Supriya Jadhav

Others

4.9  

Supriya Jadhav

Others

'माझी आवडती पाण्यातली भाजी'

'माझी आवडती पाण्यातली भाजी'

3 mins
1.8K


चांगल चुंगल खायला, खवय्येगिरी करायला कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडते, पण त्यातही मला अमूक पदार्थ आवडतो, तमूक आवडत नाही अशा आवडी निवडी प्रत्येकाच्या असतातच. मला ही काही अतिगोड पदार्थ आवडत नाहीत. पण माझ्या आईने मला त्यातलं थोडंतरी खावं अशी सवय लावली होती.

       आई घरात प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ बनवायची कधी माझा नावडता पदार्थ बनवला असेल तर जास्त नको खाऊ पण थोडं तरी चाखून बघावं, अशी सवय तिने मला लावली होती. परिणामता मी कसल्याचं जेवणाला नाक मुरडत नाही.


    एखादा पदार्थ पौष्टिक, सकस कसा आहे याविषयी आई मला सांगायची. तशी सवय मी माझ्या मुलींना ही लावलेय. त्यांच्या आवडीनिवडी ही पहाते. माझी आई माझ्या खाण्याच्या आवडीनिवडी अजुन ही जपते.

        शाकाहारी, मांसाहारी दोन्ही प्रकारचे पदार्थ मला आवडतात. शाकाहारात सर्व प्रकारच्या पालेभाज्या आणि भाताचे सगळे प्रकार अगदी चायनीज ही खायला आवडतात. नुसत खायला नव्हे तर बनवायला ही आवडते. पण माझा सर्वात आवडता पदार्थ कोणता आहे माहित आहे का? ती ही एक भाजीचं आहे. कोणती सांगू?.... अहो पाण्यातली भाजी...... काय म्हणता? पाण्यातली भाजी.....! कोणती म्हणता? अहो🐟 मासे हो ..... ! हसलात ना? अहो हा माझ्यासारख्या खादाडीचा एकदम फेवरेट पदार्थ आहे.

       आता माझी ही आवड ही लहानपणापासूनची आहे. माझे एक काका, दाजी म्हणायचो आम्ही त्यांना. ते आमच्या शेताजवळ मोठा ओढा आहे, जिथे तो थोड्याच अंतरावर नदीला जाऊन मिळतो.फक्त तिथेच मासे पकडण्यासाठी मोठे टोपले लावत. शेती करत हा त्यांनी छंद जोपासला होता. भरपूर मासे सापडायचे. आमच्या मोठ्या एकत्र कुटुंबासाठी पुरेसे असायचे. मग काय आमची मासे खाण्याची चंगळच असायची. ताजेताजे रस्स्यातले मासे, मसाला फिश माझी आई छान बनवायची. ती शाकाहारी आहे, पण कुटुंबातील सगळ्यांसाठी बनवून मात्र द्यायची. पावसाळ्यात भरपूर मासे मिळायचे, विशेषतः पाऊस कमी झाल्यावर श्रावण महिन्यात, पण तेव्हा आमचा मुलींचा, घरातील काकींचा

श्रावण असायचा. पण एरवी मी मनसोक्त मासे खाल्ले आहेत.

        लग्न झाल्यावर मी माझ्या पतीदेवांसोबत चिपळूणला आले. माझी खवय्येगिरी त्यांना चांगलीच समजली होती. इकडे समुद्रातले मासे मिळत असत. ते माझ्यासाठी नेहमी मासे आणत, अगदी माझ्यासाठी बंदरावर जाऊन ही फ्रेश मासे घेऊन आलेत. पतीदेवांना मासे तितके प्रिय नव्हते, पण माझ्या हातची चव चाखल्यावर त्यांना ही आवडू लागले पण, माझ्याइतके नाही. सुरमई, पापलेट, प्रॉन्स, कटला, जिताडा हे माझे आवडते मासे. आता लग्नानंतर मी स्वत: बनवू लागले होते. आणि त्यात चांगलीच पारंगत बनले. "खा बाई आता किती हादडायचे तेवढे हादड असे गमतीने म्हणायचे. अन मी ही चांगला ताव मारायचे.

      सासरी माझी ही खादाडगिरी माहित होती. कधी सासरी गेले तर माझे सासरे भोयाला घरी मासे पोहोच करायला सांगायचे. सासूबाई खुप छान करी आणि मसाला फिश बनवायच्या. चुलीवरची चव काय न्यारीच लागायची.

       आता सध्या मी पनवेलमध्ये असते. येथे ही विविध प्रकारचे मासे भरपेट खाल्ले, पण 'सुरमई' माझी एकदम फेवरेट आहे.

      आता हल्लीच दापोली जवळच्या हर्णे बंदरावर पिकनिकला जाऊन आले.

तेथे जाऊन कोकणातला निसर्ग डोळेभरून पहावा, अतिशय सुरक्षित अशा मुरूड बीचवर मनमुराद आनंद घ्यावा आणि इथल्या हर्णे बंदरावरील ताज्या माशांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा. असच मी सगळ्यांना सांगेन.

      कोकणातल्या हर्णेबंदरावर मोठ्या प्रमाणात ताजे मासे विक्रीसाठी असतात. हे बंदर मोठे फिश मार्केट म्हणून प्रसिध्द आहे. पर्यटक मनसोक्त मासे खाऊन घरी जाताना बरोबर घेऊन ही जातात. अशी एक म्हण आहे 'बंदरावर नारळ फुकट मिळतो' मी म्हणते 'बंदरावर मासे एकदम स्वस्त'.

       आम्ही दोन फॅमिली जाधव आणि काटकर फॅमिली मनमुराद आनंद लुटण्यासाठी, आणि मनसोक्त खवय्येगिरी करण्यासाठीच तेथे गेलो होतो, आणि तसेच केले.

    आम्हाला सगळ्यांनाच फिश मार्केट पहायचे होते. मग काय सगळेच गेलो. सगळ्या प्रकारचे ताजे मासे तिथे विक्रीस होते. माझ्या मुलींनी मोठे फिश हातात घेऊन फोटो काढले ,त्यांना खुप कुतुहल वाटत होते. योग्य स्वस्त भावात सुरमई, पापलेट, प्रॉन्सची खरेदी केली. आम्ही ज्या हॉटेलवर उतरलो होतो तेथे हे सगळे फिश छान फ्राय करून मिळाले. मनसोक्त ताव मारला. सोबतीला सोलकडी अहाहा......! रसना एकदम तृप्त झाली.

      फिश प्रेमींनी अवश्य या ठिकाणाला भेट द्यावी. खास त्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येथे येतात, अन् तृप्त होतात.अगदी माझ्यासारखेच.

   मार्गशीर्ष महिना आहे पण मी पाण्यातली भाजीचं खाल्लेय बरं....!

ही पाण्यातली भाजी खाण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही. मी मस्त्यप्रेमी, अगदी हावरट, मस्त्यप्रेमी म्हणालात तरी मला चालेल.

 

       तुम्हाला कसे वाटले माझे मत्स्यप्रेम आणि खवय्येगिरी कमेंट करून नक्की सांगा.



Rate this content
Log in