Rahul Shinde

Others

3  

Rahul Shinde

Others

पिल्लू

पिल्लू

3 mins
2.3K


थंडीचा ऋतू चालू होता.एका स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाहून रात्री आठ वाजता शहरातल्या माळावरून, मित्रासोबत मोटारसायकलवरून घराकडे परतत होतो.थंडी आणि त्यातूनच येणाऱ्या वाऱ्यामुळे हुडहुडी भरली होती.इतक्यात वाटेवर आम्हाला कुत्र्याचं पिल्लू दिसलं,दहा ते पंधरा दिवसांतच जन्मलेलं असावं. तिथे रस्त्यावर लाइट नव्हत्या आणि ते पिल्लू मध्यभागी रस्त्यावर बिथरलेल्या अवस्थेत चालत होतं, पाहताना लक्षात आलं ते एका पायानं लंगडे आहे. रस्त्याच्या मध्यभागी चालताना अंधारात कुठल्याही गाडीखाली ते सापडलं असतं,आम्ही गाडी थांबवून त्या पिल्लाला उचलून रस्त्याच्या कडेला सोडलं.

'बिचाऱ्याला कोणीतरी गावातून इकडे आणून सोडलं आहे.एका पायाने लंगडे असल्याने नीट चालताही येत नाही याला.' त्याला रस्त्याच्या बाजूला सोडताना माझा मित्र मला म्हणाला आणि आम्ही गाडीजवळ आलो.गाडी चालू केली तर ते पिल्लू आमच्या गाडीच्या मागेच यायला लागले.आम्ही दोघेही अस्वस्थ झालो,

"ते पुन्हा आपल्या मागे येताना मध्यरस्त्यावर येत आहे, कोणत्या तरी गाडीखाली सापडायचे...आपण याला गावात नेऊन वस्तीत सोडायचे का?' आम्ही दोघांनीही ठरवले आणि त्याला उचलून गाडीवर घेतले.माझा मित्र त्याला धरून मागे बसला आणि मी गाडी चालवत होतो.त्याला धरून बसताना ते थंडीने थरथर कापत होते.

'याला आपण आधी खायला देऊया आणि मग गावात नेऊन सोडूया..काय माहित कधीपासून उपाशी असेल.' मी मित्राला म्हणालो आणि जाताना आम्ही बिस्कीटपूडा घेतला.

'कोणी आणि का याला एकट्यालाच इकडे माळावर आणून टाकले असेल? ते आधीच लंगडे होते, की इकडे टाकल्यावर त्याचा पाय कुठल्या गाडीखाली आला?किमान थोडं मोठं होईपर्यंत तरी त्याला टाकून द्यायला नव्हते पाहिजे..' आमच्या दोघांच्या एकमेकांसोबत चर्चा चालू होत्या.

काही अंतर पुढे गेल्यावर आम्हाला गाव आणि वस्ती लागली,तिथे वाहनांची वर्दळ कमी होती,शिवाय स्ट्रीट लाइट असल्यामुळे पिल्लाला तिथे फारसा धोका नव्हता.आम्ही त्या ठिकाणी गाडी थांबवली,पिल्लाला रस्त्याच्या कडेला नेऊन बिस्कीटपूडा फोडला आणि त्यातून त्याला बिस्किटं खायला दिली,ते बिस्किटं खाऊ लागले आणि आम्ही गाडीजवळ येऊन स्टार्टर मारू लागलो, पण गाडीचा आवाज ऐकू येताच त्यानं बिस्किटं खायची तशीच सोडली आणि तो आमच्या जवळ आला.आम्ही गाडी बंद केली आणि परत त्याला बिसकटसजवळ नेले,तो पुन्हा बिस्किटं खाऊ लागला ..पण आम्ही तिथून गाडीकडे जाऊन गाडी चालू केली की तो पळत आमच्याजवळ यायचा.त्याला भूक लागली होती, पण त्याहीपेक्षा जास्त आमचा लळा लागला होता,त्याला आमच्यासोबत यायचे होते.त्याला घेऊन जाणे आम्हा दोघांनाही शक्य नव्हते,पण आम्ही त्याला सुरक्षित ठिकाणी सोडले होते. गाडीच्या आवाजाने ते आमच्याकडे येतंय म्हणून आम्ही ते बिस्किटं खात असतानाच गाडी चालू न करता हाताने ढकलत पुढे नेली,आणि नंतर काही अंतरावर जाऊन चालू केली…दोघेही अस्वस्थ होतो,मागे वळून पाहण्याचं धाडस होत नव्हतं,पण त्यावाचून राहवतही नव्हतं. मागं वळून पहिलं तेव्हा ते बिस्कीट खायचं सोडून आमच्या गाडीकडे बघून शक्य तितक्या आवाजात 'कुई कुई' ओरडत होतं.

'मला तुमच्याबरोबर घेऊन चला' हे त्याचे संकेत आम्हा दोघांनाही कळत होते...जड अंतःकरणाने आम्ही तिथून निघालो...

'देवा, आमच्या परीने जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही केलं, आता पुढची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे.. तू निर्माण केलेल्या सृष्टीत अश्या उणिवा का?किती लेकरांची अशी इतक्या लहानपणी त्यांच्या आईपासून ताटातूट करतोस..त्या वस्तीत त्याला घर मिळू दे.' मनात प्रार्थना चालू होती.

काही अंतरावर जाऊन मी माझ्या मित्राला बस स्टॉप जवळ सोडले,त्याला गावी जाण्यासाठी पुढची बस पकडायची होती.आणि तिथून माझे घर पुढे किलोमीटरवर होते,पण मला पुन्हा त्या पिल्लाचे काय झाले हे पाहू वाटत होते..मी घराकडच्या वाटेकडे न जाता परत पिल्लाला जिथे सोडले तिथे गेलो.

तिथे पिल्लू नव्हते,आजूबाजूलाही दिसले नाही. बिस्किटं बऱ्यापैकी खाऊन संपलेली होती.

"त्या पिल्लाला कुठलेतरी घर मिळाले, नाहीतर ज्याला कुत्रे पाळायचे होते असा वाटसरू त्याला घेऊन गेला' असे माझे एक मन विश्वासाने म्हणत होते आणि दुसऱ्या बाजूला माझे कितीतरी प्रश्न अनुत्तरित राहिले होते.मी तसाच पुढे घराच्या रस्त्याने निघालो.

आजही ती घटना आठवली तरी त्या पिलाला सोडून जाताना त्याने केलेला आवाज आठवतो,मग त्याला एकदा पाहावेसे वाटते... पण आता ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात, त्याला तसेच स्वीकारावे लागते.

’जयांना ना कोणी जगती

सदा ते अंतरी रडती

तया जाऊन सुखवावे,

जगाला प्रेम अर्पावे’

साने गुरुजींच्या या ओळींप्रमाणे इतके मात्र आपण करू शकतो.


Rate this content
Log in