Sarita Sawant Bhosale

Others

2  

Sarita Sawant Bhosale

Others

मन वढाय वढाय..मायेच्या कुशीत

मन वढाय वढाय..मायेच्या कुशीत

3 mins
518


"आई अग मोठी झाली मी आता..किती काळजी करशील आणि सूचना तर किती देशील ग. हे असंच कर..ते नको करू. काम कर घरातली वगैरे वगैरे..आणि हो आता अस नको बोलू की आईपासून लांब गेलं की मग तिची किंमत कळेल..मग तिची आठवण येईल. हे रोज ऐकून पाठ झालंय माझं. उलट आता मीच हॉस्टेलला चालले तर तुलाच माझी आठवण येईल आणि मी तर कॉलेज, अभ्यास या सगळ्यात बिझी असेन..त्यात तुझ्यापासून लांब जाते तर जरा माझी सुटका होईल. मी तर मस्त एन्जॉय करेन हे दिवस.आता तर रोज विडिओ कॉलही करता येईल मग आठवण यायचा काय संबंध नाही का.मी तर मस्त आनंदातच राहीन बाबा." सुरभी हॉस्टेलची बॅग भरत भरत आईशी बोलत होती. आई बिचारी नेहमीप्रमाणे बॅगेत हे घे,ते घे करतच होती. काही करा शेवटी आईच मन ते..कठोर झालं तरी क्षणात पाघळणारं. अखेरीस आईचं बंधन नसलेलं हॉस्टेलच नवीन आयुष्य जगायला मिळणार म्हणून खूप उत्साहाने सुरभी आईचा निरोप घेऊन घराबाहेर पडली. हॉस्टेलची रूम आवरून,पसारा लावून , नवीन मैत्रिणींशी सूत जुळवून सुरभिची हॉस्टेल लाईफ सुरू झाली. पहिल्या दिवशी तर घरून आणलेल्या जेवणावरच सगळ्यांनी ताव मारला...दिवसभर प्रवासाने थकलेले जीव कधी झोपी गेले त्यांचं त्यांनाच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेज वरून येऊन जेवायला सगळ्याजणी जमल्या.. मेसच्या जेवणाचा पहिला घास तोंडात जाताच एक जण म्हणाली "आईच्या हातची चवच न्यारी". सुरभिलाही पहिल्या घासातच आईच्या हातची बटाट्याची भाजी,वरण भात... त्यावर नको नको म्हणत असताना तिने वाढलेलं दोन चमचे जास्तीचं तूप, एकच पोळी बास म्हणतानाही दुसरीही संपव ना पिल्लू माझ्यासाठी..खूप वाळलीस म्हणत ताकाचा पेला घेऊन मागे फिरणारी आई आठवली..पण मी strong girl आहे म्हणत घश्यातला आवंढा तिने घासासोबतच गिळला. मैत्रिणींशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारून ती झोपायला गेली पण झोप काही येत नव्हती. रोज रात्री आईचा प्रेमळ हात केसात फिरायचा आणि तिच्या बडबडीत सुरभी स्वप्नात कधी जायची कळायचंही नाही. आज त्या प्रेमळ हाताची आणि उबदार मायेची उणीव प्रकर्षाने भासत होती पण मी राहू शकते एकटी अस म्हणत कानात हेडफोन घालून स्वतःच्या मनाला गाण्यांच्या आवाजाखाली दबवून ती झोपली. रोज कॉलेज,अभ्यास,हॉस्टेल सगळं सुरळीत चालू होतं पण सुरभी मात्र आतल्या आत घराच्या,आईच्या आठवणीत हरवलेली असायची. रोज आईशी बोलणं व्हायचं तरीही मन मात्र आईच्या पदराभोवती घिरट्या घालायचं. ती स्वतःलाच एक प्रश्न विचारायची इथे आईची ना बंधन आहेत ना तिची बडबड,ना तिची कटकट, ना तिच्या सूचना तरीही मी इथे पूर्ण आनंदी का नाही? का आई सोबत असावीशी वाटते? येताना किती तोऱ्यात बोलून आले मी तिला की काही तुझी आठवण वगैरे मला येणार नाही...उलट मी खुशच राहीन. पण घडत तर तस काहीच नाही. दीड महिन्यांनी सुरभी आठ दिवसांच्या सुट्टीवर घरी आली..दारात समोर आईला बघताच इतके दिवस रोखून ठेवलेला बांध फुटला..आईला मिठी मारून मनसोक्त रडून तिने मन मोकळं केलं. आईला काहीही न सांगता सगळं समजलंच होत. आई प्रेमाने जवळ घेत म्हणते, "असंच असत पोरी मायलेकीच नातं.. तिथे तुला प्रत्येक क्षणाला माझी आठवण आली असणार माहीत आहे मला आणि इथे मला तुझ्याशिवाय एक क्षणही चैन पडत नव्हता. मी शरीराने फक्त इथे पण माझं मन तुझ्या भोवतीच पिंगा घालत होत बघ. प्रत्येक आई आणि मुलीचीही हीच अवस्था असते..आज माझ्या संसाराला वीस वर्षे होत आली, तुम्हा पोरा बाळांत मी इतकी रमली तरीही मला माझं माहेर, माझी आई डोळ्यासमोर आली नाहीत असा एकही दिवस गेला नाही. आज तुझी जितकी काळजी वाटते तितकीच आईचीही वाटते. इथे मी तुमच्या सगळ्यांसोबत असतेही पण मन मध्येच जाऊन आईकडे फेरी मारून येत. नाळेचं हे नातंच जगावेगळं ग आणि त्याहून हे मन विलक्षण असतं. माणसाचं मन कस पाखरासारखं असत ना त्याने कितीही उंच गगनात भरारी घेतली तरी ते आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांभोवतीच रुंजी घालतं. म्हणूनच बहिणाबाईंनी म्हंटलय "मन वढाय वढाय, उभ्या पीकांतलं ढोर, किती हांकला हांकला, फिरी येतं पिकांवर" सुरभीला मनोमन आईच बोलणं पटत..आईचे डोळे पुसत आईला म्हणते, "खर आहे तुझ्या पासून लांब गेल्यावरच मला कळलं की तू माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहेस. मी कुठेही,कितीही लांब गेले तरी मनाने तुझ्या जवळच असेन मन वढाय वढाय, लेक झाली किती मोठी आकाशाला घाली ती गवसणी तरी सुखावती ती मायेच्या कुशीत." तुमच्यातल्याही एका लेकीच्या आणि आईच्या मनाची अवस्था 'मन वढाय वढाय' अशीच होत असेल नाही का... कथा आवडल्यास नक्की लाईक,कॉमेंट्स करा आणि शेअर करा फक्त नावासहितच


Rate this content
Log in