नासा ( NaSa ) येवतीकर

Others Children

2  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others Children

नोकरी श्रेष्ठ की शेती

नोकरी श्रेष्ठ की शेती

4 mins
96


पृथ्वीवर विचार करणारा प्राणी म्हणजे मानव. मनुष्य जन्मल्यापासून ते मरेपर्यंत जीवन जगण्याचा विचार करतो. जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी प्राप्त करण्यासाठी नेहमी धडपड चालूच असते. आपले आयुष्य सुखी, समाधानी आणि समृद्ध करण्यासाठी प्रत्येकजण आयुष्यभर कष्ट उपसत असतात. पैसे असणारे अधिकचे पैसे मिळविण्यासाठी कष्ट करतात तर पैसे नसणारे मंडळी पैसा मिळविण्यासाठी कष्ट करतात. फार पूर्वीच्या काळी पैसा हेच सर्व काही नव्हते. प्रत्येक घरात धनधान्य भरभरून राहायचे. कष्टाच्या मोबदल्यात धान्य देण्याची तेंव्हा पद्धत होती. त्यामुळे पैसा हे चलन फार कमी प्रमाणात व्यवहारात येत असत. गावागावात बारा बलुतेदाराची पद्धत होती. जो तो आपलं काम करीत असत आणि कामाच्या मोबदल्यात धान्य घेत असत. पण कालांतराने काळ पुढे सरकत गेला. गावातून बलुतेदार पद्धत नष्ट होऊ लागली. कामाच्या मोबदल्यात धान्य ऐवजी पैसा आला. तसं समाजातील सर्व चित्र हळूहळू रंग बदलू लागले. पूर्वीच्या काळी शेतीला प्रथम प्राधान्य दिल्या जात असे. शेतीमधून भरघोस उत्पन्न निघत असे. तसं तर आज त्या काळापेक्षा जास्त उत्पादन आहे तरी ही कमी पडते कारण वाढती लोकसंख्या. लोकसंख्या कमी असल्यामुळे तेंव्हाचे तेच उत्पन्न जास्त वाटत असे.


एका दाण्यापासून हजारो दाणे तयार करण्याची ताकत शेतीमध्ये आहे. शेतीमधून जे काही उत्पन्न घेतल्या जाते ते जगातील कोणत्याच कारखान्यात निर्मिती केल्या जात नाही. त्यासाठी शेती हा एकच पर्याय आहे. त्यामुळेच शेती हा सर्वोत्तम पर्याय समजाला जात असे. त्यानंतर दुय्यम स्थान होते व्यापारला. व्यापारी मंडळी सर्वांकडील माल एकत्र करून त्यावर तो आपली उपजीविका चालवीत असतो. शेतकऱ्याने काही पीक उगविलेच नाही तर व्यापारी कशाचा व्यापार करणार ? हा खूप मोठा प्रश्न आहे. व्यापारी हा परावलंबी जीवन जगत असतो. त्याचे जीवन स्वतःच्या कष्टावर नसून शेतकऱ्यांच्या कष्टावर अवलंबून आहे. व्यापार म्हणजे एकप्रकारे लोकांची सेवाच नव्हे काय ! त्यानंतर तिसऱ्या स्थानावरचे पर्याय म्हणजे नोकरी. नोकरीला त्याकाळी कनिष्ठ समजले जायचे. कुणाची नोकरी-चाकरी करणे मुळीच आवडत नसत करण नोकरी करणे म्हणजे दुसऱ्यांची गुलामीच होय. मालक सांगेल त्या वेळेला जावेच लागते आणि यावेच लागते. आपल्या मनासारखे अजिबात वागता येत नाही. सुट्टीची आवश्यकता असून देखील सुट्टी मिळत नाही. मनाप्रमाणे निश्चितपणे वागता येत नाही. म्हणून त्यास कनिष्ठ असे म्हटले होते. 


पण काळ बदलला. कनिष्ठ समजल्या जाणारी नोकरी आज उत्तम समजल्या जात आहे. आज प्रत्येकजण नोकरीच्या मागे सश्याप्रमाणे धावत आहे. नोकरी असलेली जिंदगी खूप आरामदायक वाटत आहे. या नोकरीपायी माणसं घरदार, गावशेत, वाडा-बंगला आणि माणूस सर्व काही विसरून जात आहेत. सरकारी, खाजगी किंवा कुणाच्या मालकीच्या जागेवर नोकरी करणे आज लोकं पसंद करीत आहेत. कारण या नोकरीत त्यांना शाश्वत जीवन दिसत आहे. आजचे शिक्षण हे नोकरी पुरते सिमीत झाले आहे. शिकून नोकरी मिळाली तर त्याचे शिक्षण चांगले झाले आहे असे मानायचे आणि एवढं शिकून साधी नोकरी लागली नाही तर एवढं शिकायचं कशाला ? असा प्रश्न समाजातील काही लोकं उपस्थित करतात. एका शिपायांची नोकरी मिळविण्यासाठी पी. एच. डी. केलेला डॉक्टर देखील अर्ज करतो यावरून आपणास या नोकरीचे महत्व नक्कीच कळून चुकेल. नोकरी असल्याशिवाय एखाद्या मुलाला छोकरी देखील मिळत नाही ही सत्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. आज युवक लोकांचे एकच लक्ष आहे ते म्हणजे नोकरी मिळविणे. म्हणूनच कनिष्ठ दर्जाची असलेल्या नोकरीला खूप महत्त्व निर्माण झाले आहे. तर पूर्वी जे उत्तम शेती समजल्या जायचे तेच आज कनिष्ठ होऊन बसले. वेळेवर पाऊसपाणी नसणे, शेतीमालाला भाव नसणे, वाढती महागाई या सर्व कारणामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आलेला आहे. त्यामुळे त्याला शेती हे नकोसे वाटत आहे.


निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सरकारची तुटपुंजी मदत यामुळे शेतकरी पुरता नागवला जात असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळी जे उत्तम शेती मानल्या जात असे ते आज कोणी ही उत्तम मानायला तयार नाहीत. एवढंच नाही तर शेतकरी मुलास कोणी मुलगी द्यायला तयार नाहीत. भरपूर बागायती शेती आहे वर्षाला लाख-दोन लाख कमावतो, खूप कष्ट करतो असे किती ही प्रशंसा केली तरी कोणताही बाप आपल्या मुलींच्या लग्नासाठी या शेतकरी मुलांचा अजिबात विचार करीत नाहीत. व्यापारी वर्ग तेंव्हाही सुखीच होता आणि आजही सुखीच आहे, यात यत्किंचित सुद्धा वाद नाही. पूर्वी व्यापारी मंडळी अगदी सचोटीने व्यवहार करायचे सध्या मात्र यात थोडा बदल झाला असे वाटते. मात्र जरासे खोलात जाऊन विचार केल्यास लक्षात येईल की, आज नोकरीला जे प्राधान्य दिले जात आहे ते योग्य नाही. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली त्या प्रमाणात नोकऱ्या वाढल्या नाहीत.


नोकरी मिळविण्यासाठी आज जीवघेणी स्पर्धा चालू आहे. नोकरी मिळाली नाही म्हणून बरेच युवक हताश होऊन वाममार्गाचा अवलंब करीत आहेत, त्यातून त्याचे संपूर्ण आयुष्य बरबाद होत आहे. सध्याच्या काळात सर्वाना नोकरी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे युवकांनी या नोकरीसारख्या मृगजळाच्या पाठीमागे न धावता घरी उपलब्ध असलेल्या शेतीकडे लक्ष दिल्यास घरच्यांना तर दिलासा मिळेलच शिवाय आपल्या घरात नक्कीच चार पैसे येतील. मग एवढं शिकण्याचा काय फायदा ? असं प्रश्न कधी तरी मनात डोकावून जाते. मात्र नोकरी मिळविण्याच्या नादात आपण श्रम करण्याचे काम साफ विसरून जातोय. हताश आणि निराश झाल्यावर या शेतीच्या व्यवसायात पाऊल टाकावे वाटत नाही. म्हणून आपल्या सारख्या नवयुवकानी आपल्या स्वतःविषयी एकदा विचार करून कोणती बाब श्रेष्ठ आहे याचा विचार जरूर करावा. आपला एक निर्णय स्वतःच्या विकासासोबत घराचा, गावाचा, राज्याचा पर्यायाने देशाचा विकास साधू शकतो. वेळ निघून गेल्यानंतर विचार करण्यात काही अर्थ नाही.  


Rate this content
Log in