माझी गौराई
माझी गौराई
आज माझी गौराई पेशवाई साडीत अवतरली. चंद्रकोर भाळून सोनेरी पावलांनी माझ्या घरात प्रवेश केला. तिच्या प्रसन्न चेहऱ्याने आणि स्मित हास्याने आज माझं घर उजळून गेल. तिच्या येण्याने घरात आल्हाददायक वातावरणाची निर्मिती झालीये. प्राजक्ताचा सडा पसरतो तसा तिच्या चैतन्याचा सडा सगळीकडे पसरलाय जणू.
आलीये आता दोन दिवस तिचे लाड कौतुक करायचे,गोड धोड खाऊ घालायचं. ती येते तो दिवस हवाहवासा वाटतो पण जातो तो दिवस नकोच यायला अस वाटतं. येते आनंदाची उधळण करत आणि जाते एक हवीहवीशी आतुरता डोळ्यात ठेवून. राहा की चार दिवस जास्त अस म्हणते तिला पण ती म्हणते नको, माझी वाट बघणारी घरी आहेत तिकडे गेले पाहिजे असं सांगते. सर्वांची ख्याली खुशाली कळाली, माहेर डोळे भरून पाहिलं,मनात साठवलं आता जाईन म्हणते.
ती गेली की वाटतं चैतन्याची पाऊलं त्यांच्या घरी चालली.
खरं तर हेही तीच हक्काचं घर आहे की पण नाही राहता येत जास्त दिवस😔.
काय करेल ती पण माहेरवाशीणच आहे ना तुमच्या माझ्यासारखी. मन इथे रमत पण जीव तिच्या संसारात गुंतलाय. जायला तर हवंच.
माहेरवाशीण, पाहुणी हे शब्द लग्न झालं की किती जिव्हारी लागतात नाही का.... सुखाची लहर आणि दुःखाची झालर दोन्ही सोबत येत या शब्दांसोबत.
ज्या घरी जन्म घेतला,जिथे वाढली,जिथे बोलायला शिकली,चालायला शिकली,बर वाईट फरक उमगला, रडले,हसले,नाचले, भांडले, जिथे संस्कार घडले तिथेच एका क्षणात लाडक्या मुलीची पाहुणी झाली. डोक्यावर अक
्षदा पडल्या आणि एका क्षणात परक घर आपलं झाल आणि आपलं घर परक झालं. नियतीचा खेळ हा विचित्र असला तरी वास्तव आहे. हा खेळ खेळावाच लागतो आणि खेळाचीही गंमत अशी की तिला विचारलंही जात नाही की तुला खेळ खेळायचा आहे की नाही.
एक मात्र खरं आहे की क्षणात परक घर आपलं करण्याची, नवी नाती स्वीकारायची आणि प्रेमाने जपायची कला फक्त स्त्री कडेच आहे. परमेश्वराने तिला ही अनोखी किमया देऊनच जन्माला घातलंय.
माझ्या गौराईला मी गेली दोन वर्षे लेकीसारखच प्रेम करते. लेकच मानते तिला मी. तिचा साज शृंगार करते. तिला गोड तिखट खाऊ घालून तिचे लाड करते. सगळे हट्ट पुरवते. जायचा दिवस आला की मात्र मन हिरमसुन जात. एका आई वडिलांची अवस्था आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातात देताना काय होत असेल याची जाणीव होते. इतकं सोप्प नसत आपल्या लाडकीला कायमच परक्या घरी पाठवून सुखाचा संसार कर म्हणणं. आज माझ्या गौराईच्या निमित्ताने मला आई वडिलांचं मन,भावना अनुभवायला मिळत.
माहेरवाशीणीच जगणं तर मी अनुभवतेच. तशी प्रत्येक माहेरवाशीण नशीबवान असते.....तिला दोन्ही घरचं, माणसांचं प्रेम मिळतं. नव्याने जुळलेले ऋणानुबंधही आयुष्यभर साथ देतात. पण कुठेतरी तिच्या मनात एक माहेरचा कोपरा असतो अगदी खास. ज्यात फक्त ती,तिच्या माहेरच्या आठवणी आणि माहेरची माणस असतात.
आज माझ्या गौराईच्या आगमनाने मन आनंदीही झालं आणि भरूनही आलं. हळव्या मनाने पुन्हा नव्याने माहेरचा कोपरा उलगडला😊.