Sanjay Raghunath Sonawane

Others

3.5  

Sanjay Raghunath Sonawane

Others

मी शेतकरी बोलतोय

मी शेतकरी बोलतोय

3 mins
173


सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी आमची अवस्था झाली आहे. पण आता आमच्या मनातील दुःख सांगायची आमच्यावर वेळ आली आहे. आमच्या विचारांचा उद्रेक झाला आहे. आमचे जगणे अवघड झाल्याने आम्हांला आमच्या व्यथा जगासमोर मांडाव्याच लागणार आहे. शेती हा आमचा परंपरागत व्यवसाय;पण तोच व्यवसाय आता करणे डोईजड झाले आहे. जीव जात नाही म्हणून आम्ही जगत आहोत. पडीक जमीन ठेवून आमच्या काळ्या आईला मान्य नाही. एकीकडे आम्ही दुष्काळाशी दोन हात करत असतो तर दुसरीकडे ओला दुष्काळ.त्यात नवनवीन प्रकारचे रोग पिकांवर पडत असतात. त्यासाठी महागडी औषधे,मजूर वर्ग हे पाहता अगोदर भांडवल खर्च करा. नंतर पिकाला एखाद्या रोगाने पछाडले तर सर्व मेहनत पाण्यात जाते. हाती फक्त दुःख व कर्ज बाजारीपणा.सुदैवाने पीक आलेच तर आमच्या पिकाला भाव नाही. आमचे कष्ट व पैसे मातीमोल होतात कारण आमच्या पिकाला सांगायची लाज वाटेल असा कवडी मोल भाव. हे पाहून रडावेसे वाटते. पण रडून आमचे दुःख, वेदना समजणार कोण?कधी कधी पिकवलेला माल कृषि बाजारामध्ये ही नेला जात नाही कारण मजूर खर्च व गाडी भाडे परवडत नाही. त्यामुळे सर्व पिकवलेला माल पुन्हा मातीत गाडावा लागतो. त्यामुळे मी चिंताग्रस्त होतो. बँकेकड़ून घेतलेल्या कर्जाचे मुद्दल ही फिटत नाही. त्यामुळे व्याजावर व्याज दुप्पट कर्ज व्हायला वेळ लागत नाही. मग आमची जमीन बँकेकडे तारण असल्यामुळे आमची काळी आई आमच्या हातून जाण्याची वेळ येते ते सहन न झाल्याने आम्हांला आत्महत्या करावी असे वाटते. कुटुंबाला तर उपाशी ठेवता येत नाही.कर्ज काढून का होईना त्यांना जगवावेच लागते. पण आमची हाक ऐकणार कोण?कधी कधी काही उन्मत्त लोकप्रतिनिधी आम्हांला शिविगाळ देखील करतात.आमची फसवणूक करतात.


कर्ज माफी जाहीर होते ती ही तुटपूंजी. खर्च लाखभर आणि मदत वीस हजार रुपये. पोकळ आश्वासने व गोंडस भाषण बाजी करून आमची मनधरनी करत असतात. सरकारकडे अजूनही शेतकर्यांसाठी ठोस योजना नाहीत. यांत्रिक अवजारे पुरेसे नाही. तूटपुंजे अनुदान ते ही जीव जायची वेळ येते तेव्हा मिळते. मग आमच्या विषयावर राजकारण केले जाते. प्रसार माध्यमाना तेव्हढीच बातमी मिळते. आमच्या बद्दल खोटी सहानुभूती व्यक्त केली जाते. थोड्या दिवस आम्हांला अनेक योजनांचे गाजर दाखविले जाते. त्यांच्या विषयावर पोटतिडकीचे भाषण सुरु होते. योजनांच्या घोषणांचा पाऊस पडतो. मात्र वास्तवात फक्त आशावादी जीवन, शून्य मदत.आम्ही आता फक्त त्यांचा मतांचा गठ्ठा आहोत. निवडणूक आली की आमच्या विषयाचे भांडवल केले जाते. कर्ज माफी जाहीर होते. सत्तेत आल्यानंतर आम्हांला झुरवत ठेवतात. थोडी थिडकी नाही तर तब्बल चार वर्षे. मग त्यांना आमचा पुळका येतो. आमची एकच इच्छा आहे ते स्वाभिमानाने द्या. शेतकरी भिकारी नाही .तो जगाचा पोशिंदा आहे. सर्व जीवांचा अन्नदाता आहे. त्याला फसविणे म्हणजे काळ्या आईला फसविणे होय. मातृभूमीला फसविणे होय. मग ही लोकशाही पोटभरु झाली आहे हे निश्चित. आम्ही आता अडाणी राहिलो नाही. तुमचे सर्व डावपेच माहिती आहे. आम्ही वाचलो तर देश वाचेल. आम्हांला जास्त हाव सुद्धा नाही. आम्हांला व आमच्या कुटुंबाला जगविता येईल एव्हढा आमच्या पिकांना हमी भाव द्या. संकटाच्या वेळी धाऊन या. वीज, पाणी वेळेवर द्या. दुष्काळ हटवा. मग आम्हांला तुमची कर्ज माफी सुद्धा नको.


Rate this content
Log in