खरंच झालोय का आपण स्वतंत्र????
खरंच झालोय का आपण स्वतंत्र????
आज 26 जानेवारी निमित्त आपल्या शाळेत तुम्हा विद्यार्थ्यांच आणि सर्व पाहुणे मंडळींच सहर्ष स्वागत. यावर्षी आपल्या शाळेला पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यानिमिताने आपण आपल्या माजी विद्यार्थ्यांना इथे आमंत्रित केलंय. त्यातील बरेच जण यशस्वी इंजिनिअर, डॉक्टर,शिक्षक,ऑफिसर,लेखक झाले आहेत. त्यातीलच एक प्रसिद्ध लेखिका अवनी आपल्यासमोर अवनी ते धारदार लेखिका अवनीचा प्रवास आणि तिच्या मते स्वातंत्र्य म्हणजे काय हे सांगणार आहे. ज्या शाळेमुळे अवनी घडली त्या शाळेत तिचा होणारा सत्कार पाहून अवनीला गहिवरून आलं.
सरांचे चार शब्द संपताच स्वतःला सावरत तिने माईक हातात घेतला. एक नजर समोर बसलेल्या विद्यार्थ्यांकडे फिरवत तिने बोलायला सुरुवात केली. आज ७१वा प्रजासत्ताक दिन. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन असले की जरा जास्तच देशप्रेम जागृत होत नाही का..व्हायलाच हवं. अस म्हणतात १५ऑगस्टला भारत गुलामगिरीतुन मुक्त झाला पण खऱ्या अर्थाने २६ जानेवारी पासून भारतात लोकशाही सुरू झाली. सर म्हणाले मगाशी की माझ्या दृष्टीने स्वातंत्र्य म्हणजे काय हे मी सांगेन.. कारण आजचा आपला विषयच आहे हा...मी कशी घडले आणि माझं स्वातंत्र्य याचा खूप जवळचा संबंध आहे. दहा वर्षापूर्वी असच २६ जानेवारीला आम्ही ऑफिसकडून शहराबाहेरील एका वृद्धाश्रमास भेट देण्यासाठी गेलेलो. तिथून परतेपर्यंत रात्रीचे दहा वाजले. घरी जाताना त्या सुमसान रस्त्यावर मला फक्त दोन माणसं दिसली जी अर्धी अधिक नशेत होती आणि माझाच पाठलाग करायला लागली. मी जिवाच्या आकांताने धावत होते,वाचवा वाचवा म्हणून ओरडत होते पण जग कदाचित त्यावेळी बहिरं झालेलं असावं आणि त्या नराधमांच्या हातुन माझ्यावर बलात्कार होणं हे माझ्या नशिबीच लिहिलं असावं. होय बरोबर ऐकलत तुम्ही..दहा वर्षांपूर्वी माझ्यावर बलात्कार करून मला रस्त्यावर फेकलं गेलं..मी कशीबशी माझी ताकद एकटवून पंधरा मिनिटांवर असलेल्या माझ्या घरी पोहचले. माझी अवस्था पाहून घरात रडारड,गोंधळ सगळं सुरू झालं. सोबत शेजाऱ्या पाजाऱ्यांपासून ही घटना लपवायची धडपडही सुरू झाली. माझी आई रडत रडत सारखी म्हणत होती, "तरी सांगत होते नको नोकरी आपल्याला, लग्न करून टाका लवकर. पण आताच्या मुली जास्त शिकतात, नोकरी करून स्वतःच्या पायावर उभ्या राहतात...मानसिक आणि आर्थिक स्वातंत्र्य लाभतं त्यांना शिक्षणाने हे तुमचे बोल. मुलीची जात तिला कसलं आलंय स्वातंत्र्य आणि काय..शिक्षण,नोकरी यापेक्षाही महत्वाचं तीच शील असत. मुलीच स्वातंत्र्य म्हणजे संध्याकाळी सातच्या आत घरात येणं असत. आता कायमची अडकली ही या विळख्यात. कोण लग्न करेल अशा मुलीशी. कीती लपवा तरी लपून राहत नाहीत या गोष्टी." मुलीच स्वातंत्र्य म्हणजे त्या चार भिंतीतील तिचं सुरक्षित जीवन हे तेव्हा मला कळलं पण पटलं अजिबात नाही. त्यानंतर मी काही काळ खचले पण माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यानेच पुन्हा उभी राहिले. पोलीस केस केली. माझ्या सुदैवाने की त्या दोघांच्या कर्माने म्हणा पोलीसांच्या तावडीतून पळत असतानाच ट्रेन खाली सापडून त्या नराधमांचा अंत झाला. पण बलात्कार माझ्यावर नाही तर मीच कोणावर तरी बलात्कार केला असावा अशा गुन्हेगारी नजरेने जग मला बघत होत. सांत्वन मला कोणाच नकोच होत..पण दोषीचा पिंजराही नको होता. तरीही नेहमी मी आरोपी अशीच वागणूक समाजाकडून मला मिळा
ली. मी सगळ्याचा सामना करत स्वतःच दुःख शब्दातून व्यक्त करत गेले..जशी वाईट माणसं असतात तशी काही चांगलीही असतात..त्यांच्या आशीर्वादानेच मी आज धारदार लेखिका म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. वाटलं होतं बदलेल पण आज दहा वर्षानीही परिस्थिती जैसे थेच आहे. मुलगी अजूनही स्वतःच्या मर्जीने दिवसा रात्री कोणत्याही वेळेत एकटी फिरू शकत नाही.आजही सातच्या आत घरातचा लेबल तिच्यावर थोपला गेलाय. आजही स्वतःच्या जोडीदाराच्या निवडी बाबत स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. विवाहित स्त्री आजही कमावती असली तरीही आर्थिक बाबतीत नवऱ्यावरच अवलंबून आहे. माझी आईच आज ६० वर्षाची होऊनही बाहेर जाताना बाबांकडूनच पैसे मागते. आज पर्यंत तिने संसार नेटाने चालवला पण जस मुलं किती जन्माला घालायची हे तिच्या हातात नव्हतं तसंचअजूनही आर्थिक स्वातंत्र्य नाही तिच्या पदरी. आजही स्त्रीला तिचं करिअर सोडून मुलं संसार सांभाळावच लागतं. कधी पुरुष का ही जबाबदारी स्वीकारत नाही आणि स्त्री नोकरी,व्यवसाय ब्रेक न घेता करत नाही?? पुरुषप्रधान संस्कृती जी वर्षोनुवर्षे चालत आलीये आणि ती चालणारच. काही अपवाद असू शकतील पण आजही स्त्री पुरुष समानता नाहीच. पुरुष कधीही मनाचा आवाज ऐकून गेले फिरायला,गेले मित्रांना भेटायला...स्त्री करू शकते अस?? मूलं,घर,संसार आणि परवानगी या चार गोष्टीतून तिला फुरसत मिळाली तरच तिच्या स्वतंत्र जगाचा ती विचार करू शकेल. काय वाटतं तुम्हाला झाली आहे का आजची नारी स्वतंत्र??? स्रीभोवती घातलेल्या कुंपणातून आपण झालोत का स्वतंत्र??? माझ्या मते 'स्त्रीचं स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार' हे मिथक समूळ नष्ट होत नाही तोवर तिला तीच स्वातंत्र्य उपभोगता येणार नाही. तिचं स्वातंत्र्य म्हणजे तीच मुक्त फिरणं, मुक्त विचार मांडण, तिच्या सोबत तिच्या शीलाची समाजानेही आदरतेने जपणूक करणं, सातच्या आत घरात हे ब्रीदवाक्य संपुष्टात येणं,उपभोगाची वस्तू न समजता स्त्री म्हणून तिचा सन्मान होणं, उघडपणे तिचं मेडिकलमध्ये सॅनिटरी नॅपकिन मागणं, विधवा वारांगना अशा ज्या काही वर्गवारी असतील त्यांना नष्ट करणं, उदरातच तीच अस्तित्व न मिटवता तिचा जन्म आनंदाने स्वीकारण,तिच्यावर कोणताही अन्याय होऊच नये पण तिच्यावर अन्याय झालाच तर आरोपीला कडक आणि ताबडतोब शिक्षा होणं, माहेरी आणि सासरी दोन्हीकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं म्हणजेच खर स्वातंत्र्य. असं स्वातंत्र्य नाही मिळालं तर तो तुमचा हक्क आहे मुलींनो तो तुम्ही कोणत्याही परिस्थित मिळवाच पण स्वतंत्र व्हा,स्वतंत्र राहा, स्वतंत्र विचारसरणीसोबतच जगा. मुलांना एवढंच सांगेन की शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन एक मुलगी,स्त्री नंतर पण त्याआधी एक व्यक्ती आहे जिला मन,भावना,संवेदना आहेत त्यांचा आदर करा....स्वतःच्या बरोबरीने तिलाही जगु दया मुक्त.उंचच उंच भरारी घेउ द्या.
लाभला हा स्रीजन्म भरभरून जग
इतरांची होता होता स्वतःचीही हो
खोल आत दडलेल्या 'तू'लाच तू जाण
तुझ्या अस्तित्वाला तू नव्याने जग
मुक्त जगुनी तू मुक्त हो मुक्त हो
लेख कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट्स मध्ये सोबतच तुमच्यामते स्वातंत्र्य म्हणजे काय हे सांगायला विसरू नका. लेख आवडल्यास नक्की लाईक करा,कंमेंट्स करा आणि शेअर करा फक्त नावासहितच.