' को जागरती '
' को जागरती '


कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. शाशिधर सोसायटीच्या सभासदांनी रात्री इमारतीच्या गच्चीत मस्त भेळ आणि मसालेदुधाचा बेत आयोजित केला होता. शनिवार आल्यामुळे सगळे खूपच relaxed आणि आनंदात होते. कोणी काय काय करायचं याची जबाबदारी प्रत्येकाला वाटून देण्यात आली होती. भेळ बनवण्याचं हातखंडा काम दुसाने आणि भगत वहिनिनी घेतलं होतं. मसाले दूध आटवण्याची जबाबदारी गोखले आणि कुळकर्णी काकूंकडे होती. लागणारं सगळं सामान बाजारातून आणून देण्याचं काम पुरुष मंडळींकडे होतं. गच्चीत लाईट ,सतरांज्याची व्यवस्था सुद्धा झाली होती. अर्थात कार्यक्रमाची प्राथमिक तयारी पूर्ण झाली होती.
सोसायटी मधला तो कंपू मात्र या समारंभात सामील नव्हता. भेळ दूध या पचपचीत आणि शाकाहारी मेनू मध्ये त्यांना अजिबात इंटरेस्ट नव्हता. मस्त बाटली उघडूया आणि नंतर चिकन रस्सा आणि पाव हाणूया या त्यांच्या बेताला त्यांच्या कंपुतल्या पाच जणांशिवाय कुणीच सपोर्ट केला नव्हता. मग त्यांनीही विशेष वाद न घालता आपला कार्यक्रम वेगळा ठरवला होता. रात्री साधारण नऊ सव्वानऊ पर्यंत सगळे गच्चीत हजर झाले. आटवलेल्या मसाले दुधाचा सुवास सगळीकडे पसरला होता. सगळी तयारी पूर्ण झाली होती.
मुलांनी गाणी, नाच, अभिनय अशा मनोरंजनाच्या सदरीकरणानी रंगत आणली होती. काही ज्येष्ठ व्यक्तींनीही नकला, गाणी सादर करून धम्माल आणली. त्याचवेळी शेडग्यांच्या घरी दारू पार्टी रंगात आली होती. या कंपू मधल्या पारखेंची पत्नी गरोदर असल्यामुळे आणि त्यांचे दिवस भरत आल्यामुळे त्या कोजागिरी समारंभात सहभागी झाल्या नव्हत्या. मिस्टर पारखे त्यांना "मी बारा वाजेपर्यंत घरी येतो. तुला काही वाटलं तर मला लगेच फोन कर" असं सांगून पार्टीला आले होते. अकरा वाजता दारू पर्टीतील बहुतेक जण टाईट होऊन पडायला आले होते. भरपूर प्यायल्याने कुणीच काही खाण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांच्या जोरजोरात बोलण्याचा आवाज गच्चीत येऊ लागला आणि सोसायटीचे सेक्रेटरी भोंडेनी आलोकला अंदाज घ्यायला खाली पाठवलं. आलोक पहिल्या मजल्यावर पोहोचला तेव्हा सगळेच आडवे तीडवे पडून बरळत होते. फ्लॅट चा दरवाजाही उघडाच होता. अलोकने हळूच दरवाजा ओढून घेतला आणि तो परत गच्चीत जायला निघाला. शशिधर सोसायटीला लिफ्टची सोय नव्हती. आलोक दुसऱ्या मजल्यावर आला तोच त्याला पारखेंच्या घरातून ओरडण्याचा अस्पष्ट आवाज आला. आलोकने दाराला कान लावून अंदाज घेतला. आवाज तर पारखे वाहिनिंचाच होता. त्याने चटकन मोबाईलवरून भोंडे काकांना फोन लावला आणि परिस्थिती सांगितली. भोंडे काका काकी आणखी एकदोघांना घेऊन खाली आले. डोअर बेल वाजवली पण पारखे वहिनींनी दार उघडलं नाही. त्यांच्या विव्हळण्याचा आवाज मात्र वाढत चालला होता. सगळ्यांचच टेन्शन वाढत चाललं होतं. शेवटी आलोक आणि भोंडे काका शेडग्यांच्या घरी धडकले. सगळेच अक्षरश: अस्ताव्यस्त पडले होते. कुणालाच शुद्ध नव्हती. कोजागिरी साजरी करण्याचं हे स्वरूप पाहून भोंडे काका खूप अस्वस्थ झाले परंतु या क्षणाला त्याचा विचार करत बसण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यांनी धीर करून पारखेंचा खिसा चाचपला आणि त्यांच्या फ्लॅटची किल्ली मिळवली. एवढं होऊनही पारखेना काहीच दाद नव्हती. किल्ली घेऊन धावतच सगळे पारखेंच्या फ्लटकडे आले. दार उघडताच भोंडे काकी धावतच आत शिरल्या. पाहतात तो पारखे वहिनी बेडरूम मध्ये वेदनेने कळवळत होत्या. त्यांना पोटात खूप दुखत होतं. भोंडे काकीना पाहताच त्यांना एकदम सुरक्षित वाटू लागलं आणि त्या रडायलाच लागल्या. पारखे वहिनी सतत त्यांच्या नवऱ्याला बोलावून घ्यायला सांगत होत्या. परंतु पारखेंची अवस्था काय होती हे फक्त भोंडेकाका आणि आलोकच जाणत होते. भोंडे काकीनी पारखे वहिनींनी कसंबसं समजावून जरा शांत केलं. थोडी कॉफी प्यायला दिली आणि एकूण परिस्थिती पाहून भोंडे पती पत्निनी त्यांना हॉस्पिटल मध्ये नेण्याचा निर्णय घेतला. तसा निर्णय घेणं अवघड होतं. पण प्रश्न दोन जीवांचा होता. पारखेना आपण नंतर सांगू असं वहिनींनी समजावून त्यांना खुर्चीवर बसवून सगळ्यांनी खाली आणलं. भोंडे काकांनी आपली गाडी गेट कडे आणली. यामध्येच पारखे शुद्धीत अलेयत का म्हणून पुन्हा एकदा आलोक पाहून आला. परंतु सगळेच जैसे थे स्थितीतच होते. भोंडे पती - पत्नी आणि आलोक वहिनींनी घेऊन हॉस्पिटल मध्ये गेले. गच्चीतला कोजागिरी समारंभही एव्हाना संपून सगळेच खाली आले होते आणि घडलेला प्रकार कळल्याने कुणीच घरी न जाता सोसायटी आवारातच हॉस्पिटलमधून येणाऱ्या फोनची वाट पहात बसले होते. रात्री दोन वाजता कुणाचातरी फोन वाजला. पारखे वहिनी प्रसूत होऊन त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद पसरला होता. फक्त या आनंदाच्या क्षणी त्या मुलाचा बाप मात्र दारूच्या नशेत हरवला होता. इतक्यात गाडीचा हॉर्न वाजला म्हणून सगळेच खाली आले. भोंडे काका आले होते. आल्याबरोबर आनंदाने त्यांनी मुलगा अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखा वाटोळ्या चेहऱ्याचा आणि गोरापान असल्याचं सांगितलं. बरीच रात्र झाल्याने सगळेच आपापल्या घरी गेले. भल्या पहाटे पारखे जरा शुद्धीत आले आणि त्यांनी आपला खिसा चाचपायला सुरवात केली. त्यांना चावी मिळेना. धावत धडपडत ते आपल्या फ्लॅटकडे आले. आपली पत्नी प्रसूत व्हायला आली आहे आणि ती घरी एकटी आहे हे त्यांच्या लक्षात आलं. काळजीने दाराबाहेरुनच ते तिच्या नावाने हाका मारू लागले. डोअर बेल वाजवू लागले. इतक्यात भोंडे काकांनी येऊन त्यांना रात्री घडलेला सगळा प्रसंग सांगितला. वयाच्या अधिकाराने थोडसं फैलावरही घेतलं. पारखेंचा सगळा कंपू एव्हाना तिथे जमा झाला होता. भोंडे काकांनी सांगितलेला सगळा प्रसंग ऐकून पारखे पश्र्चातापाने रडायला लागले आणि त्यांनी काकांचे पाय धरले. काल ही माणसं आली नसती तर आपल्या पत्नीवर काय प्रसंग ओढवला असता याची प्रकर्षाने जाणीव पारखेना झालीच त्याचबरोबर त्यांच्या पूर्ण कंपूलाही झाली.
दारू पार्टीने दोन जीव हकनाक आयुष्याला मुकले असते याची जाणीव साऱ्यांनाच झाली होती. यापुढे दारूला न शिवण्याची प्रतिज्ञा तर पारखेनी केली आणि ते तातडीने आपल्या पत्नीला आणि नुकत्याच जन्माला आलेल्या आपल्या मुलाला भेटायला निघाले.
आकाशातला पहाटेचा चंद्र गालात हसल्यासारखा वाटला. कालची कोजागिरी सार्थकी लागल्यासारखी वाटतं होती त्याला म्हणूनही असेल.
शुभं भवतू म्हणत तो ही अस्ताला जाण्याची तयारी करू लागला.