Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Rahul Shinde

Others

1.0  

Rahul Shinde

Others

लोक काय म्हणतील?

लोक काय म्हणतील?

7 mins
2.1K


दिलीप रस्त्याने निमूटपणे खाली मान घालून चालला आहे. मान जरा वर करावी तर आजूबाजूचे लोक त्याच्याकडे रागाने,तिरस्काराने बघत आहेत.त्याच्या जवळपासही कोणी येत नाही,सगळे चार हात दुरूनच चालत आहेत. अचानक दिलीपला रस्त्याच्या कडेला त्याचा मावस भाऊ दिसतो.दिलीप त्याला हाक मारून थांबवतो. 'आपण याला का दिसलो' या अर्थाचे भाव त्याच्या मावस भावाच्या चेहऱ्यावर आहेत.तरीही दिलीप त्याच्याजवळ जातो.तो काही बोलणार इतक्यात त्याचा भाऊच त्याला सांगतो,"मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही.समाजात राहायचं असेल तर समाजाचे नियम पाळावे लागतात.त्याचं तू उल्लंघन केलं आहेस. तू गुन्हेगार आहेस."त्याच्या मावस भावाचं हे बोलणं ऐकून रस्त्यावरचे इतर लोकही दिलीपच्या जवळ येऊन त्याला 'तू गुन्हेगार आहेस.तू चूक केली आहेस.' असे एकत्रित म्हणू लागतात.दिलीपला एका क्षणी हे सहन होत नाही.तो कानावर हात ठेवून खाली बसतो.तरीही आजूबाजूचा आवाज त्याच्यापर्यंत पोहचून त्याला अस्वस्थ करत असतो.'

दचकून दिलीप स्वप्नातून जागा झाला.निद्रावस्थेतच कितीतरी वेळ त्याला तोच स्वप्नातला आवाज कानात घाणाघात करत होता-'तू गुन्हेगार आहेस.'..त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला,पटकन पुन्हा झोप लागेना.'कसलं हे स्वप्न पडलं आपल्याला? सारखा 'त्याच' गोष्टीचा विचार करून असं झालं.नाहीतर आपण असा काय गुन्हा केलाय?' दिलीपने स्वतःची समजूत घातली, कितीतरी उशिराने त्याचा डोळ्याला डोळा लागला.

दिलीपसारखा हरहुन्नरी ,सेन्स ऑफ ह्यूमर असलेला मुलगा गेल्या काही दिवसांपासून बदलला आहे, कुठल्यातरी त्रासात दिसतो हे त्याच्या ऑफिसमधल्या काही सहकार्यांनी हेरलंच होतं.त्याच्यासोबत एकाच प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या विकासला,त्याच्या खास मित्राला तर हे प्रकर्षाने जाणवू लागले होते. दुपारी कॅन्टीनमध्ये एकत्र जेवत असताना विकासने कित्येकवेळा 'कुठला त्रास आहे का' असे विचारलेही, पण त्याने ' काही खास नाही रे' अशा स्वरूपाची वरवरची उत्तरं दिली होती.

एके दिवशी मात्र दिलीपनंच ऑफिसमध्ये असताना विकासाला व्हाट्सअँपवर संदेश पाठवला,"मला तुझ्यापासून काही लपवायचं नाही.मला तुझ्याशी बोलायचंय आणि तुझं सजेशनही हवंय."

दिलीप एका मुलीबरोबर तीन वर्षांपासून रीलेशनशिपमध्ये आहे, हे ऑफिसमध्ये फक्त विकासला माहिती होतं.कदाचित त्यातच पुन्हा काही अडचणी असतील असा अंदाज बांधून त्यानं रिप्लाय केला ,"हो,माझ्या बाजूची मिटिंग रूम रिकामी आहे.तिकडे आपल्याला प्रायव्हेटमध्ये बोलता येईल.चल."

ते दोघंही मीटिंग रूम मध्ये गेले.

"दिलीप,ट्रस्ट मी. जे सांगशील ते आपल्या दोघातच राहील." विकासने दिलीपला विश्वास दिला.

"अरे घरच्यांचा माझ्या आणि नेहाच्या लग्नाला विरोधच आहे आजून...इंटरकास्ट म्हणे! आजही आपल्यात आहेच हे.दुसरं काय तर म्हणे पत्रिकाही जुळत नाही." दिलीप व्यक्त होत होता.

"काम डाउन… इंटरकास्टमध्ये आजही अडचणी येतातच रे.थोडंसं काका-काकूंच्या बाजूनेही विचार करायला हवा, आय मीन दे आर फ्रॉम डिफरंट बॅकग्राऊंड. त्यांना वेळ द्यायला हवा रे." विकास म्हणाला.

"अरे, वेळ कसला द्यायचा? आता घाई करायला हवी..."घाईगडबडीत दिलीप हे बोलून गेला मात्र आपल्याला पुढचं बोलायची हिम्मत होत नाही म्हणून तो तसाच शांत झाला.

"घाई? नेहाची स्थळं बघायला चालू केलीत का तिच्या घरच्यांनी?"

"अ...हा,तेही आहेच.शिवाय माझंही लग्नाचं वय उलटत चाललंय ना...आता बत्तिसावं चालू आहे."दिलीपच्या या वाक्यावर दिलखुलासपणे हसत विकास म्हणाला,

"अरे, वय वगैरे काही नसतं रे. तू मनाने अजून पंचविशीचाच आहेस.."

"साल्या, तू उडव रे माझी..मला रात्रभर कधीकधी झोप लागत नाही.सतत हाच विचार..पत्रिका जुळत नाही म्हणे,पण आता पर्यायच नाही ना..." दिलीप पुन्हा बोलता बोलता थांबला.

"पर्यायच नाही म्हणजे?"

"अ ..पत्रिका बघून का आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो..आता माघार घेणं कठीण आहे." दिलीपने खुलासा केला.

"डोन्ट वरी.सगळं ठीक होईल.तू सतत तोच विचार करणं बंद कर.आय अँम विथ यु आल्वेज.."

विकासशी आज आपण बोललो,म्हणून मनावरचा भार हलका होण्याऐवजी त्याच्यापासून आपण खरं सत्य लपवून ठेवलं म्हणून दिलीप अजूनच अस्वस्थ झाला.'विकास आपला जवळचा मित्र, त्याला का आपण अर्धवट सत्य सांगितले?दिलीपच्या मनात पुन्हा विचार थैमान घालू लागले.त्याने मोबाईलमध्ये वेळ बघितली,रात्रीचे साडे अकरा वाजले होते. एक तासापासून तो आपली कूस इकडून तिकडे बदलत होता,झोप त्याच्या जवळपासही फिरकली नव्हती. तो बेडवर उठून बसला.हातात मोबाईल घेऊन त्याने व्हाट्स अँपवर मेसेज लिहायला सुरुवात केली.त्याला विकासला जे सांगायचं होतं,ते सर्व त्याने टाईप केलं.पूर्ण मेसेज टाईप केल्यावर तो सेंड करू का नको या विचारात होता.शेवटी हिम्मत करून त्याने मेसेज सेंड केला तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते.

विकास व्हाट्स अँप वर ऑनलाईन असल्यामुळे त्याने लगेच दिलीपचा मेसेज उघडला.भला मोठा मेसेज बघून विकासला जरा आश्चर्यच वाटले.तो मेसेज वाचू लागला. "सॉरी यार विकास,आज ऑफिसमध्ये तुला महत्वाचं जे सांगायचं होतं तेच मी सांगितलं नाही.धाडसच झालं नाही,म्हणून आता मेसेज थ्रू सांगतोय.दुपारी जे सांगितलं ते अर्धसत्य होतं.

इंटरकास्ट आणि पत्रिका जुळत नाही म्हणून माझ्या आणि नेहाच्या लग्नाला आई-वडिलांची परवानगी नाही,त्यात ते दुसऱ्या स्थळांबद्दल सुचवतायत..पण अरे माझं काय? माझं आणि नेहाचं तर एकमेकांवर खरं प्रेम आहे ....आणि हे वयच असं..झाली चूक,सुटला ताबा..

नाऊ, नेहा इज प्रेग्नन्ट ..म्हणून मी तुला दुपारी म्हणालो,आता घाई करायला हवी.यामुळेच सध्या टेन्शनमध्ये आहे.कसली परिस्थिती आलीय यार.खरंतर माझं पहिलं मूल म्हणून कुठेतरी आत आनंदही आहे,पण हे आम्ही कोणाला सांगू शकत नाही याचा त्रास होतो.चूक झाली मान्य आहे...कुणालाच काही माहित नाही.आई-वडील स्थळं अजूनही बघतायत माझ्यासाठी,पण आता लवकरात लवकर काहीतरी करायला हवं.”

असा अनपेक्षित मेसेज वाचून विकासला धक्का बसला.

"डोन्ट वरी..आपण उद्या भेटल्यावर बोलू.काहीतरी मार्ग नक्की निघेल. आता झोप, गुड नाईट."विचारपूर्वक त्याने दिलीपला रिप्लाय दिला.

"नाही विकास.अबॉर्शन का करायचं?दुनियेपासून हे सगळं लपवायला? चूक झालीय, पण त्याची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे.आम्हा दोघांनाही हे मूल पाहिजे." विकासने सुचवलेल्या

अबॉर्शनच्या पर्यायावर दिलीप भावनिकपणे म्हणाला.

"तुम्हा दोघांचं यावर स्पष्ट मत आहे ना? मग झालं तर ..मी आहे तुमच्यासोबत..ऐक,आता तुम्हा दोघांनाही तुमच्या आई-वडिलांना हे सांगायला हवं."

"तेच तर अवघड आहे. तिचे आई-वडील आहेत तसे ब्रॉड माईंडेड,त्यांची आमच्या लग्नालाही परवानगीही होती...पण माझे आई-वडील, ते कसं स्वीकारतील ?."

दारावरच्या बेलचा आवाज ऐकून दिलीपच्या आईने-शोभाने दरवाजा उघडला तेव्हा दारात दिलीप आणि नेहाला एकत्र बघून तिला आश्चर्य वाटले आणि दिवाणखान्यात बसलेल्या त्याच्या वडिलांना-सुभाष यांना ते दृष्टीच पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले.

...आपले आई-वडील नेहाला आतही बोलवत नाहीत हे पाहून दिलीपच नेहाला 'चल आत' म्हणाला.

"ती का आलीय तुझ्याबरोबर... काही काम आहे का?" सुभाषनी दिलीपला विचारले.

"हो, महत्वाचं काम आहे.दोघांनीही बोलणं गरजेचं वाटलं म्हणून आले आहे." नेहानेच उत्तर दिले.

"तुम्ही दोघांनीही या पूर्वी एकत्रित आम्हाला समजवायचा प्रयत्न केलाय...तेव्हा आता परत आम्हाला तुमच्या लग्नाला परवानगीसाठी राजी करण्याचा काहीही फायदा होणार नाही." सुभाष नेहाकडे कटाक्षही न टाकता दिलीपला म्हणाले.

"आम्ही काय सांगतोय ते नीट ऐकून घ्या आधी आणि मग तुमचं मत मांडा.."

निश्चयपणाने आणि थोडं कठोरपणे दिलीप म्हणाला....."नेहा प्रेग्नन्ट आहे...आम्ही दोघं आई-वडील होणार आहोत."

त्याच्या बोलण्याचा संदर्भ काही क्षणानंतर लागल्यावर शोभा 'आ'वासून दोघांकडे बघू लागली.

"काय बोलतोयस कळतंय का?आई-वडील होतात ते लग्न झाल्यावर..."मोठा अपेक्षाभंग झाल्यामुळे वेडेपिसे झाल्यासारखे सुभाष म्हणाले.शोभाला हुंदका आला आणि ती खाली बसून रडू लागली.तिला सावरायला दिलीप आणि नेहा पुढे झाले तेवढ्यात त्यांना थांबवून सुभाष म्हणाले,

"तुमचं लग्न होणं शक्य नाही..तिला अबॉर्शन करायला सांग."

"आम्हाला दोघांनाही मूल हवं आहे ."नेहाचे हे धाडसी बोल ऐकून शोभाचा पारा चढला.ताडकन उठून ती म्हणाली,"लहान आहात तुम्ही..जग नीट पाहिलं नाही म्हणून असे बोलताय.."

"तुम्ही मूल जन्माला घालण्याचा आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला तर ..मी जीव देईन..." संतापाच्या भरात बोललेले सुभाषचे हे शब्द ऐकून दिलीप आणि नेहा दोघंही आश्चर्यचकित आणि चिंताग्रस्त झाले..ते काही समजावणार इतक्यात सुभाष तावातावाने तिथून निघून गेले.

"आजच्या पिढीतले तुम्ही... शरीराने जवळ आलात तरी खबरदारी घेता येऊ नये? हे आम्ही सांगायचं का आता तुम्हाला?" काही दिवसांनी नेहाच्या आई-वडिलांना दोघांनी ही गोष्ट सांगितली तेव्हा तिच्या आईने नाराजीने प्रश्न विचारले,पण कोणताही आकांडतांडव न करता...मात्र आता वडील काय म्हणतात याकडे दोघांचे लक्ष लागले होते..

"हे थोडं अनपेक्षित आणि धक्कादायक आहे, पण आता तुम्ही मूल जन्माला घालण्याचं ठरवलं आहे तर आमचा त्याला पाठिंबाच असेल.." नेहाच्या वडिलांनी इतक्या सहजपणे हे स्वीकारलेलं पाहून दोघंही आनंदाने त्यांच्याकडे पाहू लागले...

"पण आता लवकर लग्न करा..." नेहाची आई काळजीने म्हणाली.

"तिथेच तर सगळा प्रॉब्लेम आहे..आई बाबा तयार नाहीत... अबॉर्शन करा म्हणतायत." दिलीप पुन्हा अस्वस्थ झाला.

" हे अती झालं,आधी विरोध होता तेव्हाची गोष्ट वेगळी होती..बट आता ...." नेहाच्या आईचं वाक्य अर्ध्यातच थांबलं.

"दिलीप,एक पर्याय मला दिसतोय..त्यांना cousellor ची भेट घ्यायला

सांगा..आय मीन तुम्ही तिघे एकत्र जा...पण हे सगळं लवकर.."शांतपणे समजावत नेहाचे वडील म्हणाले.

जसे जसे दिवस सरत होते तशी दिलीप-नेहा आणि दोन्ही घरची चिंता वाढत होती. अबॉर्शन बद्दल आई-वडिलांनी विचारल्यावर दिलीप त्यांना समजावू पाहत होता.कधीकधी त्याचीही चिडचिड होत होती.

'आपण समुपदेशकांना भेटू, ते आपल्याला काय सल्ला देतात ते तरी बघू.."शेवटी दिलीपच्याही खूप आग्रहाखातर सुभाष-शोभा समुपदेशकांना भेटायला तयार झाले.

समुपदेशकांकडे गेल्यावर सुभाषनी त्यांना सगळी बाजू सांगून लग्न न झाल्यामुळे लवकरात लवकर अबॉर्शन करणं कसं गरजेचं आहे हे सांगितलं.समुपदेशकांनी दिलीपचीही बाजू शांतपणे ऐकून घेतली आणि आपलं मत मांडलं,

"सुभाषजी, पत्रिकेतल्या 'गुणांचं' काय घेऊन बसलाय? दुनियेकडून बदनामी होणार हे माहित असूनही मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेणाऱ्या तुमच्या 'गुणी' मुलाच्या तुम्ही पाठीशी राहायला हवं.इंटरकास्टमुळे लोक काय म्हणतील यापेक्षा तुमचा मुलगा कशात सुखी आहे आणि तुमचं नातं कोणत्या निर्णयामुळे टिकेल याचा विचार करा."

"अहो,काय सल्ला देताय तुम्ही?" समुदेशकांचं बोलणं सुभाषसाठी अनपेक्षित होतं.

"गोष्टी तशा फार अवघड नसतात, पण आपण त्यांना आपल्या विचारांनी जास्त अवघड करतो. लोक काय म्हणतील, याला तुम्ही जास्त घाबरत आहात .पण तुम्ही हा विचार केला आहे का, सगळं लपवण्यासाठी अबॉर्शन करणं सहज शक्य असतानाही झालेल्या चुकीचा स्वीकार करून हा धाडसी निर्णय घेतला म्हणून भविष्यात कित्येकांना दिलीपचा अभिमान वाटेल." समुपदेशकांनी दिलीपची बाजू उचलून धरल्यामुळे काही अंशी त्यांचं म्हणणं सुभाष-शोभाला पटत होतं, पण त्याहीपेक्षा मनात असलेलं एकंदरीत परिस्थितीबद्दलचं भय त्यांच्या मनात जास्त होतं.

समुपदेशकांकडे ३-४ वेळा चकरा झाल्या आणि नेहाच्या आई-वडिलांनीही शोभा-सुभाष बरोबर मुक्त संवाद साधला.

"हे बघा, तुम्ही जरी विरोध केला तरी ते दोघं मूल जन्माला घालणारच आहेत.लग्न करणारच आहेत. मग नात्यात तूट होऊन समाजाशी संघर्ष करण्यापेक्षा तुम्ही त्याला साथ देऊन एकत्र संघर्ष करा ना." सामुपदेशकांचा हा सल्ला त्यांना जास्त पटला.

शेवटी 'कसेबसे' जेव्हा सुभाष-शोभा, दिलीप आणि नेहाच्या लग्नाला राजी झाले तेव्हा नेहाला सहावा महिना चालू झाला होता. 'विनाकारण लोकांमध्ये वाच्यता व्हायला नको आणि नेहाला या काळात जास्त दगदग नको म्हणून रजिस्टर्ड पद्धतीने लग्न करूया' सुभाषच्या या मताला मात्र सर्वानी मान दिला.


Rate this content
Log in