Dr.Smita Datar

Others

2.0  

Dr.Smita Datar

Others

पिंडदान

पिंडदान

6 mins
16.2K


मळकट , तपकिरी रंगाची कॉटनची साडी बरी. साधीशीच दिसते. कपाटातून साडीची घडी काढताना मैथिली पुन्हा एकदा भिंती वरच्या घड्याळात डोकावली . स्टेशन गाठायला रिक्षाने दहा मिनिट , ट्रेनमध्ये पाउण तास ,दादर स्टेशन वरून पोर्तुगीज चर्च ची बस मिळून पोहचायला वीस मिनिटे . बरोबर दोन च्या आसपास पोहचेन. पटकन फोटोला नमस्कार, ताटावर बसल्यासारखे करीन आणि निघेन लगेच. नाहीतरी तेराव्याला पोटभर जेवायचे नसत . पियू ला ३.३० ला तिच्या ऑफिस बाहेर भेटेन. मग एकत्रच घरी जाऊ.

      मैथिली साडी नेसता नेसता वेळेचा हिशोब करायला लागली. उगीच नातेवाईकांमधे रेंगाळायला आवडायचे नाही तिला. कशाला या बायकांना बिन कामाच्या चौकश्या कुणास ठाऊक ? नाही तरी तिथी वांर , कर्मकांडावरचा विश्वास केव्हाच उडालाय माझा. पण सतीश दादा साठी जायला हव. खरतर मावस भाऊ, पण कधीही हाकेला ओ देतो. मालू मावशीचा भोचकपणा अंशाने सुद्धा सतीश दादात नाही. ह ..मालू मावशी....सुटली बिचारी त्या अल्झायमर मधून आणि घरातली सगळीच सुटली. लोकलच्या गतीन मैथिलीचे विचार धडधडत होते.

       जुनाट चाळीच्या लाकडी पायऱ्या चढताना होमाचा तुपकट, धुरकट वास तिच्या नाकाला जाणवला. छान वाटला . लहानपणापासूनचे संस्कार नि काय. उदबत्ती धुपाच्या वासाने प्रसन्न वाटते. होमाच्या धुराने पवित्रता दाटते , हे खर की मेंदूच ट्युनिंग फक्त? चेहरा शक्य तितका गंभीर करून मैथिलीने बाहेरच्या चपलांच्या ढिगाऱ्यात आपली पण चप्पल ढकलली . पर्स सावरत, अंग चोरत पुढच्या खोलीतल्या बायकांच्या जत्थ्यात ती दाखल झाली.

        तिच्या अपेक्षेपेक्षा फारच संथ होती मंडळी. अजून श्राद्धाचे विधीच चालले होते. आपलं टाईम टेबल कोलमडल्याच चेहऱ्यावर न दाखवता तिन पियू ला पटकन एक वोट्स अप मेसेज टाईपला .... मी इथेच अडकणार. तरी ३ ला अपडेट देते.....सेंड ‘च्या बाणावर बोट दाबताच , श्राद्धाचे विधी करणाऱ्या सतीश दादाशी तिची नजरानजर झाली. मान थोडीशी हलवत त्याने तिची नोंद घेतल्याने तिला बर वाटलं. इतक्यात भटजीनी त्याला दटावल्याने त्याने पुढ्यातल्या पांढऱ्या शुभ्र भाताच्या गोळ्यांवर लक्ष केंद्रीत केलं . ओह...सॉरी ,पिंड म्हणायचं नाही का..तिने मनातल्या मनात जीभ चावली.

         भटजींनी विचारलं , आईच्या सासूबाईंचे नाव काय ? मोठी वाहिनी मदतीला धावली, मंगला . सतीश दादाने एका पिंडावर काळे तीळ आणि दर्भाच्या काड्या वहिल्या. त्यांच्या सासूबाईंचं ? नव्वदीच्या घरातल्या, जुन्या पिढीतील एकमेव शिल्लक उरलेल्या आजीनी आपली स्मरणशक्ती शाबूत असल्याचा पुरावा दिला... भाsगीsरsथी ss  गुरुजींनी भागीरथी नामक पिंडावर काळे तीळ , दर्भ वाहण्याचे फर्मान सोडलं . आणि त्यांच्या सासूबाईं चं नाव ? आता आली का पंचाईत? आता कोणाला विचारणार? कुलवृतांत शोधण्यासाठी एकच गडबड उडाली. आणि धूळ खात पडलेल्या कुलवृतांतातून भागीरथी आजीची सासू सापडली... 'पार्वती' आणि इकडे श्राद्धाच्या दिवशी सुद्धा चाळीशीच्या जावा जावांमध्ये खसखस पिकली. अरे देवा, म्हणजे नंतर पण सासूबाईंचीच सोबत की काय ? जावा जावा नैवेद्याची पाने वाढताना नुसत्या खुसखुसत होत्या. आणि मैथिलीच्या मनात तिच्या सासू बरोबरच्या नात्याची रीळे उलगडायला लागली.

          मैथिली एम ए झालेली , चार बहिणीतली मोठी, चाळीतल घर , सामान्य रंगरूप असलेली, साधी, सोज्वळ मुलगी. पराग ग्राज्युएट झालेला, वडिलांच्या जागेवर p w d त चिकटलेला. आई निवृत्त शिक्षिका. लहानसा का होईना ,पण उपनगरात flat असलेला. वडील नुकतेच वारलेले. सासूबाईंना आणि पराग ला पण मैथिली आवडली. मैथिलीला पराग बरोबरच किवा थोडा जास्त संडास बाथरूम आत असलेला flat आवडला. एका सामान्य घरातून मैथिली दुसऱ्या सामान्य घरात आली. तिन नोकरी न करता घर सांभाळाव आणि आईला आराम द्यावा असं परागच आणि सासूबाईंचं पण मत होत . तक्रार करायची मैथिलीला मुभा आणि सवय दोन्ही नव्हती. संसार सुरु होता. लग्नाआधी बऱ्या वाटलेल्या सासूबाईंच मन मात्र मैथिली जिंकू शकत नव्हती. त्यांना सारखं काहीतरी कमीच पडायचं. सारखीच धुसफूस , तिला घालून पाडून बोलण . किती गम्मत आहे नाही, सासू सुना दोघी नव्या भूमिकेतल्या , दोन वेगळ्या घरातून आलेल्या, पण एकाच माणसावर मनापासून प्रेम करणाऱ्या बायका. पण म्हणूनच लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच या नात्यांची घुसळण सुरु होते का ? मनासारखं लोणी निघालं तर ठीक , नाहीतर नासकावणी . कढी साठी ताक बाजूला करताना, मैथिलीने विचार पण ताकातल्या रवी सारखे बाजूला ठेवले. आज परागच्या आवडीचं कोथिंबीर लावलेलं फोडणीच ताक करायचं होत.

          पराग.......त्याच्या आठवणीने सुद्धा मैथिली शहारली.असच असत का सगळ्या नवरा बायको च नात ? लग्नाच्या पहिल्या रात्री पासून मैथिली ला हा प्रश्न छळत होता. मधुचंद्राला दिवसेंदिवस तिचे कपडे लपवून ठेवण, तिच्या अंगावर तू माझी आहेस असं जिकडे तिकडे लिहिणे, असा असतो मधुचंद्र . रात्री, दिवसा परागला सतत मैथिली हवी असायची.एवढ्याश्या वन रूम किचन flat मध्ये , लाकडी पार्टीशन ची बेडरूम , मैथिली ला मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं.पण परागला कसलीच फिकीर नसायची.त्याचा नवथरपणा तिन कधी अनुभवलाच नाही.उलट तो सराईतासारखा , पाळी च्या वेळी पण... तिच्या मनाशी तर त्याचा काडीमोडच होता. तिची मानसिक कुचंबणा , सासूबाईंचा त्रागा, तिच्या मनात घोळ णारा ट्युशन्स चा विचार याच्याशी त्याचा सम्बधच नव्हता.

         सासूबाईंनी त्याला 'बाईलवेडा' ठरवून त्याच माप ही मैथिली च्या च पदरात टाकल. पियुच्या वेळी बाळंतपणाला सुद्धा पराग तिला माहेरी पाठवायला तयार नव्हता. सासूबाईंनी च खर्च नको म्हणून तिला हॉस्पिटल मधून माहेरी जायला सांगितलं . पण पराग जेमतेम पंधरा दिवसात तिला घरी घेऊन आला. आणि डिलिवरी च्या पंधराव्या दिवसापासून परत...त्याच्या या भुकेची एव्हाना मैथिलीला कल्पना आली होती. गेले पंधरा दिवसही हा गप्प बसला नसेल. तिला ओकारीचा उमासा आला.

       चार चौघींसारख नवऱ्याने आपल्याशी गप्पा माराव्या , मुलीचं कौतुक करावं , तिला जीव लावावा , या अपेक्षा मैथिलीन कधीच मारून टाकल्या होत्या. आपलाच दाम खोटा असल्याची एव्हाना सासूबाईंना ही जाणीव झाली होती. सून सोशिक आणि समंजस असल्याचही त्यांना पटलं होत. तिचं हे वाचा नसलेलं दु:ख त्यांनाही अंतर्मुख करत होत. . नशीब, अजून पोराने समाजात धिंडवडे काढले नव्हते. आजूबाजूच्या लोकांना समजेल, असं मैथिलीही कधी वागली नव्हती , याचेही मनोमन कौतुक वाटायचं त्यांना. मैथिलीशी त्यांचा सुसंवाद आणि काळजी दोन्हीही हळूहळू वाढत होती.

        एके दिवशी मैथिली भाजी घेऊन घामाघूम होउन बिल्डिंग मध्ये शिरत होती आणि दुसऱ्या मजल्यावरून येणारा सासूबाईंचा आभाळ फाडणारा आवाज तिला खाली ऐकू आला. “ आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जा पराग, मैथिली आणि पियू ला माझ्या पेन्शन वर पोसेन मी." मैथिली धाड धाड जिना चढून वर गेली.सगळ्या flat चे दरवाजे उघडे होते. लोकांच्या नजरा टाळत ती घरात शिरली. तीन वर्षाची पियू कोपऱ्यात रडत उभी होती. केस विस्कटलेले, फ्रॉक ला रक्ताचे डाग, पायावरून रक्ताचा ओघळ. सासूबाई पराग च सामान दाराबाहेर फेकत होत्या. पराग त्यांची मनधरणी करत काहीतरी पुटपुटत होता. आई ला बघून पियू तिला घट्ट बिलगली...सासूबाई मैथिलीला धरून उरी फुटल्या...." आज मी पियुला अंघोळ घालतो म्हणाला ग....नीच..पशु..” मैथिली सुन्न ,बधीर झालेली. रडूही फुटेना तिला. तिने फक्त एकवार आरपार पराग कडे पाहिलं. त्याला थोबाडीत देण्या इतकाही स्पर्श करावासा वाटेना तिला. पियुला छातीशी कवटाळत एवढेच शब्द उमटले तिचे..."यापुढे मी नाही सहन करू शकत सासूबाई.मी नाही राहणार इथं .” त्या अवस्थेत ही सासूबाईंनी अडवलं तिला. “मैथिली तू कुठेही जाणार नाहीयेस. याला घराबाहेर काढणारे मी.”

           सासूबाईंनी पुन्हा एकदा कंबर कसली. रीतसर पोलीस कम्प्लेंट केली. मैथिली शी बोलून पराग ला सगळ्यांच्या आयुष्यातून कायमच दूर केलं. पियुला या जखमा आठवण्याचा प्रश्नच नव्हता. आता सासूबाई , मैथिली आणि पियू असा नवा संसार सुरु झाला. अधिक प्रेमळ , अधिक सुसंवाद असलेला, अधिक सुखी. सासूबाईंनी पियू च खाण पिण , अभ्यास, शाळा क्लास च्या वेळा...सगळी जबाबदारी घेतली. मैथिली ची नोकरी सुरु झाली. सासूबाईनी राहते घर , बँकेतली शिल्लक सगळ मैथिली च्या नावावर केलं. विमा पोलीसीत आणि आयुष्यातही मैथिली आणि पियू त्यांच्या नोमिनी झाल्या. पराग च्या आठवणींच कधी भांडवल नाही केले त्यांनी. पियुची दहावी बारावी , ग्रेज्यूएशन सगळे पार पाडलं. मैथिलीला कणखर बनवलं. समाजाचे प्रश्न टाळू नकोस मैथिली, तरच त्यांना उत्तर आपोआप मिळेल, हा त्यांचा मंत्र तिने कायम जपला आणि त्यांनाही जीवापाड जपलं.

           त्याचं मैथिली ला सांगणे होते, माझे दिवस वार काही करू नकोस मी गेल्यावर. आता काय ते सुखात राहू आपण. उलट तुम्हाला आणि मला कंटाळा येई पर्यंत मी जगतेय असं वाटलं तर वृद्धाश्रमात जाईन मी. सोय म्हणून लहान मुलांना नाही का पाळणाघरात ठेवत आपण. पण तशी वेळच आली नाही. एका सकाळी मैथिली चहासाठी उठवायला गेली तर सासूबाई आधीच उठून निघून गेल्या होत्या कायमच्या.

            “ सगळ्यांनी पिंडावर वाहून घ्या.” भटजींच्या आवाजाने मैथिली भानावर आली. कुठल्याश्या एका पिंडावर तिन दर्भाच्या काड्या वहिल्या आणि मनोभावे नाव घेतलं तिच्या सासूबाईंचं . 

                                                         

        


Rate this content
Log in