निसर्ग,मानव आणि क्रूरता
निसर्ग,मानव आणि क्रूरता
एकीकडे मांगल्याच,भरभराटीच प्रतीक म्हणून हिरव्या नवलाईला जन्म द्यायचा दुसरीकडे शितल छाया,जीवनाचा श्वास देणाऱ्या वनराई,वसुंधरेचा ऱ्हास करायचा सोबतच आपल्यातल्या माणुसकीचा,संवेदनशीलतेचा अंत करायचा दुःखद असलं तरी वास्तव आहे. घटस्थापनेत माती घेऊन त्यात धान्य पेरून रोज त्याच कणकण उगवणंही मनाला नवीन ऊर्जा देऊन जात. रोज त्या घटाची वाढ पाहून मन आल्हाददायक होत,प्रसन्न होत. एक अनामिक शांती मिळते. आजही अशीच प्रसन्नता माझ्या घटाला बघून मिळाली पण क्षणांतच जवळच्या परिसरातल्या वृक्षतोडीच्या बातमीने मन हळहळल.
तेवढ्यातच शाळेतून मुलगा आला जरा हिरमसूनच. काय झालं विचारताच म्हणाला आमच्या शाळेच्या बाजूला जे जंगल सारख होत बघ...तिथे खूप झाडं होती...तू मी बाबा रविवारी फिरायला जायचो तिकडे...आम्ही मित्र सगळे खेळायला जायचो तिथे...पण आता जायला नाही मिळणार तिथे ग....तिथली सगळी झाडं तोडली...हिरवं हिरवं बघायला किती छान वाटायचं पण आता दगडच दिसतायत नुसते तिथे. आता मी खेळायला कुठे जाणार..जंगल बघायचं असेल तर कुठे जाऊ...आणि आता आपण तिथे जायचं आई दर रविवारी फिरायला?? मला खूप राग आला त्या झाड तोडणाऱ्यांचा...त्यांना शाळेत शिकवलं नाही का ग झाड तोडायची नसतात ते आपल्याला ऑक्सिजन देतात. त्या बालमनाला के समजावंणार मी की लोक स्वतःच्या फायद्यासाठी या निसर्गाचा जीव घेतायत. जो जीचं दान देतोय त्याच्याच जीवावर उठलेत. माझाही अगदी जवळचा परिसर ज्यात माझं बालपण गेलं. जिथे मी आणि माझ्या मैत्रिणी बागडलो,वेगवेगळे खेळ खेळलो. कधी मन उदास झालं तर तिथल्या झाडांसमोर जाऊन मन मोकळं केलं. प्रत्येक सुख दुःखात झाड सोबत राहिली, त्यांना माझ्या मनीचे गुज सांगितले आणि त्यांनीही सकारात्मक ऊर्जा देत मला नेहमी त्यांच्या छायेत सामावून घेतलं. आज त्यांच्यावरच घाव होत आहेत आणि सोबत माझ्या मनावरही. उद्या पुन्हा तिथे जायची वेळ आली तर म्हणावं लागेल "सारे गेले मातीस मिळुनी, राहिल्या त्या फक्त आठवणी". ज्या झाडांनी कडक उन्हात सावली दिली आज त्याच झाडांची निर्घृण हत्या होत आहे. हो हत्याच आहे ती...मुका जीव तो...काय स्वार्थ साधतो तो...काहीच नाही....उलट तुम्हालाच प्राणवायू देऊन तुमचे आयुष्य वाढवतो.
तुमच्या छोट्यातल्या छोट्या पासून ते मोठ्या आजारापर्यंत सगळी औषधं असतात या निसर्गात. मन प्रसन्न करण्याची ताकद आहे या निसर्गात. चार काचेच्या भिंतीत जेव्हा तुमचा जीव गुदमरतो तेव्हा खिडकी उघडून शुद्ध हवा देऊन तुम्हाला नवीन ऊर्जा देण्याची वृत्ती आहे या निसर्गाची. त्या वन्यचर प्राण्यांचं घर आहे या निसर्गात. दिवसाच्या सुरुवातीपासून रात्रीच्या अंतार्यंत अनन्यसाधारण महत्त्व असणारा हा निसर्ग आज लोप पावतोय आणि तेही मानवामुळेच. ज्याला हा पर्यावरण नवजीवन देतो तोच या पर्यावरणाचा ऱ्हास करतोय. प्रगती करण्यासाठी हे सगळं गरजेच आहे असं म्हंटल जात...मान्य आहे...पण तुम्ही अजून किती निसर्गक्षेत्रात हस्तक्षेप करणार?? औद्योगिक भरभराटी होईलही तुमची पण त्या भरभराटीचा आनंद घ्यायला,उपभोग घ्यायला तुमच्या श्वासांची मर्यादाही कमी होत जाईल. एक वेळ या आधुनिक सोयी सुविधा नसल्या तर माणूस जगेलच जसा आजही जगतोय पण झाडच नष्ट होत चालली तर जगेल का माणूस???? वृक्षतोड करून मोठमोठे प्रकल्प उभारले जातात. गगनाला भिडणाऱ्या इमारती म्हणा की मग आता मेट्रो म्हणा..सगळं तुम्हाला सोईस्कर, सोपस्कर होईल अस घडवलं जात. या भौतिक सुखाचा काही दिवस उपभोग घेतल्यानंतर मात्र माणसाला जाणीव होईल की हे क्षणिक सुख आहे. हिरव्या निसर्गाची सर याला नाही. घामाच्या धारामध्ये भिजत असताना दुरून आलेली थंड वाऱ्याची झुळुकही किती सुख देऊन जाते हे ती झुळूक नष्ट झाल्यावरच कळेल. जेव्हा प्रगतीच्या नावाखाली तुमच्या राहत्या घराचाही ताबा घेतला जाईल तेव्हा या मुक्या झाडांचा आक्रोश ऐकू येईल. हजारो झाडे मातीत जाणार म्हणजे किती मोठ्या प्रमाणात पर्यावरण हानी होणार आणि त्यासोबतच कितीतरी नवीन संकट चालून येणार. आपणच स्वतः या झाडांचा जीव घेऊन आपलाच जीव धोक्यात घालत आहोत. Slow poisoning असा काहीसा खेळ आपल्यासोबतच खेळत आहोत. काही जण म्हणतात की ते वनक्षेत्र नाही किंवा वनक्षेत्रासाठी जागा आरक्षित करून दिल्या आहेत पण तुम्ही उपजत असलेल्या निसर्गाचा ऱ्हास करता त्याच काय? आता खूप ठिकाणी वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात चालू असत...हजारोच्या आकड्यांनी रोपटी लावली जातात (या स्तुत्य उपक्रमाच कौतुकच आहे) पण ती हजारोच रोप वृक्षाच रूप घेतात का? अशीच निसर्गहानी होत राहिली तर मग कदाचित झाडे बघायला,निसर्ग देखावा बघायला त्या आरक्षित वनक्षेत्रातच जावं लागेल कारण चारी बाजूला तर उंच उंच इमारतींचच जंगल असेल. आमच्या पिढीने हे निसर्गसौंदर्य डोळ्यात कैद करून घेतलं पण इथून पुढच्या पिढीला निसर्ग म्हणजे काय कळेल का की निसर्ग त्यांना फक्त फोटोमध्येच पाहायला मिळेल? शाळेत असताना आम्ही पिकनिक स्पॉट म्हणून अशा निसर्गात जाणं व्हायचं...कितीतरी निसर्गप्रेमी तिथूनच जन्माला आले... पण इथून पुढच्या पिढीला हे इतकं सहज बघायला,अभ्यासायला मिळेल? किंवा कधी वाटलं निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारून यावं तर इतक्या सहजतेने ते शक्य होईल??? या निसर्गाच्या प्रेमात पडून कितीतरी कवी,लेखक जन्माला आले...इथून पुढच्या पिढीमध्ये कवी,लेखक असतील??? आणि ते असलेच तर मशीन्स,यंत्र, टेक्नॉलॉजी यावर कविता आणि लेख लिहितील का?? नयनरम्य संध्याकाळ आणि ती सोनेरी पहाट सिमेंट,काचेच्या भिंतीतच होईल का??? आणि निसर्ग ज्यांचं घर आहे ते प्राणी उद्या रस्त्यावर आले तर मानवाच काय होईल??? माणूस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय ही कौतुकास्पद गोष्ट आहे पण या सोबत त्याच्या संवेदनांचा अंत होत चाललाय का??? निसर्गाने आताच इतका मोठा प्रहार करून देखील माणूस निसर्गहानी करतोय यालाच यांत्रिक बुद्धी आणि मनाचा उगम म्हणावं का???? मानव क्रूर,स्वार्थी आहेच हे पदोपदी सिद्ध होत पण त्याची परतफेड म्हणून आता निसर्गही क्रूर होताना दिसत आहे. कधी संपेल ही क्रूरता??? प्रगती व्हावी पण निसर्गाचा समतोल राखूनच...त्याचा गळा घोटून नाही. माझ्या मताशी सगळेच सहमत असतील अस नाही... कारण इथेही दोन गट पडले आहेत....मतमतांतरे आहेत...पण माझ्यासारख्या निसर्गप्रेमी असणाऱ्यांचं या वृक्षतोडीने मन हळहळणारच. निषेध व्यक्त होणारच. आज संत तुकारामांच्या ओळींची प्रकर्षाने आठवण झाली "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे। आळविती।। येणे सुख रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष। अंगी येत।।"