नव वर्ष संकल्प
नव वर्ष संकल्प


आले कधी सरले कसे काही न कळले
२०१९ मागे सरुनी २०२० साल अवतरले
घेऊनी नव्या आशा आकांक्षाचे गाठोडे
स्वागत तयाचे करण्यास मन माझे आनंदले.
आज २०१९ साल संपतय आणि उद्या नवीन २०२० साल येणार. खरंच २०१९ सालात बऱ्याच बऱ्या वाईट घटना घडल्या, स्वतःवर व देशावर ही, तरी सगळ्या कडू घटना विसरून जाऊ आणि गोड सुखद घटना चिरस्मरणात ठेऊन नवीन उत्साहाने नवीन वर्षाचे स्वागत करू.
२०१९ सालला निरोप देताना गोड गोड आठवणीच लक्षात ठेऊ व त्याला प्रेमाने निरोप देऊ. नवी उमेद, नव्या उत्साहाने नव्य २०२० सालचे आदराने स्वागत करू. एक नवी चेतना, एक नवा जोश घेऊन २०२० येतंय त्याचा सन्मान करू. प्रत्येकाचे काही ना काही नव वर्षाचे संकल्प असतात.
बहुतेक जण नवीन वर्षाचे नवे संकल्प करतात. कही जण त्यांचे तंतोतंत पालन करतात तर बरेच जण ते विसरून ही जातात. उगीच नवीन वर्ष म्हणून भरमसाठ संकल्प करणे ही बरोबर नाही. संकल्प करावेत आणि ते असे असावेत की त्यांचे पालन आपण करूच.
आता माझे उदाहरण देते. गेल्या वर्षी माझ्या कडून काही चुका झाल्यात, त्या मी ह्या वर्षी न करण्याचा निश्चय करीन, आणि हा संकल्प मी माझ्या मनातच ठेविन. पण काही संकल्प असे करीन, आणि ते लोकांना बोलून ही दाखवेन, म्हणजे मी ते मोडायला सहसा जाणार नाही. लोकांना माझे संकल्प माहीत असल्याने माझ्या कडून त्यांचे नीट पालन होईल. माझ्या संकल्पाचे मी नीट आयोजन करीन. नुसते करीन म्हटले तर ते जमणार नाही. त्या करता नीट आराखडा किंवा वेळापत्रक करून त्या प्रमाणे करीन.
आठवड्याचा एक दिवस मी मोबाईल फोनला अजिबात हात लावणार नाही. आता एक दिवस म्हणजे नेमका कोणता, तर सोमवार. ह्या दिवशी मोबाईल उपवास, आणि ह्या दिवशी मी माझ्या मित्र मैत्रिणीकडे जाईन किंवा त्यांना माझ्याकडे बोलावेन आणि कधी ते जमलं नाही तर मी माझ्या पुस्तक मित्राच्या सहवासात तो दिवस घालवेन.
आजच्या आभासी जगात मित्र मैत्रिणी खूप झालेत पण पुर्वीच्या मित्रांची बरोबरी ह्या आभासी दुनियेतील मित्रांशी करता येत नाही. आपले शाळा कॉलेजचे मित्र मैत्रिणींची बरोबरी कोणी करू शकत नाही.
ह्या आभासी जगाने माझ्यातल्या लेखिकेला जागं केलंय. आता जवळ जवळ दोन वर्ष होत आहेत मला लेखन कार्यात हुरूप आलेला आहे. तो मी आणखी वाढवायचा प्रयत्न करीन. घरातले मला बरेच बोलतात पण मी त्याकडे लक्ष न देता माझी लेखन शैली जास्तीत जास्त चांगली करण्याचा प्रयत्न करीन. नवीन काव्य लेखन शैली जेवढं शिकता येईल तेवढं आत्मसात करण्याचा प्रयत्न करीन. त्या करता कितीही त्रास होत असेल तर मी तो सहन करीन व माझा छंद जो जडलाय त्याच्याशी एकनिष्ठ राहीन. त्या करता मला जमेल, माझ्या तब्बेतीला झेपेल, तशी मी साहित्य संमेलनात पण हजेरी लाविन.
मी योग्याभ्यास शिकवते पण जेवढा योगा मी करावा तेवढा माझा होत नाही. त्या करता मी संकल्प करते की मी रोज घरी माझा योगाभ्यास करीन व नंतर वर्गावर जाईन. आहार व्यव्हार जे साधकांना सांगते ते मी पहिले माझ्या आचरणात आणीन आणि हा संकल्प फक्त माझ्यापाशीच ठेवेन.
दुसरी एक गोष्ट ह्या वर्षी मला करायची आहे ती म्हणजे वृद्धाश्रमात जाऊन त्या तेथील वयस्करांना थोडा मुद्रा अभ्यास व मामुली गुडघे दुखणीची आसने शिकविन. हास्यासन करून घेईन व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करीन. भारतीय योग संस्थेचे वर्ग मी निःशुल्कच शिकवते. तसे आठवड्यातुन दोन तीन वेळा मी वृध्दाश्रमाला भेट देऊन त्या तेथील लोकांचे जगणे थोडे सुलभ करीन. तसेच त्यांच्या करता पुस्तकांचे वाचन ही करीन. समाजातील अशा लोकांना जेवढं देता येईल तेवढा माझ्या परीने मी आनंद द्यायचा प्रयत्न करीन. रात्री लवकर झोपेन व सकाळी लवकर उठेन म्हणजे सगळी कामे नीट व वेळेनुसार होतात व नंतर दुपारचा मोकळा वेळ ही मिळतो. तो मी पुस्तक वाचण्यात व लेखन कार्यात घालविन.
ह्या वर्षी मी माझ्या घरातल्या जेवण खाणाचे सुध्दा वेळापत्रक आखिन म्हणजे रोज सकाळी न्याहारी काय करायची हा जो प्रश्न उद्भवतो तो उठणार नाही. वेज नोन वेज जेवणाच्या मेनूचा ही वेळापत्रक करून तो कागद स्वयंपाक घरात जेवणाच्या टेबलाकडे लाविन. म्हणजे आज काय जेवायला मिळेल व उद्या काय असेल ते न सांगता घरातल्या सगळ्यांना कळावे.
मी प्लास्टिकचा वापर करत नाही. ह्या वर्षी मी दुसरा कोणी करत असेल तर त्याला चार समजुतीचे शब्द सांगून त्यांचे ही परिवर्तन करीन. स्वच्छता मी पाळतेच. दुसऱ्यांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देईन. आपण स्वच्छ, आपला परिसर स्वच्छ, मग दवापाणी रोगराई कशी दूर होऊन आपण कसे तब्बेतीने ठणठणीत व आनंदी व समाधानी असू हे समजाऊन सांगेन व कृती माझ्यापासूनच सुरू करीन.
निर्सग आपला दाता. आपण निर्सगाकडून सगळंच घेत असतो. तेव्हा निर्सग सदा हिरवा असावा आपल्याला पाऊस पाणी वेळेवर मिळून आपण सूजलम् सूफलम् व्हावं त्या करता झाडांचे संरक्षण करणे व त्यांना जोपासणे आपले कर्तव्य आहे. तेव्हा माझ्या ईमारतीच्या मोकळ्या पटांगणात मुलांना खेळण्याची जागा सोडून लहान मोठी झाडे लाऊन व त्याची जोपासना निट राखण्या करता मी जातीने लक्ष घालीन. सोसायटीचा माणूस बागायत करू अथवा न करू दे, माझ्या इमारतीतील झाडांना पाणी देणे व त्यांची निगराणी मी माझ्या परीने रोख ठेविन. इमारतीतील मुले अथवा माळी आला तर बरेच, नाही कुणी आले तरी मी जातीने लक्ष घालीन.
उन्हाळ्यात पाण्याचे खूप हाल होतात. मी पाणी
जपूनच वापरते. हवे तेवढेच वापरते आणि त्या करता जमेल तशी मी जन जागृती ही करते.
आता एवढे सारे संकल्प मला तडीस न्यायचे आहेत तेव्हा मला माझे आरोग्य सांभाळायचे आहे. त्या करता माझे उठणे, झोपणे, खाणे पिणे, आराम, व्यायाम सगळं वेळेवर नियोजित प्रमाणात व्हायला पाहिजे. ह्याची जाण ठेऊनच मी नव्या वर्षाच्या नव्या संकल्पाची पुर्तता करणार आहे.
हे देवी शक्ती माता दे मज शक्ती
रचिले मी मनोरथ मम संकल्पाचे
सिध्दीस तया नेण्या मज बळ दे
ह्या नव वर्षात पूर्ण मी करण्याचे.