माझ्या फ्रेममध्ये मी खुश
माझ्या फ्रेममध्ये मी खुश
अनिश आणि मी दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो.. दोघांच ट्युनिंग छान जमत होतं..लाईफ पार्टनर म्हणून एकमेकांना योग्य वाटलो आणि लग्न केलं. लग्न करून सासरी आले..प्रत्येक मुलीला असतं तस थोडंफार दडपण मलाही होतच. इकडे आमचं चौकोनी कुटुंब...सासू,सासरे,मी आणि अनिश. सासू सासरे स्वभावाने गोड आणि काही बाबतीत तिखटपण. लग्न झाल्यावर मला खरंतर अनिशसोबत बिझनेस जॉईन करायचा होता पण माझे आई वडील आणि सासू सासरेही म्हणाले, आहे ती नोकरी चांगली आहे तीच कर..ठराविक रक्कम घरात येत राहील. ठराविक रकमेपेक्षा कोणाच मन मोडून त्यांच्या नजरेत मला वाईट व्हायचं नव्हतं म्हणून मी नोकरी चालूच ठेवली.
संसाराचा गाडा सुरू झालेला... घर,नोकरी,सणवार यात मी किती परफेक्ट हे दाखवण्याचा माझा अट्टाहास कुठेतरी चालू होता. बऱ्याच गोष्टी अगदी खाण्यापिण्या पासून पेहराव्यापर्यंत घरच्यांना आवडतील त्याच केल्या. कारण एकच की मला त्यांनी वाईट म्हणू नये, नावं ठरू नये..नेहमी मी चांगलीच आहे असं म्हणावं...अर्थात शंभर टक्के तस तर कधी झालं नाही...सगळ्यांची मर्जी सांभाळूनही माझ्यातल्या उणिवाच बाहेर यायच्या. या सगळ्यांत मी आतून कुठेतरी हरवले होते...माझ्यातली घुसमट आजारपणाच रूप घेऊ लागली. मानसिक स्वास्थ्य ठीक नसेल तर शारीरिक स्वास्थ्यही बिघडत म्हणतात तसच काहीसं माझ्यासोबत झालं. अनिशला माझी अवस्था कळत होती. यातून बाहेर पडायच असेल तर तुला तुझं आयुष्य तुला हवं तसं..तुला आवडत तस जगाव लागेल हे खूप प्रेमाने त्याने मला समजावलं. इतरांच्या आवडत्या फ्रेममध्ये बसायला मी मलाच विसरुन गेलेले हे त्याक्षणी मला जाणवलं आणि ठरवलं आता कोणी दुसरं चांगलं म्हणावं म्हणून नाही जगायचं तर स्वतःसाठी जगायचं.
काही दिवसांचा ब्रेक हवा म्हणून दोघे मस्त फिरायला गेलो. दोघे एकमेकांना एकमेकांची स्पेस द्यायचो त्यामुळे त्याच्यासोबत असताना माझी 'मी' म्हणूनच असायचे. ब्रेक मुळे हरवलेली मी मलाच सापडली. मनावरचं मळभ दूर झालं आणि आल्यावर नोकरी सोडून अनिशचा बिझनेस जॉईन केला. आता मनापासून आंनदी राहायला लागले. आता दोघे एकमेकांना भरपूर वेळही देऊ लागलो..सोबत वाचन,फिरणं, ट्रेकिंग करणं, पार्टी करणं सगळं मनसोक्त जगत होतो. त्याच्या माझ्या घरच्यांनी मुलाचा विषय काढला पण आम्हाला ते एवढ्यात नको होतं..सांभाळू शकत नव्हतो अस नाही पण उगाच लग्न झालं मग आता मुल हवंच या विचारांचे आम्ही नव्हतो...त्यामुळे पुढे विचार करू अस घरच्यांना सरळ सांगितलं. संसाराची गाडी अशी सुसाट वेगात पळत असताना अचानकच ब्रेक लागला. अनिश अनपेक्षितपणे निघून गेला कायमचा. एका अपघातानेच त्याचा घात केला. आजपर्यंतच्या माझ्या सुख दुःखात...माझ्यातच सामावलेला तो असा एकटीला सोडून गेला होता. पुरती कोसळले मी पण फार अश्रू गाळत नाही बसले. अश्रू गाळण ना त्याला पसंद होत ना मला. रडलं म्हणजेच शोक झाला या विचारांच्या समाजात मी राहत असले तरी मी तशी नव्हते. चार लोकांना दिसावं म्हणूनही मी रडणारी नव्हते. अनिशचं कार्य झालं आणि जरा ब्रेक म्हणून कुठेतरी जायचं ठरवलं. दुसरं तिसरं कुणी नाही तर माझी आईच म्हणाली "अग जग काय म्हणेल काय दुःख आहे की नाही तुला नवरा गेल्याच?? तुला एवढं जावस वाटतयच ना तर कोणतं तरी तीर्थक्षेत्र फिरून ये..तेवढंच लोकांना वाटेल देवदर्शनासाठी गेली." तिच्या या वाक्यावर हसावं की रडावं मलाच कळत नव्हतं...माझं जग माझ्यापासून कधीच दूर गेलेलं आणि ही नको त्या जगाची भीती मला घालत होती. मी बॅग उचलल्या आणि केरळला गेले..अनिशच्या आठवणींसोबत फिरून आले.
आल्यावर लगेच बिझनेस मध्ये लक्ष घातलं. पहिल्याच दिवशी जीन्स टॉप आणि चेहऱ्यावर हास्य बघून ऑफिसमधल्यांच्याही नजर बोलल्या हिला काही दुःख नाही वाटतं. या नजरा बद्दलल्याच पण बाहेरच्यांच्या नजराही बदलल्या..सौभाग्यवतीची मी विधवा झालेले ना. पण नाही फरक पडला मला कशाचा..कोण काय म्हणतय सगळं कळत होतं पण मला पुन्हा त्यांच्या फ्रेममध्ये जाऊन बसायचं नव्हतं. माझ्या फ्रेममध्ये मी खुश होते. घरच्यांनी दुसऱ्या लग्नाचेही प्रस्ताव समोर मांडले पण मी एकटी बाई,त्यात विधवा वगैरे वगैरे म्हणून केवळ एक आधार असावा म्हणून दुसरं लग्न मला मान्य नव्हतं. मी स्वावलंबी होते..विचारी होते..स्वच्छंदी पण. पुढे जाऊन एखादा व्यक्ती भेटला मला मी आहे तशीच मला जपणारा तर विचार करेन अस सांगून मोकळे झाले. स्वतःला बऱ्यापैकी सावरत गेले. बिझनेस, माझं फिरणं, मित्र मैत्रिणींसोबत पार्टी करणं,वाचन, मध्येच कथक,भरतनाट्यम इतकंच काय साल्सा नृत्य शिकणंही चालूच ठेवलं... नृत्यासारख्या बऱ्याच नवीन गोष्टी शिकाव्या वाटल्या की लगेच शिकले कोण काय म्हणेल याचा विचार न करता. सोबतच सामाजिक कार्यही चालू ठेवलं. अशाच एका सामाजिक संस्थेमार्फत हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि मी तिथे उपस्थित होते. सगळ्या बायकांसोबत मलाही हळदी कुंकू मी लावून घेतलं तस मी फार मोठं पाप केलं की काय अशाच नजरेने सगळ्या माझ्याकडे पाहायला लागल्या..मला मात्र आवडलं हळदी कुंकू लावलेलं..मी घेतलं लावून. अहो नाव आजही अनिशच लावतेच की माझ्यासोबत मग तेव्हा का या नजरा उठत नाहीत हे काय कळत नाही बुवा!!
आज दहा वर्षे झाली अनिश जाऊन पण माझ्या सोबत तो नेहमीच असतो. तो गेला म्हणून दुःख गोंजारत, माझं मन मारत नाही जगत बसले मी. तशी राहिले असते तर या समाजाच्या चांगुलपणाच्या व्याख्येत मी बरोबर बसले असते पण माझं मन मला आयुष्यभर खात राहिलं असतं. आज मी खूप समाधानी आहे कारण आतापर्यंत जगले मला आवडत होत तसच. एकदा दुसऱ्यांच्या मनाने जगण्यासाठी मी आटापिटा केला होता पण मला पुन्हा स्वतःला हरवायच नव्हतं. अजूनही खूप जगायचंय मला हवं तसं..जग फिरायचंय..नवीन शिकता आलं तर शिकायचंय.. वाचायचय... लिहायचय... समाजातील वंचित घटकांना हात देऊन सोबत पुढे न्यायचंय. एकदाच मिळालेला हा जन्म मला आवडतो तसं जगून सार्थकी लावायचाय. कथा वेगळी असली तरी काहीशी तुमची माझीच आहे. कोणाला स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला नाही आवडत??? पण घर, समाज ही चार लोकं काय म्हणतील म्हणून किती घुसमटून जगतो आपण...आपल्याच मनाचा बळी देण्यापेक्षा आपल्याला आवडत तस जगायला काय हरकत नाही का? बघा तर प्रयत्न करून..जाताना चार क्षण आनंदाचे आपल्याच ओंजळीत हसतील.
कथा आवडल्यास लाईक,कंमेंट्स नक्की करा.. शेअर करा फक्त नावासहितच.