Aditya Kulkarni

Others

3.7  

Aditya Kulkarni

Others

मी का लिहीतो ...?

मी का लिहीतो ...?

2 mins
22.7K


तसं बघायला गेलं तर मी काही लेखन क्षेत्रातला माणूस नव्हे...

लहानपणी शाळेत तास सुरु असताना खिडकीबाहेर बघता बघता धडाधड निसर्गकविता अथवा प्रेयसीकडे बघताना प्रेमकविता सुचल्यात असंही काही झालेलं नाहीये .....

अगदी एफ वाय पर्यंत साहित्य क्षेत्राशी सुतरामही संबंध आला नाही कधी ....

पण एक होतं की वाचनाची आवड लहानपणापासून .

अगदी जेवणाच्या ताटाबरोबर काहीतरी वाचायला हवंच ,आजही ती सवय तशीच आहे.

सैनिकी शाळेत असताना 50 पानांची पुर्ण वही शेरो- शाय-यांसाठी समर्पित केलेली आठवते ...काही माझ्या होत्या , बाकी इतरांच्या ....

पण खरी सुरवात झाली वक्तृत्व क्षेत्रात आल्यामुळे ..कारण विषयाची तयारी करताना बरचं लिखाण करावं लागत असल्यामुळे विचारांची प्रक्रियाही त्या पद्धतीने काम करत होती. 

त्याच दरम्यान फेसबुक वर आलो .... 

सुरवातीला वेगवेगळ्या पेज वरून पोस्ट झालेल्या कविता , ललित लेख , विनोद , वैचारिक लेख वाचून खूप इम्प्रेस झालो .

पाचकळ आणि थुकरट पोस्टलाही अगदी आनंदाने लाईक कमेंट करायचो...

वादाच्या पोस्ट वर तासंतास भांडत बसायचो (एक दोनदा नेट पॅक संपल्यामुळे सायबर मधे जाऊन भांडत बसलोय .) पण नंतर नंतर त्याचाही कंटाळा यायला लागला.तोपर्यंत विचारांची दिशा निश्चित केल्यामुळे काय योग्य आणि काय अयोग्य याचं भान यायला लागलं होतं .

वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या विचारांच्या माणसांना Add करत गेलो ..

त्यांचे विचार वाचल्यावर ( Forwarded किंवा edited मेसेज) असंही काही वेगळं असु शकतं याची जाणीव झाली. अनेक नवीन विषय कळाले आणि मग आपणही काही लिहू शकतो ही जाणीव झाली आणि मग सुरु झालं हे लेखन .

___________________________________

अरेच्चा पण मुख्य प्रश्नाचं उत्तर द्यायचंच राहिलं की .....

तर मी लिहीतो माझ्या समाधानासाठी .....

माझं मन मोकळं करण्यासाठी ....

( विचार मांडण्यासाठी नव्हे कारण सोशल मिडीयावर विचारांपेक्षा अविचारांचे आदान -प्रदान जास्त होत असते आणि इथले विचार वाचून समाज सुधारला असता तर बाकीच्या कुठल्याही गोष्टींची गरज पडलीच नसती असे माझे वैयक्तिक मत आहे.)

मला प्रबोधन करायचे नाही , सल्ला द्यायचा नाही किंवा कोणाला मार्गदर्शन ही करायचे नाही .

मला जे जाणवतं , मला जे वाटतं ते मी माझ्या भिंतीवर लिहीतो माझ्या पद्धतीने .....

समाज त्याच्या त्याच्या परीने पुढे किंवा मागे जातच असतो त्यामुळे माझ्या लिखाणाने फार मोठा सकारात्मक बदल होईल अशा भ्रमात मी बिलकूल जगत नाही....

माझं लिखाण मी समुद्रात प्रवास करणाऱ्या असंख्य बोटींपैकी एक मानतो .....

ज्याला वाटतं त्याने अल्पघटका बसावं ,गप्पागोष्टी कराव्या, समुद्र शांत असताना आनंदाने वेळ घालवावा , समुद्र खवळला असेल तर नावेत असणार्या माणसांची काय अवस्था होतं असते ते ही अनुभवावं आणि आपापलं ठिकाण आलं की पुढच्या मार्गाला लागावं .....

बस्स ......एवढंच ....!!


Rate this content
Log in