लाईफ मे ब्रेक जरुरी है
लाईफ मे ब्रेक जरुरी है




आई आज संध्याकाळी जरा उशीर होईल यायला ऑफिसमधून. भाजी निवडून ठेवा मी आल्यावर टाकते. आणि स्वयम आला की त्याला डब्यातली पोळी भाजी आणि संध्याकाळी दूध प्यायला द्या. स्मिता सासूबाईंना म्हणजे रीमा काकूंना ऑफिसला जाताना सगळ्या सूचना देऊन गेली. बाबा दुपारी स्वयमला शाळेतून घेऊन या.. ते नेहमीचे काका आज सुट्टीवर आहेत. आला की त्याचे कपडे,खाण पिणं जरा बघा हं. राघव स्मिताचा नवरा तोही अशा सूचना बाबांना म्हणजे सुधीर काकांना देऊन घराबाहेर पडला. सुधीरकाका आणि रिमाकाकू शिक्षण खात्यातले. दोघेही एक वर्षाआधीच सेवानिवृत्त झाले. मुलाच लग्न थाटामाटात लावून दिल. नातवाला सांभाळणं, घरची काही अडलेली काम करणं, सून मुलगा ऑफिसला गेले की घर सांभाळणं ही रिटायरमेंट नंतरची ड्युटी त्यांची आता चालू झालेली.
दुपारी काका स्वयमला शाळेतून घेऊन येतात. दम लागून त्यांना घामही फुटलेला म्हणून जरा विश्रांती घेतात. काकी नेहमीप्रमाणे स्वयमच्या मागे लागून,पळून त्याला पोळी भाजी भरवतात आणि त्याला झोपवतात. दुपारच्या शांततेत मनही विसावत आणि मनाशीच संवाद घडतो म्हणून काकू खिडकीत जाऊन दूरवर नजर पसरवत कोणत्यातरी विचारात गुंग झाल्या. तेवढ्यात काकांनी येऊन त्यांची शांतता भंग केली. "कुठे हरवलीस ग? एवढा काय खोल विचार करतेस अगदी खिडकीबाहेरच्या जगात हरवून?" - काका " असच उजळणी करत बसले आयुष्याची. लग्न झाल्यापासून आतापर्यंत किती धावलो दोघेही. एकावर एक स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान केलं अगदी. लग्न झाल्यावर स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघे नोकरी करत होतो. नवीन लग्न झालं तरी कुठे फिरायला नाही गेलो की वायफळ खर्च नाही केला. पैश्यास पैसा जोडून स्वतःच घर घेतलच तेव्हा वारेमाप आंनद झाला होता. एक स्वप्नपूर्ती झाली होती. नंतर वेध लागले त्या घरात कान्हाचे. राघवचा जन्म झाला आणि घराला घरपण आलं. त्याला उच्च शिक्षण द्यायचं, त्याच्या संगोपनात कसलीही कमी पडू द्यायची नाही म्हणून पुन्हा डबल स्पीडने काम सुरू केलं. त्याला सोडून बाहेर पडता येत नव्हतं म्हणून मी घरीच क्लासेस घेणं सुरू केलं. त्याला वाढवताना स्वतःला आणि आपल्या दोघांच्या जगाला पुरते विसरूनच गेलो. स्वतःच्या आवडी निवडीना किती वेळा मुरड घातली हे सांगताही यायचं नाही. त्याच्या भविष्याची स्वप्न पूर्ण करताना आपल्या स्वप्नांना आहुती दिली. त्याचे सगळे लाड,हट्ट पुरवताना आपल्या इच्छाचा बळी दिला. हौस मौज सगळंच पाठीवर टाकलं आणि संसाराचा गाढा चालवला. तेव्हा म्हणायचो एकदा रिटायर झालो की मग जगू आपलं विश्व. तेव्हा राहिलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू. पण रिटायर झालो आणि मुलांच्या स्वप्नपूर्तीच्या धडपडीत परत अडकलो. अडकलो अस नाही म्हणता येत पण आपणही थकलोय ना आता एवढं पळून. एकामागोमाग इच्छाच्या मागे धावता धावता स्वतःकडे बघणं आणि स्वतःला वेळ द्यायलाच विसरलो. आता वाटत या धकाकधकीच्या जीवनापासून थोडं लांब जावं. तुमच माझं जगायचं राहून गेलेलं जग जगावं. स्वतःला वेळ द्यावा, स्वतःची हौसमौज करून घ्यावी....आपले प्रेमाचे काही क्षण जगायचे राहून गेले ते जगावे...कोण जाणे किती क्षण उरलेत आयुष्याचे म्हणून एक छोटासा ब्रेक घ्यावाच अस वाटतंय." "बरोबर बोललीस...असा ब्रेक आपण आधीच्या आयुष्यात अधून मधून घ्यायलाच हवा होता पण तेव्हा जबाबदाऱ्या आणि आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करताना ब्रेकही गरजेचा आहे असं वाटलंच नाही आणि आता वेळ मिळालाय पण नवीन जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर आहेत." काका काकूंचा संवाद चालू असतानाच स्वयम उठतो आणि दोघेही त्याला खेळायला घेऊन जातात.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्मिता आणि राघव काका काकूंना एक छोटंसं गिफ्ट देतात कोणतंही निमित्त नसताना. काका काकू काहीसं आश्चर्याने आणि कुतूहलाने ते उघडून बघतात तर त्यात कुलुमनाली,शिमला,केरळच्या टूरची दोन तिकिटं होती. काका काही बोलायच्या आतच राघव म्हणाला, "आई बाबा तुमची छोट्याशा ब्रेकची गोष्ट स्वयम कडून आम्हाला कळाली. आतापर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप केलंत अजूनही करताय. आम्हीही तुमचा विचार करायलाच हवा आणि तुमच्या छोट्याशा ब्रेकच्या गोष्टीमुळे आम्हालाही वाटतंय या ब्रेकची गरज आम्हालाही आहेच. आम्हीही दिवसरात्र फक्त काम आणि काम करतोय. थोडाही उसंथ नाही की स्वतःला वेळ देणं नाही. त्यामुळे आम्हीही ब्रेक घेणार आहोत आता काही दिवसांचा.पुढे जाऊन आम्हालाही खंत नको वाटायला की तेव्हा थोडं थांबलो असतो स्वतःसाठी तर बरं झालं असत" तेवढ्यात स्मिता म्हणते, "घाबरू नका आई बाबा तुमच्या ब्रेकमध्ये आम्ही येणार नाही डिस्टर्ब करायला. आम्ही स्वयमला घेऊन कोकणात जायचं ठरवलंय. त्यालाही त्याच्या शाळेतून ब्रेक हवाच. आजकालच्या मुलांची शाळा म्हणजे चोवीस तास ड्युटीच झाले. दिवसभर शाळा आणि घरी आल्यावर डोक्यावर अभ्यासाची टांगती तलवार. त्यामुळे या सगळ्यांपासून दूर निसर्गरम्य कोकण अनुभवायला आम्ही तिघेही जाणार आहोत. तुम्हीही दोघे तिकडे खूप मजा करा, एकमेकांना वेळ द्या...जे काही जगायचे राहून गेले आयुष्याच्या धावपळीत ते मनसोक्त जगून घ्या. तुमच्यामुळेच खर तर आम्हाला कळलं की ही आयुष्याची गाडी कोणत्याही अपघाताशिवाय निरंतर सुरू ठेवायची असेल तर थोड्या थोड्या कालावधीने एखाद्या स्टेशनवर ब्रेक घेऊन थांबणं गरजेचं आहे. पुन्हा नव्याने नवी स्वप्नं,नवी संकट, नवी आव्हान पेलायला नवी उमेद या ब्रेक मधूनच तर मिळते." आज पूर्ण कुटुंब खुश होत या ब्रेकच्या गोष्टीमुळे. सगळेच जण तयारीला लागले. आज मावळतीची संध्याकाळ प्रसन्नतेने गोड हसत होती. काय मग तुम्ही कधी घेताय छोटासा ब्रेक? थोडीशी रिफ्रेशमेंट आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हवीच ना...राबराब राबून सरतेशेवटी दिवस मावळतीला निघाला की वाटायला नको आज हसायचं राहूनच गेलं,आज नाचायच राहूनच गेलं,आज मनसोक्त जगायचं राहूनच गेलं...आपण कामासाठी नाही तर काम आपल्यासाठी असतं...लहानांपासून मोठयांपर्यंत लाईफ मे हर एक ब्रेक जरूरी है😀. लेख आवडल्यास नक्की लाईक करा,कंमेंट्स करा आणि शेअर करा फक्त नावासहितच😊