांनादेखील नीरजाची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी लागलीच त्या स्थळाविषयी अनिलला सुचवले.. त्याला म्हणाले तुला जर योग्य वाटत असेल तर आपण लवकरात लवकर हे स्थळ बघू.. त्या स्थळाविषयी सगळी चांगली माहिती मिळाली आहे.
मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. अनिलला पाहताक्षणीच नीरजा पसंत पडली.नीरजालाही तो मनोमन आवडला होता. सुभाषराव अधुनिक विचारांचे होते. त्यांनी स्वतः मुलगी आणि नारळ इतकीच मागणी केली आणि लग्न देखील अर्ध्या अर्ध्या खर्चाने करायचे ठरले.
अनिल आणि नीरजाचे लग्न अगदीच थाटामाटात पार पडले.. लग्नातही कुणाचे रुसवे फुगवे नव्हते. अगदीच खेळीमेळीचे वातावरण होते. अनिल आणि नीरजाचा आता सुखाचा संसार सुरु झाला होता..ते दोघेही एकमेकांसोबत खूप खूष होते. दोघेही जोडीदाराच्या बाबतीत स्वतःला खूप नशीबवान समजायचे... नीरजाची सासूदेखील खूप समजूतदार होती.. नीरजाला ती घरातील प्रत्येक गोष्ट समजून सांगत असे.. त्यामुळे नवीन घरात ती लवकरच रुळली होती.. आता लग्न होऊन महिना झाला होता.
श्रावण महिना आला. अनिल आणि नीरजाने श्रावणात ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग करायचे ठरवले..त्यासाठी ट्रॅव्हल्सनी जायचे ठरले.. त्यांनी बुकिंग केली. ठरल्या दिवशी दोघेही ट्रॅव्हल्सने ओंकारेश्वरला निघाले.. आणि रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घात केला.. ट्रॅव्हल्सला अपघात झाला. अपघातात अनिल ऑन द स्पॉट गेला आणि नीरजा थोडी बाजूला फेकल्या गेल्यामुळे वाचली. पूर्ण घरावर दुःखाचा डोंगर कोसळला.. नीरजा तर पार कोसळली.. तिला वाटायचं आपण तरी का वाचलो..
अनिलचे सगळे क्रियाकर्म चालू असताना सुभाषरावांनी नीरजाचे मंगळसूत्र तिला काढू दिले नाही.. सांगितले मला तुला बिना मंगळसूत्राचे बघायचे नाही... आणि स्वतःच्या मेहुणीच्या मुलाला... प्रतीकला नीरजासाठी मागणी घातली.
घरातील बाकी सर्वजण ते बघून अवाक झाले होते. प्रतीकही जरा गडबडला.. पण लवकरच त्याने होकार कळवला. या सगळ्या प्रकरणाने नीरजा मात्र पार गोंधळून गेली होती.. मग निरजाने काही ठरण्याआधी प्रतीकशी बोलण्याची परवानगी सुभाषरावांना मागितली.
मग नीरजा प्रतीकशी बोलायला लागली... हे बघ तू कुठलाही निर्णय घेण्याची घाई करू नकोस.. आपल्या जीवनसाथी विषयी प्रत्येकाचे काहीना काही स्वप्न असते. तसे तुझे ही असेल ना. आणि दया म्हणून जर निर्णय घेत असशील तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. बघ विचार कर.. अख्ख आयुष्य काढायचं आहे.. हे काही सोपे नाही..
त्यावर प्रतीक म्हणाला हे सगळं इतक्या घाईत होत आहे. सुरुवातीला मी देखील पार गोंधळून गेलो होतो.. पण मी देखील आज ना उदया लग्न करणारच होतो ना.. आणि माझं आधी काही ठरलेलं नाही.. त्यामुळे तुझ्यासारखी गुणी मुलगी मी शोधणार... हा इतक्या घाईत माझं आणि तुझं मन या गोष्टींना मान्यता देणार नाही.. पण मी शाश्वती देतो की जबाबदारी म्हणून केलेले लग्न मी जीवापाड प्रेम करून निभावेल.. फक्त या धक्क्यांमधून सावरायला थोडा वेळ लागेल..
प्रतीकच्या या बोलण्याने नीरजा एकदम निरुत्तर झाली. अनिलच्या दहाव्याच्या दिवशी पिंडदान करून सुभाषरावांनी प्रतीक आणि नीरजाचे लग्न लावून दिले.. इकडे मंगलाष्टक पडत होते आणि आपल्या मुलाच्या पिंडदानाच्या दिवशी सुभाषरावांनी सुनेचे कन्यादान केले आणि त्या क्षणाला पिंडीला काकस्पर्श झाला.जणू काही अनिलला देखील सुभाषरावांचा तो निर्णय आनंदाने मान्य झाला होता.
आता नीरजा आणि प्रतीकचा पुन्हा एकदा सुखाचा संसार सुरु झाला.