Rahul Shinde

Others

2  

Rahul Shinde

Others

महादू गेला

महादू गेला

5 mins
1.6K


सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेण्यासाठी अंगणात बसलेल्या गोदा आजीला तिच्या नातवानं, सुजीतनं फोन आणून दिला आणि फोनवरचं बोलणं ऐकून आजीनं ' माझा म्हादू..' म्हणून मोठ्यानं हंबरडाच फोडला.तिच्या आवाजानं तिची मुलगी वनिता आणि सून सुनंदा हातातलं काम टाकून अंगणात पळत आल्या.शेजारीपाजारीपण तिथं जमा झाले.

"सासूबाई, काय झालं?" सुनंदानं भांबावून विचारलं.

"आता कसं आणि काय सांगू? माझा म्हादू गेला..." गोदाआजीनं सूर लावला.

"काय ss ? माझा म्हादू दादा....असा कसा गं गेला?" वनितानं तिच्या सुरत सूर मिसळला.

"ते विचारायचं राहून गेलं की बग...माझा भाचा म्हादू ..बॅरिस्टर होता की...असा कसा गेला." आजीला धीर देण्यासाठी दोन-तीन बायका तिला खाली बसवून तिची पाठ थोपटू लागल्या.

"बॅरिस्टर कुठं? म्हादू काका तर शिपाई होता ना? " सुजीत म्हणाला तसं सुनंदानं त्याच्या पाठीत रपाटा घातला.

"मोठ्यानं बोंबलायची गरज हाय का? आरं शिपाईच होता, पण तुझ्या आजीला दुःख जड झालंय ना, म्हणून त्या दुःखाच्या भरात असं बोलत्यात.ती एक पद्धत असते." सुनंदानं हळू आवाजात त्याला सांगितलं.

"एवढ्या तरण्या माणसाला बोलवण्यापेक्षा देवानं मला का नाय बोलावणं धाडलं? " गोदाआजी म्हणाली तसं सुनंदा 'तेवढं कुठलं आमचं नशीब' असं मनात म्हणाली.

"नशिबापुढं कुणाचं काय चालतं सासूबाई? तुमी सावरा स्वतःला." सुनंदा गोदाआजीला म्हणाली.

सुनंदानं कामावर गेलेल्या आपल्या नवऱ्याला, सागरला फोन करून ही बातमी दिली आणि त्याला लगेच घरी यायला सांगितलं.

"सासूबाई, हे येतीलच इतक्यात, मग निघूया आपण ' भोर' ला.तोपर्यंत तुम्ही काहीतरी खाऊन घ्या." सुनंदा खाण्याबद्दल म्हणाली तसा गोदाआजीला जरा रागच आला.

"इथं रडून रडून डोळ्यातलं पाणी आटलं आता माझ्या, दुःखाचा डोंगर पडलाय आन असल्या परसंगी तू खाण्याचं काय इचारत्यास मला.न्हाय जायचं मला जेवण."

"गोदाबाय,तुजी सून म्हनत्या ते बरोबर हाय. तुझ्या भाच्याचं गाव दोन-तीन तासावर हाय...तेव्हडा येळ उपाशी रहावुन तुला वाटेत कुटं चक्कर बिक्कर आली तर तूज्याकडं कुनी बगायचं?" शेजारच्या आनाबाईनं समजावलं, ते मात्र गोदाआजीला एकदम पटलं आणि ती सुनंदाबरोबर घरात गेली.

"माझा म्हादू दादा मला या रक्षाबंधनाला सोन्याची नथ घेणार व्हता...आता मला नथ कोण घेईल? " वनितानं आपलं दुःख मांडलं तसं आनाबाई तिला सावरत म्हणाली,

"सगळं काय आपल्या हातात असतं व्हय.आता नथ तुझ्या नशिबातच नव्हती तर कोण काय करणार?"

"दुःख नथ न मिळण्याचं न्हाय आनाआजी...दुःख नथ देणारा माणूस गेल्याचं हाय.." वनितानं मोठ्या आवाजात रडून आपली बाजू मांडली.

"वनू वन्स' ,या तुमीपण आता थोडं खाऊन घ्या." सुनंदानं घरातून आवाज दिला.

सर्वांचं हलकंसं जेवण होतं ना होतं तोच सागर आला आणि गोदाआजी नी वनिताचं दुःख जास्तच ओसंडून वाहू लागलं.त्याने कसंबसं त्या दोघीना सावरलं आणि निघण्यासाठी सर्वजण आवराआवरी करू लागले.

"अहो,तुमीपण कायतर खाऊन घ्या ना."सुनंदा सागरला म्हणाली.

"नको,कामाला जाण्याआधी खाल्लंय की.आता भूक न्हाय.."सागर म्हणाला आणि भोरला जायला सगळे निघाले.

**

"आय,मला तर वाटतंय म्हादू काका दारुडा होता ना,म्हणूनच असं झालं असंल. दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झाली असंल." बसस्टॅण्डजवळ येता येता सुजीतनं अक्कल पाजळली तसा सुनंदानं परत त्याला रपाटा दिला.

"कायपण काय बोलतोस?" सुनंदा.

"एकदा तूच म्हणाली होतीस ना मला,तुझ्या बापाचा मावस भाऊ म्हादू लय दारुडा हाय." सुजीतनं गोदाआजी,वनिता आणि सागरसमोर सुनंदाचं पितळ उघडं पाडलं म्हणून ती कावरीबावरी झाली.काय बोलावं तिला कळेना.

"असल माझा म्हादू दादा दारुडा, पण स्वभावानं निर्मल व्हता की..मला त्यो सोन्याची नथ घेणार व्हता की." वनितानं बस स्थानकावर सूर लावला.

"वन्स',काय ती नथ घेऊन बसलाय? 'हे' घेतील तुमाला नथ कधीतरी." सुनंदा.

" काय? खरंच तू घेशील दादा!" वनिताच्या तोंडून शब्द निसटले, तसं परत ती आवाज वाढवून रडू लागली,

"दुःख नथेचं न्हाय..नथ घेणारा माणूस गेल्याचं हाय..माझा 'म्हादू' दादा गेला, त्याची आठवण म्हणून मात्र तू नथ घे दादा मला. पुन्हा कधीतरी नको, आता येणाऱ्या रक्षाबंधनालाच घे. " वनिताच्या भलत्याच प्रकारच्या भावनिक मागणीपुढे सुनंदा आणि सागरने एकमेकांकडे निर्विकारपणे बघितले.

महादू जेमतेम सागरच्याच वयाचा, शरीरानेही अगदी तंदुरुस्त. दारूचा मात्र प्रचंड नाद. दिवसातून एकवेळचं जेवण नाही मिळालं तर चालेल, पण दिवसाकाठी त्याला एक बाटली तर लागतच असे.

गोदाआजीनं फोनवर त्याच्या मृत्यूचं कारण न विचारताच फोन ठेऊन रडणं सुरु केलं, त्यामुळे त्याच्या या मृत्यूमागे अतिव्यसनाधीनता किंवा तसंच काही कारण असेल असा तर्क सुनंदा आणि सागरने लावला.भोरला पोचल्यावर सगळं काही समजणारच होतं.

***

तीन तासाच्या प्रवासानंतर एसटी भोरच्या स्टॅण्डवर आली.स्टॅन्डपासून महादूचे घर जवळच होते,त्यामुळे सर्वानुमते घरापर्यंत चालत जाण्याचा पर्याय निवडला गेला.एसटीतून सर्वजण उतरले आणि वनिता, गोदाआजीने पुन्हा मोठमोठ्याने सुरात रडणे चालू केले.

गोदाआजी तर रस्त्याने जाताना 'माझा म्हादू ', 'माझा चिमणा','माझं वासरू', 'माझं बछडं', अशा अनेक प्राण्यापक्ष्यांच्या उपमा महादूला देत होती.महादूच्या नावाने रडताना रस्त्याच्या आजूबाजूची माणसं गोदाआजी आणि वनिताकडे आश्चर्याने बघू लागली. काहीजण आपापसात कुजबूजायला लागली.

जेव्हा गोदाआजीनं 'माझा म्हादू गेला' म्हणून मोठ्यानं एकदा आरोळी ठोकली,तेव्हाच मागून प्रेताला खांद्यावरून घेऊन येणारी माणसं जागीच थांबली.सुजीतचं पाठीमागे लक्ष गेलं आणि तो सुनंदाला म्हणाला, "आय, माणूस मेल्यावर त्याचं भूत बनतं हे खरंय का ग?" सुनंदाने त्याच्या पाठीत रपाटा घातला,पण आपलं बोलणं पटवून द्यायला तो पुढे म्हणाला, "मग मागं मला गर्दीत म्हादू काका कसा काय दिसतोय?" त्याच्या या बोलण्यावर सर्वानी लगेच मागं वळून पाहिलं आणि ते बावचळलेच. त्या मृतदेह खांद्यावरून घेऊन येणाऱ्या माणसांमध्ये सर्वात पुढे म्हादू होता. जिवंत आणि धडधाकट.गर्दीतल्या सर्वानी गोदाआजीचा 'म्हादू गेला' चा गजर ऐकला होता,त्यामुळे बऱ्याच जणांची 'हसावं का रडावं' अशी गत झाली.काय बोलावं कोणाला कळेना.गडबडलेला महादू लगबगीनं गोदाआजीजवळ आला.

"आरं, म्हादू तू..तू..तू जिवंत हायस.." गोदाआजीला आनंदही व्यक्त करता येईना.ती बावरली होती.सागर, सुनंदा आणि वनितालाही काय बोलावं कळेना.

"जिवंत हायस म्हंजी?मावशे, मला काय धाड भरली? वारलेत ते आप्पा.."म्हादू म्हणाला.

"आ..आरं , पन सकाळी फोनवर तर मला.."गोदाआजी गडबडली होती.

"अगं, फोनवरही 'म्हादूचे वडील' गेले असंच सांगितलं होतं मावशे. माझ्या मित्रानं माझ्या समोरच फोन केला होता..तूच अर्धवट ऐकलंस..'म्हादूचे वडील' ऐवजी 'म्हादू' ऐकलंस वाटतं."महादू रागानं म्हणाला.

त्याचं म्हणणं बरोबरच होतं.गोदाआजीनं पूर्ण बोलणं न ऐकताच रडायला सुरुवात केली. माणूस कसा गेला, हेही विचारायचं तिच्याकडून राहून गेलं.

'आप्पा' म्हणजे महादूचे वडील वयानं नव्वदीचे, बऱ्याच दिवसांपासून आजारी होते.एक ना एक दिवस ते जाणारच होते.आजारपणाच्या त्रासातून ते अनंतात विलीन झाले म्हणून त्याचं सर्वांना तसं समाधानच होतं.

सागर आणि सुनंदाला गोदाआजीला चांगलंच खडसावायचं होतं, पण प्रसंग आणि आजूबाजूची गर्दी पाहून ते शांत बसले.'महादू जिवंत आहे' या आनंदापेक्षा गावकऱ्यांसमोर फजिती झाल्यामुळे गोदाआजीच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते. 'म्हादू दादा आहे म्हणजे आता आपल्याला हक्काची नथ मिळणार' म्हणून वनिता आपल्याच तंद्रीत खूष होती.मात्र गोदाआजी ' केवळ फोनवरचं बोलणं नीट न ऐकल्यामुळे एवढं रामायण घडलं' म्हणून मनात स्वतःलाच दूषणं देत होती.इथले दिवस उरकून गावी वापरात गेल्यावरही गोदाआजीला शेजाऱ्या पाजाऱ्यांना फोनवर 'महादूचे वडील' ऐवजी 'महादू' कसं काय ऎकलं? या प्रश्नाचा, या घोडचुकीचा खुलासा करावा लागणार होता.


Rate this content
Log in