Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Yogita Takatrao

Others


3.8  

Yogita Takatrao

Others


नास्तिक

नास्तिक

3 mins 1.9K 3 mins 1.9K

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही नमिता देव दर्शनाला गेली होती. अहं, फार मोठी देव भक्त नाही हा ती.फक्त एकदाच मनापासुन हात जोडून उभी राहणार, तेवढीच काय ती श्रध्दा ,बाकी ती शुद्ध परिपूर्ण नास्तिक. अंधश्रध्दांना बिलकुल खतपाणी न घालणारी. पण तरीही सगळया कुटुंबाबरोबर नियमित देवळात जाणारी.तो परिसर एवढा प्रसन्न होता, भाविक आणि श्रध्दाळुंनी पूर्ण भारलेला. सर्वत्र ओटीचे सामान, हार-फुले, मिठाई इत्यादींची रांगेत लागून राहिलेली दुकाने. प्रत्येक दुकान वाला ,पुढे आत काहीच सामान मिळत नाही हो ताई, इथेच चप्पलाही ठेवून जा आम्ही लक्ष देतो ,असे बोलून आपलं सामान कसं विकलं जाईल, हेच पाहत होता. मंदिराच्या आवारात प्रवेश केला तर एक-दोनंच दुकाने होती. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा प्रसन्न , भारदस्त आणि प्रशस्त असा आवार होता. एखाद्या नास्तिकालाही प्रसन्नता देऊन जाईल असा. सर्वच देवदेवतांची मंदिरे होती , जणू एका देवा पासून सुरु केलं की सगळे देव आपल्याला दर्शन देणार. आणि मध्य भागी महालक्ष्मी मातेचे भव्य दिव्य देऊळ, दगडी आखिव रेखिव नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना. भाविकांची दर्शन घेण्यासाठीच्या लांबच लांब दोन रांगा,एक आतुन दर्शनासाठी तर दुसरी बाहेरून मुख दर्शनासाठीची. सगळया भाविकांच्या हातात देविला अर्पण करण्यास ओटीचे सामान, साडी, हार, कमल पुष्प असं काही ना काही होतंच. अगदी सहजचं आणि सारखेपणाने नमिता कडे सुध्दा होतं . सगळया रांगेसह नमिताने सुध्दा कुटुंबियांबरोबर दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश घेतला. आणि थोडयाच वेळात नमिता त्या प्रसन्न महालक्ष्मीच्या खुप छान सजवलेल्या ,सुंदर, सोज्वळ अश्या मूर्ति समोर आली. तिने सगळंच सामान पंडितजी च्या हाती सोपवलं पण, ती साडी माञ देवी च्या पायी स्पर्शून परत स्वताकडे घेतली. साहजिकच आजुबाजूला असणाऱ्या सगळयांचे डोळे काही विचारांनी विस्फारले पण, नमिता सगळ कळत असूनही आपल्या निर्णयावर ठाम होती. सगळयांबरोबर प्रसाद आणि साडी घेऊन ती बाहेर आली. आणि कोणाला तरी शोधू लागली. मंदिराच्या आवारातच एका बगिच्यात तिचं ईप्सित सिद्धीस जाणार होतं. ती बगिच्यात साडी सह गेली, तिथे एक हिरवी साडी नेसलेल्या , हातभर हिरव्या बांगड्या घातलेल्या , कपाळावर भलमोठ्ठं ठसठशित गोलाकारात निट लावलेलं लालभडक कुंकू ,अश्या अवतारात एक आजी दिसल्या. नमिता आजींसमोर जाऊन ऊभी राहिली आणि त्यांना म्हणाली, "अहो, आजी, ही साडी मला तुम्हाला द्यायची आहे, घ्याल का तुम्ही?" आणि आजींनी दिलेल उत्तर ऐकुन काय खुश झाली नमिता, " का नाही घेणार पोरी, समोर आलेल्या मानाला कुणी नाही म्हणतं व्हय ", थांब हा जरा, असं म्हणुन आजी बगिच्या बाहेर लागून असलेल्या एका दुकानात जाऊन एक कापडी पिशवी घेऊन आल्या.आजीने त्यांच्या पिशवीतून दोन छोट्या डब्या काढल्या, नमिता कौतुकाने हे सगळं पाहत होती . त्या डब्यांत हळद आणि कुंकू होतं.नमिता आजीना म्हणाली, अरे व्वा! हे सगळं ठेवता तुम्ही, तुमच्या बरोबर ? हो, लागतं ना मला, म्हणुन ही तयारी! हळद कुंकू काढून त्यांनी नमिताला दिलं, मग काय तिने ते घेऊन त्यांना लावलं आणि आदराने ती साडी त्यांना हातात देऊन त्यांच्या पाया पडली. आजीने ही नमिताला हळदी कुंकू लावलं आणि प्रेमाने भारलेला हात तिच्या डोक्यावर ठेवून तिला आशिर्वाद दिला. एक प्रसन्न वेगळीच लाट तिच्या अंगात सळसळली जणू काही महालक्ष्मी मातेने साक्षात स्वताच येऊन तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशिर्वाद दिला होता. नमिता आनंदाच्या लहरी घेऊन निघाली, हे सगळं तिचा नवरा मुल सांभाळत कौतुकानेे न्याहाळत होता, अर्थात तिच्या या निर्णयात तोही सामिल होताच. नमिता अनिलला तिच्या पतिदेवाला खूप आधीपासूनच बोलायची, की तिला मंदिराच्या आतल्या देवी ला साडी द्यायला काही अडचण नाही. पण त्या सााडीच पुढे काय होत ते माहीत नाही, काही ठिकाणी तर देवीला अर्पण केलेल्या साडयांचा लिलाव होतो. पण जर त्या साडया बाहेरच्या गरजू बायकांना मिळाल्या तर? कित्येक जणांच्या नशिबी दोन तीन वर्षात एकही नवीन साडी घेण्यासाठी पैसे नसतात, जर त्यांना अशी अचानक साडी मिळाली तर ,त्यातली प्रत्येक बाई आयुष्यभर हया चांगल्याा आठवणीत रमेल, की कोण ,कुठली,ओळख पाळख नसणारी महिला आली आणि मला आदर सन्मानाने साडी देऊन गेली. अर्थात कोणालाही ती जबरदस्ती करत नव्हतीच आणि मग ह्यात आस्तिक ,नास्तिक असे दोन गट पाडायचे नव्हते तिला, पण असं करून नमिताला आंतरिक सुख मिळालं, तर काय वाईट आहे ना त्यात? विचार करून बघा!


Rate this content
Log in