पारिजात
पारिजात


मयुरी घरी एकटीच असायची, तासनतास अंगणात रोज बसायची... ती रोज त्याच्याशी गप्पा मारायची, दिवसभराचा तीचा आलेख जणू तो नोंद करत असे....त्याच्या सुगंधात ती अगदी मोहरून जात असे.... असा तो पारिजात तीचा सक्खा सोबती झाला होता.... तिच्या प्रत्येक सुखदुःखाचा तो साक्षीदार होता... दररोज आपल्या फुलांचा वर्षाव करून तो देखील तिचे आनंदाने स्वागत करत असे....
मयुरी तशी आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी.... पण तिचे आईवडील म्हणजे त्या गावातील प्रतिष्ठित डॉक्टर.... त्यामुळे त्यांना आपल्या मुलीला द्यायला वेळच नव्हता...त्या गावालाही त्या दोन्ही डॉक्टरची गरज होती.... म्हणून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अहोरात्र रुग्ण येत होते..... इच्छा असूनही ते आपल्या मुलीला वेळ देऊ शकत नव्हते....
मयुरी सौरभच्या प्रेमात पडली होती....तिला तो खूप आवडत असे... त्यानेही तिला लग्नासाठी विचारले होते ह्या सर्वच गोष्टी जर फक्त माहिती होत्या त्या.... पारिजातकालाच माहिती होत्या... तो मोहरून मयुरीच्या प्रत्येक गोष्टीचं स्वागतच करत असे....
आता मयुरीचं लग्न ठरलं होतं अगदीच तिच्या मनाप्रमाणे सौरभशी त्यामुळे मयुरी खूप आनंदी तर होतीच पण पारिजात पहिल्या पेक्षा दुपटीने मोहरू लागला होता... लग्नाच्या दिवशी ती पारिजात ला बिलगून खूप खूप रडली.... तेव्हा त्या पारिजातकाने आपल्या फुलांचा वर्षाव तर केलाच सोबत बियांचाही वर्षाव केला.....
आता मयूरीला लक्षात आले की या पारिजातकाने कायमस्वरूपी सोबत राहण्यासाठी त्याने त्याचे बी दिलेले आहे.... तिने ते घेतले आणि जपून ठेवले...
पण सासरी आल्यावर ती हिरमुसली.... तिचं घर सोसायटीमध्ये होतं.... त्या घराला आंगण नव्हते.... मग सुरुवातीला तिने ते बी कुंडीत लावले.... रोपटे आल्यावर सोसायटीच्या बागेत... सोसा
यटीवाल्यांची परवानगी घेऊन लावले....तिने त्याला नियमित खतपाणी घातले.... आणि ते छान वाढले.
मयुरीचा पारिजातशी गप्पा मारण्याचा दिनक्रम सुरु होता.... सुरुवातीला कुंडीतल्या रोपट्याशी ती गप्पा मारत असे.... आणि आता... सोसायटीच्या बागेत.... बागेतील पारिजात रोज तिच्या गप्पा ऐकत असे.... आणि मोहरत असे... रोज फुलांचा सडा पडत असे...
पण इथे येता जाता तिला लोक बघायचे.... आणि म्हणायचे ही नक्की वेडी असणार... एकटीच झाडासोबत गप्पा मारते.... ही गोष्ट तिच्या सासरच्या मंडळी पर्यंत गेली.... त्यानी तिला विचारले असे का गं तू बडबड करतेस.... मयुरी म्हणाली आई, बाबा इतक्या दिवसांपासून तूम्ही मला पाहत आहात.... मी आपल्या घरामध्ये वेड्यासारखी वागली का कधी?.... पारिजात म्हणजे मला माझे माहेर वाटतो.... सगळ्या गप्पा गोष्टी मी त्याच्यासोबत करते... मन मोकळे करते.... म्हणून मला आपल्या घरातही कधी चिडचिड होत नाही... कुठलीही गोष्ट खटकली की सांगितली पारिजाताकडे... मग काय मन मोकळे होते आणि खटकलेली गोष्ट ही विसरून जाते... आणि सोसायटीतील लोकांचं म्हणाल तर... का मग त्या पारिजातकाची फुले गोळा करतात ती?
मयूरीच्या सासरच्या मंडळींना ही गोष्ट काही पटली नाही... पण हानिकारक नाही म्हणून त्या पारिजाताकडे जाण्यासाठी तिला त्यांनी आडवले नाही...
एकदा मयुरी आजारी पडली... चांगलीच आजारी पडली... आठ दिवस काही तिला अंथरुणात पडून राहावे लागले... पारिजाताकडे तिला जाताच आलं नाही... मग काय पारिजातही मोहोरला नाही आणि बहरलाही नाही... सोसायटीतील लोकांना फुलंदेखील मिळाली नाही... सोसायटीतील लोकांना आता मयूरीला वेडं म्हणण्याचा पश्चाताप होत होता...
नवव्या दिवशी मयुरी जेव्हा पारिजाताजवळ गेली तेव्हापासून ते झाड पुन्हा बहरू लागले...