Priti Dabade

Children Stories Fantasy

3  

Priti Dabade

Children Stories Fantasy

फुलदाणी

फुलदाणी

2 mins
12.1K


पिनू एक हुशार मुलगी होती. गाल गोबरे आणि गोरीपान. ओठ नाजूक. लालचुटुक. बघितलं तिला की कोणीही म्हणायचे, "किती गोड आहे हो पिनू." पिनू लाजायची आणि लपून बसायची.


बागेत जायला खूप आवडायचं तिला. मनसोक्त बोलायची ती फुलांबरोबर. खूप आवडायची तिला फुले आणि त्यावर बसणारी फुलपाखरे. नाना प्रकारच्या फुलांचे निरीक्षण करायची. कोणाचा रंग, तर कोणाच्या पाकळ्यांची स्तुती करायची. असा तिच्या आईबरोबर तिचा नित्यक्रम असायचा. 


एकदा अशीच आईबरोबर ती बागेत गेली. बाकीचे खेळ खेळून झाल्यावर वळली फुलांकडे. पिनू चकीत होऊन म्हणाली, "आई, हे बघ किती छान फूल आहे हे. नवीनच आहे. बघ, किती गोड आहे. पहिल्यांदाच बघत आहोत ना आपण ही फुले." पिनूची बडबड संपता संपेना. पिनूची आई तिच्याकडे बघून गालात हसली. तिलाही कुतूहल वाटले त्या फुलांचे. फुले घरी घेऊन जाऊया ना, असा पिनूने हट्ट केला.


"अगं, पिनू नको असा हट्ट." पण तिने नाद सोडला नाही. ती फुलांचा गुच्छ घेऊन घरी आली. घरी येईपर्यंत फक्त ती आणि तिची फुले एवढेच होतं. पिनूने ती फुले फुलदाणीत ठेवायला सुरूवात केली. प्रेमाने हळुवारपणे ठेवत होती ती फुलांना. खेळून खूप दमली ती. जेवण केले आणि झोपून गेली. 


झोपेमध्ये तिला कोणीतरी बोलवत आहे असे वाटले. "पिनू ए पिनू." ती शोधू लागली आवाज कुठून येत आहे ते. खूप धूर दिसला मग. तिने डोळे चोळले. तिला दिसली ती फुलदाणी. त्यातील एक फूल हळूच बाहेर आले. पिनूला खूप मजा येत होती. तिने छान गप्पा मारायला सुरुवात केली. ते पुढे म्हणाले, "पिनू, तू मला खूप आवडतेस. सांग तुला काय हवं." पिनूने थोडा विचार केला. ती म्हणाली, "मला परी बघायची आहे."


फूल खुदकन हसले आणि डोक्यावर अलगद स्पर्श केला पिनूच्या. काय चाललंय ते कळेना. ती थोडी दचकली. तिचे रूपांतर झाले होते एका मोहक पंख असलेल्या परीमध्ये. विचारत होती पिनू, "फुलराणी, कुठे आहे तरी ही परी?"


फुलराणी म्हणाली, "हे काय तूच परी आहेस."


"मी कशी असेन परी. सांग ना फुलराणी कुठे आहे परी."


"अगं, खरंच तूच आहेस." कपड्यांकडे, हाताकडे बघून पिनूला काय बोलावे तेच कळत नव्हते.


आरशात बघितले. "किती छान आहे मी. निळे डोळे आणि हे मोरासारखे पंख. अगं मी तर पुस्तकातील परीसारखी दिसत आहे." खूप खुश झाली पिनू. मध्येच आरशात बघत होती. मध्येच स्वतःकडे. खूप वेळ ती स्वत:ला न्याहाळत होती.


"पिनू, उठ लवकर. शाळेत जायला उशीर होतो मग." आईचे बोलणे एकदम कानावर आले. पिनू झोपेतून खडबडून जागी झाली. परत कपड्यांकडे बघून तिला काय बोलावे तेच कळत नव्हते. पुन्हा आईने आवाज दिला. परत कपड्यांकडे आणि हाताकडे पाहिले. कुठे गेली परी, असे मनाशी पुटपुटत होती. तिचे लक्ष त्या फुलदाणीकडे गेले. फुले तर सगळी जशीच्या तशी तिथेच होती. पिनूच्या लक्षात आले की आपल्याला एक स्वप्न पडलं. तिने स्वप्नातील सारी हकीकत आणि गंमत आईला सांगितली. मग दोघी खूप हसल्या. तिने शाळेत जाण्याची तयार केली. पण तिचे मन मात्र अजूनही त्या स्वप्नातील परीत आणि त्या टेबलावर ठेवलेल्या फुलदाणीतच अडकले होते.


Rate this content
Log in