STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

मला जगायचंय स्वतःसाठी..

मला जगायचंय स्वतःसाठी..

5 mins
204

हॅलो मी श्वेता!

माझे लग्न होऊन मी सासरी गेली आणि काही दिवसांनीच सुवर्णाची नि माझी ओळख झाली. सुवर्णा समोरच्याच मोहल्ल्यातल्या एका प्रतिष्ठित घरची सून होती. दिसायला सुंदर अन् इम्प्रेसिव असलेली सुवर्णा पहिल्याच भेटीत माझ्या मनात भरली. माझ्यापेक्षा मोठी असल्याने मी तिला ताईच म्हणायचे. पुढेही मग छोट्या मोठ्या कार्यक्रमांतून ती मला भेटत राहिली. ती एवढी भारदस्त व्यक्तीमत्वाची होती आणि चांगल्या प्रतिष्ठित, श्रीमंत घराण्याची सून होती. त्यावरूनच तिच्या पतीच्या व्यक्तिमत्वाची कल्पना मी केली होती<

एकदा घराजवळच्याच एका कार्यक्रमात मी जेवायला गेली असता एक अजागळ दिसणारा माणूस बायांच्या आणि मुलांच्या घोळक्यात बसून गप्पा मारताना मी पाहिला. त्या माणसाचं वय काय? त्याच्या त्या फालतू गप्पा, सोबतचे तरुण मुलं त्याची उडवत असलेली टर. सगळं कसं अगदीच विचित्र वाटत होतं. त्यातही त्याच्या अजागळ दिसण्याने तो अजूनच विचित्र आणि हास्यास्पद वाटत होता. कुणाच्या दिसण्यावर हसू नये हे पक्कं माहित असूनही त्याच्या विचित्र वागण्याने मात्र मला हसायला येतं होतं.


घरी आल्यावर आईंना मी त्याच्याबद्दल विचारलं अन् तो सुवर्णाचा नवरा आहे हे सांगितल्यावर तर मला हसावं की रडाव तेच कळेना! पूर्ण शॉक मधे होते मी! या अशा माणसासोबत कसा संसार करत असेल ही? हा प्रश्न नकळत माझ्या मनात आला.

पुढच्याच वर्षी आम्ही आमच्या मोहल्ल्यातल्या मंदिरात पूर्वापार सुरू असलेला शारदाेत्सव पुन्हा सुरू करायचा निर्णय घेतला. कॉलनी मधल्या सगळ्या सुना एकत्र येऊन मग आम्ही तो उत्सव अगदी आनंदाने पार पाडला. अन् इथूनच मग आम्हा सगळ्यांच्या मैत्रीची मुहूर्तमेढ रोवली गेली.

मग सगळ्या सुनांचा एक ग्रुप बनला. अन् मग भीशीच्या माध्यमातून महिन्याच्या महिन्याला भेटणं सुरू झालं. शारदोत्सव, कोजागिरी, होळी, पिकनिक आदी सगळ्या माध्यमातून आम्ही एकमेकींना सतत भेटत राहिलो.

काही दिवसांपासूनच सुवर्णाचा नवरा खूप दारू पितो, दारू पिऊन रस्त्यावर पडला राहतो अश्या दबक्या आवाजातल्या चर्चा येऊ लागल्या. तिचा नवरा आधीचाच बेवडा आणि थोडा कमी डोक्याचा होता. एवढ्या मोठ्या घरचा असूनही साधे वागण्या बोलण्याचे मॅनर्स त्याला नव्हते. अगदी घरच्या सॉ मिल मधील लाकडे तो गुपचूप चोरून विकायचा आणि पैसे मिळाले की दारु प्यायचा. खरं तर त्या मुलावर सासऱ्याचा काहीच कंट्रोल नव्हता पण तो असं वागायला लागला की सासू, सासरे, नणंद सगळे त्याचं खापर हिच्यावर फोडायचे.


ही त्याला समजून घेत नाही, त्याचा पाणउतारा करते, त्याला जवळ येऊ देत नाही म्हणून तो असा वागतो असं दुबळे समर्थन त्याच्या वागण्याचे घरचे लोकं करायचे. साहजिकच लोकांचा हिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा. त्यात हीचं टीप टॉप राहणं चर्चांना अजून उधाण आणायचं.

काही दिवसांनी हिच्या नवऱ्याचं पिणं इतकं वाढलं की त्याला व्यसनमुक्ती केंद्रात नेऊन ठेवावं लागलं.


आता तर अनेक बाया सुद्धा "नवरा तर इथे नाही पण ही बया किती मटकते नाही?" अश्या दबक्या आवाजात चर्चा करायला लागल्या. आड रस्त्यावरच्या गावी तिची असलेली नोकरी त्यामुळे एका सरांच्या गाडीवर ती जायची त्यावरूनही तिच्या चारित्र्यावर दबक्या आवाजात संशय घेतला जायचा. आमच्या ग्रुपच्या सुद्धा काही जणींना तिच्या राहणीमानाचा कॉम्प्लेक्स होता.


पण ती मात्र कसलीही तडजोड न करता आपल्या पद्धतीने जगत होती.

माझ्या स्पष्टवक्त्या स्वभावानुसार एकदिवस मी न राहवून विचारलेच तिला. "ताई तू एवढी चांगली, चांगल्या घरची तरी इथे काय बघून दिले ग तुला? लग्नाआधी काही चौकशी नाही केली का ग मुलाची?"

"आवडलं ग मला तू स्पष्टच विचारलं ते, मलाही कुठेतरी मोकळं व्हायचं होतं, ऐक तर आज माझी कर्म कहाणी." म्हणत तिने सुरुवात केली....

"माझे लग्न झाले तेव्हा मी जेमतेम अठराची होते. शिक्षण सुरू होतं. संस्था घरचीच होती. ओळखीचे म्हणून संस्थेच्या कार्यकारणीवर माझ्या सासऱ्यांना घेतलं. पण काही दिवसांनी हे संस्था हडपायचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे घरच्या लोकांनी त्यांच्या मुलाशी माझे लग्न लावून दिले जेणेकरून त्यांनी संस्थेचा ताबा घेतला तरी तो आपल्या मुलीलाच मिळेल." सुवर्णा.


"त्यावेळी यांचा मुलगा जास्त शिकलेला नाही एवढेच माहित होते पण तो अगदीच बेअक्कल आहे याची कल्पना नव्हती ग!

लग्न होऊन आले अन् हळूहळू एक एक गोष्ट उलगडत गेली. एक वाह्यात मुलगा ज्याची आई अतीलाडाने त्याचे सगळेच अपराध दुर्लक्ष करून त्याला नव्याने गुन्हे करण्यास प्रोत्साहन देत होती. असा मुलगा माझ्या वाट्याला आलेला.


सुरुवातीला गरीब गाय बनून जगले. खूप सहन केलं. मग सर्व सत्यस्थिती कळल्यावर माझ्या घरच्यांनी मला इथे संस्थेत लॅब असिस्टंट म्हणून कामावर घेतलं. त्यामुळे जगणं सुसह्य झालं थोडं. मुलं झाली, मग त्यांच्यासाठी जगले. पण मुलं यांच्यामुलासारखे वाया जाऊ नये म्हणून मी त्यांचे वायफळ लाड, खर्च नाही पुरवायची. पण मग सासरे मात्र मुलांना आवर्जून ती गोष्ट घेऊन द्यायचे. त्यामुळे मुलांच्याही नजरेत त्यांनी मला नालायक बनवलं.


मुलं दुरावत गेली, मी खूप हळहळले, खूप रडले ग. खूपदा जीव द्यायचा विचार मनात आला पण आई वडील डोळ्यांसमोर उभे राहिले. अन् मग निडर होऊन जगत राहिले, स्वतःसाठी जगत राहिले. मला जसं आवडते तसं मी जगले."


"मला आधीपासूनच नीटनेटके राहायची सवय होती. वाईट आहे का ग ही सवय? मग नाही मोडली मी ती!.


आधी आधी नवऱ्याच्या शारीरिक अत्याचाराला बळी पडले मी. पण मुलं मोठी होऊ लागली, त्यांना कळायला लागलं अन् मलाच हे सगळं लाजिरवाणे वाटायला लागले. मग मी हिम्मतीने प्रतिकार करायला शिकले. तो शुद्धीत असला तरच त्याला रूममध्ये घ्यायचं नाहीतर नाही. पुढे पुढे ह्याचं पिणं इतकं वाढलं की हा रस्त्यावर पडला राहायचा आणि कोणीतरी याला घरी आणून द्यायचे. त्याचा तो अवतार बघून अक्षरशः किळस यायची मला. शेवटी मी पण एक माणूसच न ग! आणि अशा माणसाला मी माझ्या रूममध्ये घ्यावे ही अपेक्षा. नाही घेतलं मी, सांग काही चुकलं कां माझं?


माझ्याकडून वाट्टेल त्या अपेक्षा करण्याऐवजी त्यांनी आपल्या मुलाला सुधारण्याचा प्रयत्न केला असता, त्याला समज दिली असती तर बरं वाटलं असतं मला. पण जो लग्नाच्या आधीपासूनच भरपूर प्यायचा त्याच्या पिण्यासाठी मला जबाबदार कां ठरवावं?"


" मी आता या सगळ्यातून मनाने खूप दूर गेली आहे. एक जन्म असाही म्हणत मी स्वीकारलंय हे सगळं. जे आहे त्यात आनंद शोधायचा प्रयत्न मी करतेय कुढत न बसता. तर लोकांना मी व्यभिचारी वाटतेय?


मला कळतो लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, ती दबक्या आवाजातली चर्चा. पण दुर्लक्ष करते मी या सगळ्यांकडे. कारण मला जगायचंय, माझ्या स्वतःसाठी जगायचय! मला सजायचं आहे, नीटनेटके राहायचे आहे आणि मी हे सगळे करते फक्त माझ्यासाठी, स्वतःसाठी!" सुवर्णा

ती बोलायची थांबली अन् मीच अंतर्मुख झाली. खरंच एका स्त्रीने स्वतःसाठी जगूच नये का? फक्त नवरा, कुटुंब, आईवडील यांचा विचार करतच राहावे का तिने जन्मभर?


आणि नटणे मुरडणे म्हणजे "सजना है मुझे सजना के लिये" एवढंच फक्त आम्हाला माहित असतं. जेव्हा की एवढं सजल्यावरही हा सजना "छान दिसतेस आज!" एवढे दोन शब्दही बोलायला महाग असतो.


मी एक व्यक्ती आहे, माझे स्वत:चे एक स्वतंत्र अस्तित्व आहे, मलाही काही आवडी निवडी आहेत याचा विचारच आपण एक स्त्री म्हणून करत नाही. आज मात्र मी मनात मी पक्कं ठरवलं होतं "सजना है मुझे खुद के लिये, जिना भी है मुझे मेरी खुशी के लिये......!"


Rate this content
Log in