STORYMIRROR

Deepali Aradhye

Others

3  

Deepali Aradhye

Others

लेख

लेख

1 min
273

आजही 21व्या शतकात, भारत म्हटलं की संस्कृती-परंपरा-रितीभाती हे ओघाने आलेच. या सगळ्या संकल्पना जास्तीतजास्त नेमल्या गेल्या आहेत ते स्त्रियांसाठी. 'एक काळ होता' या बिरुदावलीमध्ये 'जुने लागू द्यावे मरणालागोनी' हा हव्यास झाला आहे. आणि म्हणून मनात प्रश्न उभा राहतो - 'स्त्रीमुक्ती की मुक्त स्त्री?'.


आता संसार म्हटलं की, स्त्री आणि पुरुष हे त्या रथाची दोन चाकं असतात आणि कधी काही कारणास्तव एखादं चाक निखळलं तर जीवनरथ हाकारायला तर लागतोच! हे ही एक तत्त्वज्ञान आहेच.


तसेच, या मुद्द्याला म्हणजे स्त्रीमुक्ती - संसारात स्त्री मुक्त आहे का? या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत - पैलू आहेत. ज्या पद्धतीच्या जीवनमानाला सामोरं जावं लागतं, त्यातून जे अनुभव गाठीशी बांधले जातात म्हणून 'साफल्य की वैफल्य?' या प्रश्नाच्या उत्तरावर मला वाटतं ही मुक्तता किंवा मुक्ती निर्धारित होत असते.


बघण्याचा, मानण्याचा दृष्टिकोन फार महत्त्वाची भूमिका यात पार पाडत असतो. कारण, संसार करणे हा एक व्यक्ती म्हणून 'आपला' निर्णय असतो. संसाराला आकार देणे आणि आयुष्य मार्गी लावणे-लागणे आणि त्यातूनही विसाव्याचे थांबे मिळवता येणे-मिळणे ही पण एक प्रकारची मुक्ती आहे.

तसंच योग्य वेळी या संसाराची धुरा पुढच्या पिढीच्या हाती सोपवून मार्गदर्शकाच्या भूमिकेत, सल्लागाराच्या भूमिकेत अथवा निखळ निवृत्त होणे म्हणजेही मुक्तीच.


सरतेशेवटी असं म्हणता येऊ शकतं की, स्त्रीमुक्तीपेक्षा 'मुक्त स्त्री' होणं हे जास्त जबाबदार, आश्वासक आहे. म्हणून दुसऱ्यांच्या केवळ पाठिंब्याने मात्र स्वकर्तृत्वाने 'मुक्त स्त्री' हे चिरदायी आनंदाची पुंजी आहे. जीवन साफल्याचं निधान आहे!


Rate this content
Log in