Sarita Sawant Bhosale

Others

3  

Sarita Sawant Bhosale

Others

मुलीसह आईही नव्याने उमगली

मुलीसह आईही नव्याने उमगली

6 mins
443


"नमा ती बघ तीच मुलगी, समोरच्या फ्लॅटमध्ये राहायला आलीये ती. किती सुंदर दिसते ना...नवरा बायको दोघेच असतात वाटतं घरी"- मी माझ्या सोसायटी मधील मैत्रिणीला. मैत्रीण - हम्म..दोघेच राहतात. आधी पलीकडच्या सेक्टर मध्ये राहायचे दोघे भाड्याने रूम घेऊन. आता आपल्या बिल्डिंग मध्ये आलेत. दिसायला तशी ती सुंदर आणि आकर्षित वाटणारच ग..शेवटी अशा बायकांच्या मुली त्यांच्यासारख्याच असणार..दिसणार. त्यात काय नवल. अशा म्हणजे काय म्हणायचंय तुला? आणि एकच आठवडा झालय त्यांना इथे येऊन राहायला...तुला काय माहीत तिच्याबद्दल असं बोलायला?? मी जरा वरच्या सुरातच तिला बोलले. तशी ती म्हणाली, "आधी ते जिथे राहायचे तिथेच बाजूला माझे नातेवाईक राहतात..त्यांनीच सांगितलं हिची आई एक बारडान्सर होती. हिला पण ते ड्रम वाजवतात ना आणि ढोल,ताशा ते काय काय नको ते वाजवायची आवड आहे म्हणे. तिचा नवराही गणपती,नवरात्री मध्ये वाजवतो. त्यातून तर दोघांची ओळ्ख झाली आणि लग्न झालं. पण मी म्हणते मुलाने तरी हिला कसं पसंद केलं...रूपावर भाळला असावा बघ दुसरं काय. मैत्रीण एवढं बोलून पटकन निघूनही गेली पण माझं मन मात्र विचार करायला सुरू झालं.


आजपर्यंत मी फार निकोप दृष्टीने त्या मुलीकडे पाहत होते आता मात्र कधी दिसली की ती एका बार डान्सरची मुलगी एवढंच डोक्यात यायचं आणि सगळा नूर पलटायचा. एक दिवस संध्याकाळची वेळ..आकाशात ढग भरून आलेले. अधून मधून विजा कडाडत होत्या. थोड्याच वेळात पाऊसही सुरू झाला.तेवढ्यात दारावरची बेल वाजली. हातातली नीट करत असलेली भाजी तिथेच सोडून दरवाजा उघडला...बघते तर काय समोर तीच मुलगी उभी. केस मोकळे सोडलेले.. अर्धवट भिजलेले. कपडेही थोडे भिजलेले...अशा अवस्थेत ती उभी कुडकुडत होती. "सॉरी डिस्टर्ब केलं म्हणून पण एक ग्लास पाणी मिळेल का? खूप तहान लागले. माझ्या घराला कुलूप आहे आणि एक चावी नवऱ्याकडे असते..तो अजून आला नाही. माझ्याकडची चावी आज घरीच विसरली." तिला पटकन एक ग्लास पाणी आणून दिल. Thank u बोलून ती बाहेरच उभी राहिली पण माझ्यातल्या माणुसकीला ते पटलं नाही. तिच्याबद्दल मनात काहीबाही विचार होते ते बाजूला सारून तिला घरात बोलवुन केस पुसायला टॉवेल दिला. दोघींना आलं टाकून फक्कड चहा बनवला आणि तिला दिला. चहा पित पित ती माझं घर न्याहाळत छोट्या मोठ्या गोष्टीचं कौतुकही करत होती. मी ही काय करतेस,याआधी कुठे राहत होता वगैरे चौकशी केली. बाहेरच्या देशातून ती ड्रम आणि इतर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स शिकून आले आणि इथे ती एका संस्थेत मुलांना आणि मुलींना ते शिकवायला जाते हे ऐकून तर मी अवाकच झाले. कित्येक मुलींना ती मोफत शिकवत होती हे ऐकून छानच वाटलं. मध्येच तिचे डोळे भरून आले. "का ग अचानक काय झालं?" मी विचारलं. "काही नाही तुम्ही इतक्या आपुलकीने मला घरात घेतलं,चहाही दिला फार बर वाटलं.. नाहीतर आमच्याशी साधं कोणी बोलतही नाही. माझं मी समजू शकते पण माझ्या नवऱ्यासोबतही कोणी बोलत नाही..माझ्याशी लग्न केलं म्हणून त्याच्या नातेवाईकांनीही त्याला वाळीत टाकलं. तुमच्यासारखी माणुसकी जपणारी लोक या जगात फार कमी असतात ताई. तिच्या अशा बोळण्याने मनात कुतूहल निर्माण झालं सोबतच वाईटही वाटलं. "असं का बोलतेस तू? इथे सगळी चांगली माणसं आहेत. काळजी करू नको"- मी "चांगली आहेत ना पण ती तुमच्या सारख्या चांगल्या माणसांसाठीच. माझ्यासारख्या बारडान्सरच्या मुलीसाठी ती वाईटच. मला माहित आहे तुम्हालाही एव्हाना कळलं असेल मी एका बारडान्सरची मुलगी आहे. मुलगी चांगली आहे याआधी ती वाईट कशी आहे अशा गोष्टी चटकन पसरतात या समाजात. हो होती माझी आई बारडान्सर. लहान होते तेव्हा तिला आरशासमोर मेकअप करून सजतानाच पहायची सवय होती. संध्याकाळ झाली की ती कामाला जाते अस सांगून जायची आणि रात्री,मध्यरात्री कधी पहाटे केव्हातरी यायची जेव्हा मी झोपलेले असायचे. खरा बाप कोण होता,गेला की आहे हे तिने कधी सांगितलंच नाही. पण माझ्यासाठी सावत्र बाप मात्र एक दिवस घेऊन आली. तू काय करतेस, कुठे जातेस विचारल्यावर बोलायची जे करते ते फक्त तुझ्यासाठीच. तुला शिकून खूप मोठं झालेलं बघायचंय. माझ जिणं तुझ्या वाट्याला नको म्हणून राबते मी पोरी. तीच हे बोलणंही कळायचं वय नव्हतं माझं... पण माझ्यासाठी करते याच अप्रूप वाटायचं. जे वय माझं खेळण्या बागडण्याचं होतं त्या वयात त्या सावत्र बापाने माझं लैंगिक शोषण करण्याचा,माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आईला सगळं कळताच तिने त्याला घरातुन आणि स्वतःच्या आयुष्यातूनही हाकलून दिलं.


तिच्याजवळ माझं भवितव्य सुरक्षित नाही हे समजताच तिने मला एका एनजीओमध्ये पाठवलं. जिथे मी शाळेत जाऊ लागले, चांगल्या वाईट गोष्टींची ओळख झाली. तिथेच माझी आई बारडान्सर म्हणजे बारमध्ये हौशी पुरुषांसमोर नाचते हे कळालं. पण परिस्थिती मुळे ती या मार्गाकडे वळली आणि परत मागे फिरण्याचा रस्ता तिच्याकडे नव्हता. जे काही करत होती ते माझ्यासाठीच त्यामुळे मी कधीच तिचा तिरस्कार केला नाही. जग 'नाचने वाली की लडकी' अस म्हणत मलाही हिणवायचं पण मी आईला कधीच दोष दिला नाही. आई म्हणून तिने माझ्यासाठी खूप यातना सहन केल्या व मला तिच्या दुनियेपासून लांब ठेवलं.


मी शिकत होते पण मला वेगळं काहीतरी करायचं होतं..एनजीओमध्ये असतानाच मला ड्रम वाजवायचा छंद जडला. शिक्षणापेक्षाही तुझ्या आवडीवर भर देऊन त्यात तुझं करिअर केलंस तर तू आयुष्यभर खुश आणि समाधानी राहशील असे तिथले शिक्षक मला नेहमी सांगायचे. मीही शेवटी माझा छंदच माझं करिअर म्हणून निवडलं. माझं स्वप्न पूर्ण केलं. ढोल,ताशा,झांज,ड्रम वाजवताना तिथे जेंडर मध्ये आलं नाही पण आई नाचायची आणि मुलगी आता मोठ्या मोठ्या उत्सवांत वाजवते..एकूणच काय तर दुसर्यांना स्वतःच्या तालावर नाचवते असे टोमणे ऐकायला मिळाले. पण बोलणार्यांना हे दिसलं नाही की मुलं जितक्या ताकदीने वाजवू शकतात त्यांच्याच बरोबरीने मी ही वाजवू शकते... या क्षेत्रातही मुलींनी बाजी मारलीये. या क्षेत्रात माझं नाव मी स्वबळावर, स्वकष्टावर कमावलं याचं कौतुक होण्याऐवजी माझी अवहेलनाच झाली...पण माझ्या कर्तृत्वाची जाण असलेला माझा नवरा मात्र मला तिथेच मिळाला. तिथे तो माझा गुरू आणि मी त्याची शिष्य होते. माझी आई बारडान्सर आहे हे माहीत असतानाही त्याने मला लग्नासाठी विचारलं. पण माझ्यामुळे त्याच्या आयुष्याची वाताहात व्हायला नको म्हणून मी नकारच दिलेला.


पण शेवटी त्याच्या प्रेमाने मला जिंकलं आणि आम्ही लग्न केलं. त्याला आई वडील नाहीत पण इतर कोणी नातेवाईकही आमच्या लग्नाला आले नाहीत. दोघांचा संसार आनंदाने सुरू झाला, सुरू आहे. माझी आई आजारी पडली तेव्हा आम्हीच सांभाळली पण आरामाचे आणि सुखाचे दिवस कदाचित तिच्या नशिबी नव्हते त्यामुळे तीचं आजारपणातच निधन झालं. आमच्या दोघांचाही एकुलता एक आधार आम्हाला पोरकं करून गेला. ती ही तिच्या कामात खुश होती अस नाही पण आधी बापाचं घर चालवायला आणि नंतर माझं भवितव्य उज्जवल करायला ती नाचतच राहिली. मी एकदा तरी बाहेर देशात जावं ही तिचीच इच्छा होती पण ते पाहायलाच ती नव्हती. पण तिच्या आशीर्वादामुळे आणि नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे मी ते यश मिळवू शकले. माझं स्वप्न मी पूर्ण केलं,जगले आणि जगतेही. तसंच सगळ्या मुलींची स्वप्नं पूर्ण व्हावी यासाठी मी एनजीओमधूनच प्रयत्न करत असते. एकतर मुलींना खूप दुर्बळ समजलं जातं किंवा चार भिंतीच्या आत तिला स्तिमित केलं जातं. किंवा मग काही जणी माझ्यासारख्या विचित्र विळख्यात अडकलेल्या असतात...या सगळ्याजणीना त्यांच्या स्वप्नापर्यंत मला पोहचवायचय. प्रत्येकीला स्वतःच्या पायावर उभे करून यशस्वी स्त्री बनवायचं आहे. समाज माझ्याशी कसा वागतो याचा मी फारसा विचारच नाही करत पण समाजाला मी काहीतरी देण नक्कीच लागते म्हणून माझ्याकडून जितकं करता येईल तितकी मदत या युवापिढी साठी करत असते.माणूस म्हणून जगण्याचा आणि जगू देण्याचा प्रयत्न करत असते."


तिची कथा ऐकून माझे डोळे भरून आले. लहान वयात खूप काही सहन केलं होतं तिने आणि कटू गोड अनुभवातून जगायलाही शिकली होती. खूप काही गमावून कमावलंही होतं. इतका संघर्ष करून, कठीण परिस्थितीतुन, समाजाचे टक्के टोणपे खात तिने यश मिळवलं होतं आणि त्यातूनही ती समाजासाठी, मुलींसाठी जे काही महान कार्य करत होती हे ऐकून तिच्यासमोर मी फार लहान वाटू लागले. ती माझ्या नजरेत उंचावली पण मी....मी मात्र हरले. सगळंच काही सरळ आणि विनासंघर्ष मिळालेल्या माझ्यासारख्या किंवा माझ्या मैत्रिणीसारख्या अशा मुलींना, स्त्रियांना समजण्यात किंवा समजून घेण्यात किती तोकडे पडतो हे कळालं. समाजाच देणं तर दूर पण समाजातील घटकांवर कोणताही विचार न करता टीका मात्र बिनधास्त करू शकतो. इतके दिवस बारडान्सरची मुलगी म्हणून माझी नजरही काहीशी हिनवणाऱ्या नजरेत बदललेली पण आज त्या मुलीला आणि तिच्या आईलाही फार जवळून ओळ्खल्यानंतर त्या दोघीखऱ्या अर्थाने मला उमगल्या. कर्तृत्ववान मुलीसह परिस्थितीने पिंजलेली पण हिंमतवान, धाडसी अशी तिची आईही उमगली. स्त्री शक्तीच दर्शन घडलं. फक्त दिसण्या वरुन किंवा व्यक्तीच्या भूतकाळावरुन, त्याच्या परिस्थिती वरून त्याचं मूल्यमापन करू नये हेही चांगलंच समजलं.


स्त्री उमगण्यापलीकडे असते आणि मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या किंबहुना आपण वंचित ठेवलेल्या या स्त्रियांना, त्यांच्या कुटंबियांना उमगून घेणं तर महाकठीणच. समजून घेणं दूर पण आपण माणुसकीच्या नजरेनेही त्यांना पाहत नाही. पण माणुसकीच्या नात्याने व्यक्ती हळूहळू उमगत जातो हे खरं.


Rate this content
Log in