डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

4.0  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

मेंदीच्या पानावर..

मेंदीच्या पानावर..

3 mins
221


" आई तुझ्या हातावर काढून देते ग मी मेंदी ." अवनी


"अगं राहू दे ना बेटा मला कंटाळा येतो आजकाल मेंदी लावायचा." गीता लेक अवनीला म्हणाली.


पण नुकताच मेंदीचा क्लास लावलेल्या अवनीचा गीताच्या उत्तरा नंतर हिरमुसलेला चेहरा बघून गीता मेहंदी लावायला तयार झाली.

आईने संमती देताच अवनी तिचे मेहंदी कोन नावाचे आयुध घेऊन अगदी सज्ज झाली. शिकलेल्या धड्यांची उजळणी गीताच्या हातावर होऊ लागली.


अवनी मन लावून मेंदी काढू लागली पण गीता पार भूतकाळात जाऊन पोचली.... कसली नीरस झालीय ना मी आजकाल . एकेकाळी अगदी उत्साह अन् चैतन्याचा झरा असलेली मी आज पार बदलून गेलेय ना!

एकेकाळी किती आवडायची मला मेहंदी काढायला....तेही त्या काळात...मन अजून पार भूतकाळात पोचलं गीताचं.


मैत्रिणींसोबत ची भटकंती ती शेतांच्या बांधावरून किंवा कुणाच्या कुंपणांवरून आणलेली मेंदीची पानं. घरी आणून त्यांना धुवायचे मग मस्त पाट्यावर ठेचायची मग अगदी लहानपणी आई मुठीमध्ये ती ठेचलेली मेंदी भरून वरून एखादं जून फडकं बांधून द्यायची. मग काही वेळाने ते लालेलाल रंगलेले हात मैत्रिणींना दाखवत फिरण्यात अन् न्याहाळण्यात असलेली मजा पुन्हा अनुभवल्या सारखं वाटलं तिला! मन मग अजून थोडं पुढं सरकलं की! दुकानात मिळणारं दुल्हन मेंदीचे पाउच घरी आणून ती मेंदी भिजवायची. छान रंग चढला पाहिजे म्हणून त्यात काय काय टाकायचो न आपण ते आठवून चेहऱ्यावर हलकं स्मित उमललं तिच्या. आणि मग उदबत्तीच्या काडीच्या टोकाने काढलेले पाच ठिपके. त्यातही कित्ती आनंद होता ना?


तिची एक ताई काडी ने सुद्धा खूप छान पाना फुलांची मेंदी काढून द्यायची. मेंदी भिजवताना त्यात काहीतरी घालायची ,त्यामुळे मेंदी ला छान तार तुटायचा आणि मग मेंदी छान छान आकारात काढली जायची. काही दिवसांनी तिच्या घराशेजारी एक हिंदी भाषिक काकू राहायला आल्या. त्यांनी मग तिला आणि तिच्या मैत्रिणीला मेंदी कोन्स बनवायला शिकवले अन् मग एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. तिने मग तिच्या मैत्रिणीला ,त्यांनी दुसऱ्यांना असं करत करत ती नवी पद्धत अवलंबली जाऊ लागली.अन् मग मेंदीच्या डिझाईन मधे वैविध्य येऊ लागले.


कॉलेज मध्ये मग वेगवेगळ्या मैत्रिणी मिळाल्या . काही जणी तर इतकी सुरेख मेंदी काढायच्या की अगदी बघतच राहावं. मेंदीचे नवनवे प्रकार अरेबिक वगैरे एका मैत्रिणीकडून कळले होते तिला. ती पण काढायची मेंदी बऱ्यापैकी. हात खूप साफ नव्हता त्यात तिचा पण आवड भारी. तिच्या लग्नापर्यंत तर रेडिमेड कोन चा च जमाना आलेला.अगदी कसलीच दगदग नाही आणि रंगायची हमखास खात्री यामुळे हे कोन्स अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते. त्याआधी किती चढाओढ नाही ?कुणाची मेंदी जास्त रंगते म्हणून! परत एक म्हणजे जीची मेंदी जास्त रंगते ना तिचा नवरा तिच्यावर भरभरून प्रेम करतो हा समज! मग त्या न पाहिलेल्या नवऱ्या बद्दलचं ते कुतूहल किती ना वेडेपणा?

पुन्हा हसलं मन!


मग जवळ आली लग्न घटिका मेंदीने रंगलेले दोन्ही हात अन् पाय. त्यात रेखलेले वर- वधु,अगदी छुप्या पद्धतीने रेखलेले नवऱ्याचे नाव. त्या जाणीवे सरशी अंगावर उठणारे रोमांच आता या क्षणी सुद्धा अनुभवले तीने! त्यावेळी मात्र मेंदी रंगली नाही तर? हा विचार कासावीस करून गेलेला. लग्नानंतर मेंदिभरल्या ओल्या कुंकवात बुडवलेल्या पायांनी झालेलं आगमन ..!

शेवटी ती मीलनाची घटिका त्यावेळी त्याने हाती घेतलेले ते मेंदिभरले हात अन् त्यावर उमटलेली त्याच्या ओठांची मोहर. त्या तळहातावर च्या मेंदी इतकीच प्रणयाने रंगलेली ती रात्र...!


लग्नानंतरही हौशीने सणावाराला तिचं आवर्जून मेंदी काढणं बरेच दिवस सुरू होतं. मग हळूहळू लेकरं,संसार आदी वाढलेला व्याप अन् त्या व्यापात कमी झालेलं ते वेड पाहता पाहता कधी हद्दपार झालं कळलेच नाही तिला. आता तर कुणी काढून देतो म्हणालं तरी इच्छा होत नव्हती काढून घ्यायची. किती नीरस झालं ना आपलं मन? विचारानेच कससं झालं तिला. आता मेंदीचा फक्त एकच उपयोग होता तीच्यालेखी पांढरे झालेले केस रंगवण्यासाठी!


" आई बघ ना कशी झाली मेंदी? कुठे हरवलीस तू?" पोरीच्या प्रश्नाने अलगद बाहेर आली गीता.

पोरीने काढून दिलेल्या सुंदर मेंदीचं कौतुकही वाटलं तिला.स्वतः च्या विचारांची मालिका अगदी पानांवरून हातावर अन् हातावरून केसावरच्या मेंदीवर कशी सरकली याचेही नकळत हसू आले.मेंदी कोणतीही असो बाईची काही साथ सोडत नाही हेच खरे हो!अन् मग मेंदीच्या पानावर झुलणाऱ्या आपल्या मनाला तसेच सोडून लागली ती कामाला...!


ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा. शेअर करायचा झाल्यास कुठलाही फेरफार न करता माझ्या नावा सकटच शेअर करा.साहित्य चोरी हा कायदेशीर अपराध आहे.अजून असेच लेख वाचण्यासाठी मला फॉलो जरूर करा.

धन्यवाद!



Rate this content
Log in