Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Supriya Jadhav

Others


5.0  

Supriya Jadhav

Others


मातृभाषा मराठीचे संवर्धन

मातृभाषा मराठीचे संवर्धन

2 mins 1.1K 2 mins 1.1K

बोलले शब्द पहिला

        तो शब्द मराठी.......

               लिहीले पहिले अक्षर

               ते अक्षर मराठी.......

२७ फेब्रुवारी कवी 'कुसुमाग्रज' यांचा जन्मदिवस मराठी 'राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. मराठी आपली मातृभाषा प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व असते.अगदी मुलं जन्मल्यापासून त्यांच्या कानावर मातृभाषाच पडत असते. साहजिकच लहान मुले प्रथम मातृभाषेतूनच बोलायला शिकत असतात. त्यांच्यावर होणारे संस्कार, विचारांची जडणघडण,अनेक पारंपारीक गोष्टींची, सण, उत्सव, यांची माहिती ही मातृभाषेतून होत असते. मुलांचा सर्वांगीण विकास हा मातृभाषेतूनच होत असतो.


    सध्या प्रत्येक जण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतं आहेत. काळाबरोबर इंग्रजी येणे हे गरजेचे असले तरी आपल्या मातृभाषेचे महत्व कमी व्हायला नको, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहायला हवं.....


आपल्या अनेक थोर साहित्यिकांनी आणि आपले संत चोखोबा, तुकोबा, बहिणाबाई, रामदासस्वामी, सर्व शाहीर, कवी केशवसुत या साहित्यकारांनी मराठी भाषा समृध्द केली आहे. मराठी भाषेचा अभिमान, गाैरव वाटावा असे श्रेष्ठ वैचारिक, आध्यात्मिक वाड:मय मराठी भाषेत आहे. ज्ञानेश्वरी,पसायदान,मनाचे श्लोक आणि विपुल मराठी साहित्य, काव्य रचना हा मराठी साहित्यिकांनी ठेवलेला मोलाचा ठेवा हा सध्याच्या पिढीच्या हाती सुपूर्द करायला हवा. सर्वच मराठी लोकांनी मायबोली मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करून मराठी वाचन चळवळ घरोघरी पोहोचवायला हवी.मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्य प्रकार आहेत. मराठी भाषेत जेवढी शब्दसंपत्ती आहे, एका शब्दाला असणारे अनेक पर्यायी शब्द हे जगातील कोणत्याच अन्य भाषेत नाहीत. पण सध्या मराठी भाषेवर इतर भाषा अतिक्रमण करत आहेत, विशेषत: हिन्दी. महाराष्ट्रात, मुख्यत: मुंबई मध्ये अमराठी लोकांची संख्या वाढली आहे. वर्षानुवर्षे हे लोकं इथ रहात आहेत पण इथली भाषा मात्र ते हेतुपुरस्सर आत्मसात करत नाहीत व यांची मुलं ही मराठीचा पाठ हा हिंदीतून शिकवावा यासाठी आग्रह धरतात, तेव्हा मराठी मुलांना ही काहीच वाटत नाही याचं खुप वाईट वाटतं. शिक्षकांनी व मराठी मुलांनीही याला विरोध करायला हवा.

  

 मराठी भाषेला सध्या दुय्यम स्थान दिल जात आहे. व्यवहारात हे बऱ्याच अंशी दिसून येत आहे. व्यापारी-वर्ग, फळे-भाजी विक्रेते, अगदी मराठी भाषक सुध्दा हिंदीतून बोलतात. आपल्या मराठी भाषेवर असे अतिक्रमण न होऊ देणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे आद्य कर्तव्य आहे. 


    

शासनही ही मराठी भाषेच्या वृद्धीसाठी, भाषा संवर्धनासाठी राज्यस्तरीय पातळीवर प्रयत्न करत आहे. अलिकडेच सर्व शाळांना मराठी भाषा दिवस साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. शाळेत मराठी भाषेची गोडी मुलांना लागावी व भाषा वृध्दिंगत व्हावी म्हणून निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत ही मायबोलीच्या संवर्धनासाठी खुप चांगली उपाययोजना आहे. असे विकासाचे कार्यक्रम आखल्यामुळे मराठी शाळा नक्कीच सक्षम होतील, त्याचबरोबर शाळांना सुविधा आणि वेळीच अनुदान मिळायला हवं.


 आपली मातृभाषा मुलांकडे, पुढच्या पिढीकडे जायला हवी. मायबोलीची गोडी त्यांना लागावी म्हणून आपण सर्वांनी केवळ एक दिवस मराठी भाषेवरील प्रेम दाखवून चालणार नाही तर त्यासाठी रोजच प्रयत्नशील रहायला हवे.


   बोलीन एक भाषा ती भाषा मराठी.........    

      दाखविन उद्याची आशा ती आशा मराठी.....


Rate this content
Log in