Aditya Kulkarni

Others

3  

Aditya Kulkarni

Others

नाना ..

नाना ..

2 mins
8.5K


'काय आदित्यबाबा ,विसरला का गरीबाला ?' बोलण्याचा टोन , आवाज अनेक वर्षांपासूनचा परिचयाचा आहे .मागे वळून बघितलं .त्याच टपरीच्या बाजूला नेहमीच्या कट्ट्यावर नाना निवांत बसलेले होते .नाना हे काही त्याचं नाव नव्हे .किंबहुना त्याचं नाव काय असावं याची कोणी चिंताही कधी केली नाही . मी ही . गव्हाळ वर्ण , उंचीला पाच सव्वापाच फुटाच्या आसपास ,दाढी -मिशा आणि डोक्यावर घनदाट केसांचं झुबकं ,अंगात कायम झब्बा किंवा मळकट ढगाळ असा शर्ट .

 जवळपास अर्ध्या तपापासून ओळखतोय मी त्यांना . पण इतक्या वर्षात ना त्याचं बोलणं बदललं ना ही त्याचं रहाणीमान . देहयष्टी सुद्धा किडकिडीत असल्याने नैसर्गिकपणे म्हणा किंवा न्यूनगंडाने अतिशय मृदू आवाजात बोलणं . खास लक्षात राहील असा स्वभावातला एकही गुण नाही . काही माणसं न कळत जन्माला येतात ,न कळत जगतात आणि कोणालाही न कळत मरतात ,अगदी त्या कॅटगरीतले हे नाना .घरच्यांपासून बऱ्याच वर्षांपूर्वी विभक्त झालेले . एकटेच रहात होते .एक दोनदा निवांत भेटही झाली होती .भरपूर बोलले .अगदी परक्या माणसाशी जेवढं उघडपणे बोलू नये तेवढं . इतर वेळेस मला बघितलं की आठवणीने हाक मारायचे .गेल्या काही वर्षात पुण्याला जास्त येणंजाणं नव्हतं ,ह्या व्यक्तीला आपण कधीकाळी भेटलो होतो ही आठवण देखील विसरली गेली होती .

गेल्या महिन्याभरात नेहमी त्याच रस्त्यावरून जाऊनही साधी पुसटशी आठवणही झाली नाही . 

मगाशी ऑफिसमधून घरी येताना मित्राने नाक्यावर सोडलं .फोन आला म्हणून दोन मिनिटं थांबलो होतो .मागून ,'काय ***** बाबा ,विसरला का गरिबाला ?' असा आवाज ऐकू आला .

वर्षानुवर्षे विस्मृतीत गेलेली एखादी घटना ,प्रसंग ,व्यक्ती अगदी अचानकपणे पण लख्ख आठवावी तसे त्या क्षणी फक्त नाना आठवले . फोन ठेवल्यावर टपरीवर गेलो आणि नानांबद्दल चौकशी केली .दोन वर्षांपूर्वीच गेल्याचं कळलं .

काहीतरी वाटलं पण नेमकं काय ते शब्दातही सांगता येणार नाही .

जगाच्या रंगमंचावर एक जीव त्याला दिलेलं पात्रं पूर्ण करून गेला . कोणालाही काहीही वाटू न देता .... एवढंच म्हणेन .


Rate this content
Log in