पहिले लिखाण प्रेरणा
पहिले लिखाण प्रेरणा


माझे सर्वात पहिलं लिखाण म्हणजे एक लहान कथा "जगावेगळी आवड". मी माझ्या नातवाच्या पहिल्या वाढदिवसाला ट्रेन ने गोव्याला चालले होते. एका स्टेशनवर मला एक कुली दिसला. त्यांना बघताच एक कल्पना सुचली आणि मी अवघ्या दहा मिनिटात एक लघुकथा लिहिली व समोर बसलेल्या माझ्या मुलीला वाचायला दिली. तिला ही ती खूप आवडली. नंतर मी तिच कथा वर्गात विद्यार्थ्यांना ही वाचून दाखवली. त्यांना ही ती खूप आवडली. सर्वांच्या आग्रहामुळे मी ती कथा दिवाळी अंक "अनामिका" च्या संपादकांना पाठवली व त्यांना ही ती आवडली. माझी कथा अंकात छापून आली. सर्वांनी वाह! वाह!, सुंदर, मस्त असं म्हटल्यावर मी जरा सुखावले आणि हळू हळू मी लिहित राहिले.
रेल्वेने प्रवास करताना खिडकितुन बाहेर बघून निरखण्याची मला सवय आहे. प्रत्येक स्टेशनवर प्रवासी उतरले की त्यांच्या बॅगा घेण्या करता हमाल मागे मागे फिरतात हे पाहिले होते. ह्यात काही तरुण, काही म्हातारे ही असतात. पण गावाकडे स्टेशनवर जास्त हमाल नसतात व त्यांना बिल्ला अथवा गणवेष ही नसतो. त्यांच्या डोक्याला एक कपडा बांधलेला असतो व काही काम मिळेल ह्या आशेने प्रवास्यांकडे पाहत असतात. म्हातारे हमाल पाहिले की मला दया यायची. तेव्हा विचार ही यायचा, सगळेच हमाल मजबूरी म्हणून काम करतात कां की एखादे वेळी हौस म्हणून ही करत असतील.
त्या विचारावरून ती कथा लिहिली गेली. त्या कथेच्या प्रेरणेने माझ्यातल्या लेखिकेला जाग आली.