Supriya Jadhav

Others

5.0  

Supriya Jadhav

Others

'माझ्या मते स्वातंत्र्य'

'माझ्या मते स्वातंत्र्य'

2 mins
706


भिशी लावायची असेल, बचत गटात यायचं असेल किंवा महिलांनी एकत्र येऊन एखादा कार्यक्रम करायचा असेल तर चार महिला एकत्र येऊन महिलांना संघटीत करू लागल्या तर काही महिला लगेच तयार होतात तर काही यांना विचारायला लागेल असं म्हणतात तेव्हा हे लक्षात येतं, मुळात या महिलांना स्वत:बद्दल स्वतंत्र विचार करायचा आहे की नाही?......

            कोणताही निर्णय घेताना, काही बाबतीत त्यांना स्वातंत्र्य असले तरी, त्या स्वत:च निर्णय घेणं टाळतात, आणि यांना विचारून सांगते, हा निव्वळ बहाणा करतात मुळात स्वातंत्र्य म्हणजे काय? सर्वांना स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हवंय?याची जाणीव तरी किती जणींना असते?

आता खेड्यातही सुधारणेचे वारे वाहू लागले आहे. मुली, महिलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलंय. महिला जागरूक होत आहेत, सक्षमीकरण होत आहे. पण सर्रास असं चित्र अजुन दिसत नाही.

          चूल आणि मूल, आणि घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना फुरसत किती मिळते? घरात जसं वातावरण असेल त्याप्रमाणे स्वत:ला अॅडजस्ट करतात. बहुतांशी शिक्षित स्त्रियांना देखील आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नसतं. पती म्हणेल तसं, किंवा घरातील ज्येष्ठ, सासुबाई जो निर्णय घेतील तो शिरसावंद्य मानावा लागतो.

            खेड्यात काही घरातील महिलांना मोठेपणाच्या नावाखाली, घोशा घराण्याचा टेंबा मिरवण्यासाठी घरातून बाहेर पडण्यास बरीच बंधने येतात. माझी एक नातेवाईक, मोठेपणा मिरवण्यासाठी तिच्या सासरच वर्णन करत होती. घोशा पध्दत , घराण्याच्या चालीरीती, घरातल्या महिलांना बाहेर जायचे असेल तर रिक्षा, गाडी अगदी घराच्या पायरीला लागलेली असते. खर तर अशा बढाया मारणे फार सोपं असतं पण निभावताना पावलोपावली

बंधने असतील तर?....…..त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने येतात, हे त्यांना ही चांगलंच माहीत असतं.

             आम्ही नाही बाई कुठे बाहेर जात, आमच्या घरी अगदी शेजारी गेले तरी नाही चालत, असं स्त्रियाच कौतुक करत असतात, आपण पारतंत्र्यात आहोत याची त्यांना जाणीव नसते असेही नाही, पण काय करतील?.......

             

               एका निष्कर्षानुसार आपल्या देशातील ४८ टक्के महिला स्वतंत्र आहेत. त्यातील काही महिला त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करत आहेत. नोकरी करून, अर्थार्जन करून कुटुंबाला हातभार लावत आहेत. पण सगळ्याच जणींना आर्थिक स्वातंत्र्य आहे का?..... काही जणींना असेल ही पण पुर्ण स्वातंत्र्य मिळते का? पुरूष मोठी खरेदी करताना पटकन निर्णय घेतात, तसा त्या घेऊ शकतात का?.....

    

                हे झालं कमावत्या स्त्रियांच्या बाबतीत. मग सामान्य गृहिणींच काय? बाजारहाट करायला गेल्या तरी हाती दिलेल्या पैशात सगळं बजेट बसवावे लागते. एखाद्या कापड दुकानात गेल्या अन एखादी साडी आवडली तर ती लगेच घेता येते का?.....

                     शहरातल्या किंवा गावातल्या स्त्रिया असो. त्यांच्यासाठी त्यांना कुटुंबात सन्मान मिळण ही त्यांच्या स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे असं मला वाटतं. कुणाच्याही दबावाशिवाय स्वत:ला पटेल ते, योग्य ते वागण्या बोलण्याच स्वातंत्र्य. एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना त्यांच ही मत विचारात घ्यावे.

               माझ्या मते स्त्री-पुरूषांच्यात समतोल साधणार स्वातंत्र्य हवं. स्वत:च्या आत्मसन्मानाला जपत, नवऱ्याचा आत्मसन्मान न दुखावता, भारतीय संस्कृतीच्या पारंपारिक मुल्यांचे जतन करणारे स्वातंत्र्य असावे. स्त्री-पुरुष संबंधात सुवर्णमध्य साधणार स्वातंत्र्य हवं. अशा स्वातंत्र्याचा यथायोग्य वापर हे खरे स्वातंत्र्य.

(वाचक मैत्रिणींनो, असं स्वातंत्र्य तुम्हाला असू ही शकत, जे मला ही आहे, पण सर्वत्र असे चित्र पहावयास मिळत नाही. तुम्हाला माझा लेख कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.

आवडला तर माझ्या नावासह शेअर करा.)


Rate this content
Log in