मनीच्या कानी भाग-८
मनीच्या कानी भाग-८


हाय मनी,
आता ऑनलाईन दिसलीस. आज लेक्चर नाही का? तब्येत बरी आहे ना ? काळजी वाटली. हो ..हो .सॉरी, सारखी काळजी करायची नाही असं ठरलंय आपलं. आय रिमेम्बर . पण ही काळजी आहे ना ती पॉपकोर्न सारखी पॉप अप होते अधे मधे.
काल फोनवर बोलताच आलं नाही. एवढा आवाज होता रस्त्यावर. आधीच असलेल्या ध्वनि प्रदूषणात लोकांच्या लग्न आणि हळदीच्या डी जे च्या गोंधळाची भर. कधी सुधारणार आपली ही माणस कोण जाणे ? आपला आनंद आणि बडेजाव इतक्या बटबटीतपणे जगाला का दाखवतात हे लोक? आधीच वाहतुकीची समस्या असलेल्या आपल्या शहरात रस्त्यावर मिरवणुका काढण किती चूक आहे. की कायद्याचा बडगा उगारल्याशिवाय ऐकायचं नाही अशी जनमानसाची धारणा असते ?
यासाठी सगळ्या राजकीय पक्षांच्या मिरवणुका , सणांच्या मिरवणुका बंद व्हायला पाहीजेत. सण, निवडणुकीचे प्रचार, कौतुक सगळ चार भिंतींच्या आत करा.रस्ते अडवणे हा गुन्हा ठरवला तर चित्र बदलेल कदाचित. कधी कधी वाटत लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केलेला हा गणपती उत्सव पुन्हा घराच्या आत गेला पाहिजे.त्याच्या वरून होणार हे पैश्याच राजकारण आणि उधळपट्टी थांबली पाहिजे. कसं आहे न, त्या त्या वेळी महान लोकांनी काही सामाजिक सुधारणा केल्या, त्या तेव्हाच्या राजकीय, सामाजिक समस्यांसाठी आवश्यक ही होत्या. पण अजूनही आंधळेपणाने त्या पाळत राहण किती चूक आहे ना ?
असे द्रष्टे पुढारी आता निर्माणच होत नाहीत की काय असं वाटत.किंवा विचार करू शकणारे बुद्धिवादी या फंदात पडतच नाहीत बहुधा. राजकारण हा लबाड, ढोंगी लोकांचा प्रांत आहे ही धारणा घट्ट रुजावी आणि बुद्धिमान माणसांनी याकडे पाठ फिरवावी, यासारखं दुर्दैव आपल्या देशाला लाभलंय खर.
एकंदरीत कालच्या आवाजाचा भलताच परिणाम शिल्लक आहे अजून असं वाटेल तुला. पण पुन्हा रोजच्या रहाट गाडग्यात तो परिणाम मागे पडणार, इथेच तर सामान्य माणसाची हार होते.
बाकी, तू कशी आहेस ? खूप बिझी आहेस न सध्या, म्हणून डिस्टर्ब करत नाही.
बाय.
लव यू .
मम्मा .