माझी लेखन प्रेरणा
माझी लेखन प्रेरणा


ह्या दोन वर्षात मी फेस बुक ह्या आभासी जगाला जोडले गेले. वेगवेगळ्या ग्रुपस ना ही जोडले गेले. त्यावर लिहिणाऱ्या लेखक कवि ह्यांचे लेखन वाचत राहिले. मित्र मैत्रिणी ही जोडत राहिले. अशीच माझी फेसबुक मैत्रीण वैशाली वर्तक (विनोदिनी) नियमित शुभ सकाळ बरोबर चारोळी ही फेसबुकवर टाकायची. मी वाचून तिला अभिप्राय द्यायचे. अभिप्राय देता देता मी ही तिच्या अभिप्रायात चारोळी लिहू लागले. ती ही मला वाह, सुंदर, शीघ्र कवयित्री अशी प्रोत्साहने देऊ लागली. त्याने मी ही भारावून जाऊ लागले.
शाळेत शिकवत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात थोडं फार लेखन केले होते. तसेच दिवाळी अंकात ही छोट्या मोठ्या कथाही छापून आलेल्या तेवढंच.
फेसबुकवर ग्रुपमध्ये वेगवेगळ्या काव्य लेखनच्या स्पर्धा होऊ लागल्या आणि त्यामुळे वाचन वाढले. सर्व ग्रुपचे एडमिन सरावा नंतर स्पर्धा घेत. अशाच एका गझलचा सराव मी करु लागले. आता गझल हा काव्य प्रकार अतिशय कठीण, ऐऱ्या गैऱ्याचे काम नाही, हे मला नंतर कळले. पण तेथे शिकवणारे एडमीन प्रख्यात कवि 'सुजन' होते. हे ही मला नंतर कळले. त्यांची शिकवण्याची पध्द्त आणि शिस्त जबरदस्तच होती. मतला, शेर, काफिया, रदीफ, लगावली,सगळंच डोक्यावरून जायचं. दोन चार सोडले तर बाकिच्यांची स्थिती माझ्यासारखीच होती.
गझलेच्या वेळी यमक, स्वर यमक हे शिकवलेले नीट ध्यानात राहिले. सरांनी शिकवलेले वेगवेगळे प्रकार आणि त्यांच्या अफाट ज्ञानाने मी प्रभावित झाले आणि मनान ठरवले हे एवढे महान मग आपणही थोडा प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणून जे काही नवीन शिकले त्याचा सराव करू लागले. गझलचा नाद सोडला होता पण दुसरं काही जमवण्याचा प्रयत्न चालू ठेवला आणि वेगवेगळ्या ग्रुपच्या स्पर्धेत भाग घेत राहिले आणि भावस्पर्शी, उत्तेजनार्थ, तृतीय, द्वतीय, पहिला, उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट ते समाज्ञी पर्यंत मजल मारली. कथा, लेख, काव्याचे वेगवेगळे प्रकार हे सगळं जमायला लागले आणि ठिक ठिकाणी प्रसिद्ध ही करू लागले. हे सारे शक्य झाले ते वैशूच्या चारोळ्या आणि सरांच्या शिकवणीमुळे.
वैशाली आणि सुजन सरांच्यामुळेच मी माझी लेखणी सरसावयाला प्रेरीत झाले.