STORYMIRROR

Meghana Suryawanshi

Others

4  

Meghana Suryawanshi

Others

खोपा

खोपा

4 mins
375

      पिवळसर फुलांच्या पायघड्या, मंडपास तांबट केशरी फुलांची तोरणे, दुरवर नजर जाईल तिकडे तांबुस पिवळसर रंगाचे दालनास पडदे, दालनाच्या वरील बाजूस लाल रंगांचे नक्षीदार झुंबर, दुरवर दृष्टीचे तीर जावे आणि दृष्टीपटलांवर फक्त आणि फक्त आगळ्यावेगळ्या रंगांची उधळण दिसावी अशा नयनरम्य आसमंतात सुर्यनारायणांचे मनमुराद स्वागत झाले. स्वागतासाठी संथ धुन वाजविणाऱ्या नदीच्या संगतीस मन मंञमुग्ध करून टाकतील अशी पक्षांची गाणी होती. त्यांस दाद म्हणून वृक्षवल्ली आपले बाहू पसरून मनसोक्त आनंद लुटीत नाच करीत होते. तृणांनी मोत्यांचे दागिने परिधान केले होते. समस्त विश्वास सुशोभित करतील असा काही सोहळा! शिवारांतील पिके वार्‍याच्या मंद झुळुकेच्या साथीने डोलत होते. मंदिरातील घंटानाद ने कर्ण तृप्त झाले , नंदादीप च्या मंद प्रकाशात मंदिरातील भिंतीवरील नक्षीकाम उठावदार दिसत होते. वर्णन करीता करीता शब्द अपुरे पडतील अथवा सोहळ्याचे रेखाटन करता करता चिञकाराचे रंग अपुरे पडतील! नैसर्गिक चित्रकाराची स्पर्धा ती कोणी का करील? वास्तविक कुंचल्यांतील रंग कधीच संपत नाही परंतु तयार करण्यात आलेल्या रंगांत ती काय मज्जा? असो पण, या नयनरम्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यास का कोणास आवडणार नाही?

       ही अशी मज्जा सिमेंटच्या जंगलात कुठे अनुभवण्यास मिळते? कधी चार दिवस आपल्या माणसांत गावी आले की अशा नयनरम्य वातावरणाचे साथीदार होण्याचे लाभ मिळतात. दिवसभर थकून रात्रीच्या निरव शांततेत झोपी गेलेले डोळे आपसूकच पहाटे कौलांतून येणाऱ्या किरणांच्या कारंज्यात उघडतात. अंगणातील प्रातःकाळी पडलेल्या फुलांच्या सड्यामुळे मन प्रसन्न होऊन तिकडे अधांतरी उडत जाते. नाहीतर एरवी शहरांत सकाळी लवकर उठू वाटत नाही. पहाटे मोकळ्या हवेत एक फेरफटका मारल्याशिवाय पाय थिजवत नाहीत. भल्या पहाटे रस्त्यांच्या दुतर्फा पडलेल्या पाण्याच्या सड्याने नैसर्गिक अत्तराची कुपी जवळ बाळगून असल्याची अनुभुती येते. दुरवर चालतच राहू वाटते. पाय थकून जातात परंतु, मनाची अधांतरी धाव कधीही थांबत नाही. अंतर कापत असताना काही चार माणसे सोबतीस मिळतात, आपोआप ओळख होऊन जाते. सगळीकडील विषय निघतात, सर्वांची खुशाली कळते. पाखरांची गुज, चतुष्पादांच्या लीलांनी मन मोहरते. चालून चालून थकून गेलेले पाय शेतांच्या कडेस विश्रांतीस थांबतात. हिरव्यागार पाचूंवर मोत्यांचे आच्छादन पाहण्याची गंमतच निराळी! जवळच असणाऱ्या विहीरींवर पक्ष्यांच्या कलाकुसरींच्या लीला पहायला मिळत. नैसर्गिक कारागिर असणारे ते पक्षी आपल्या कामात मग्न असत. त्यांची कारागिरी पाहिली असता मनात लगेच बहिणाबाईंनी त्यांच्या कारागिरीला दाद दिलेल्या चारोळी येतात. 

      अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला 

      देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला !

अगदी माणसाप्रमाणे तेही भविष्याच्या ओझ्यात गुरफटून जातात. अगदी बारकाईने निरीक्षण केले असता एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे चार भिंतींच्या आत धडे न गिरवता देखील त्यांनी आयुष्याच्या शिक्षणाची पदवी घेतली आहे. मग ते गवताच्या एकेक धाग्यांची घट्ट विणलेली विण ते तिथून पिल्लांच्या उडण्याच्या प्रवासापर्यंत होणारी मनाची घालमेल. 

      असाच एक खोपा आमच्या झाडास विणला गेला होता. तो लहानसा पक्षी आजुबाजूने ओल्या गवतांचे धागे आणत आणि इवल्याशा चोचीने त्यांची विण फांदी सोबत घट्ट करण्यास धडपडत असे. जेव्हा तो पक्षी एकसारखा गवत घेऊन येत असे आम्हास कुतूहल वाटे. आमचे बरेच लक्ष त्याच्या येण्या जाण्याकडे असे. दुरवर भटकंती करून तो खोप्यास साजेशे गवत आणी. गवतच काय आजुबाजुस पडलेल्या कापडांचे धागे, इवलासा कापूस, झाडांची पाने ही खोप्याची सामग्री होती. आम्ही लपून त्या कारागिरीचे बारकाईने निरीक्षण करीत असू. स्वतःचा तोल सांभाळत तो पक्षी भविष्याच्या तोल सांभाळत असे. बघता बघता काही दिवसांत खोपा पुर्ण होई. खोपा बघितला की मनात प्रश्न येई, की हे पण आपल्या सारखे शिकतात काय? त्यांच्या कल्पना शक्तीस दाद द्यावी तेवढी कमीच! एखादे गवत टोचून जाऊ नये म्हणून खोप्याच्या बुडास मऊ कापसाचे आवरण असे, पावसाचे पाणी आत शिरू नये म्हणून खोप्यास झाडाच्या पानांचे छप्पर असे. खोपा पुर्ण झाला तरी आमचे कुतूहल थांबत नसे. त्याच्या अनुपस्थित आम्ही कायम खोप्यामधी डोकावून पाहत असू. आमचे अगदी बारकाईने लक्ष असले तरी आम्हाला उमजत नव्हते की, अंडी कधी घातली. बोक्यांसाठी ती एक पर्वणीच असे, त्यांची तृष्णा काही कमी होत नव्हती. परंतु शेवटी ती एक आईच, असे कसे पिल्लांना संकटात पाहिल? बघता बघता काही दिवसांत लहान आत्म्यांचे सुंदरशा जगात आगमन होई. इवलासा लाल मांसाचा गोळाच जणू! ती इवलीशी चोच, सतत भुकेने आवासलेली. आम्हास आई सांगत, आता खोप्याजवळ जाऊ नका हो, त्यांच्या आईने पाहिले तर ती पिल्लांस नाकारेल. लगेच मनात प्रश्नांची सरबत्ती तयार होई. इतकी प्रेम करणारी ती आई एवढ्याशा कारणापाई निष्ठुर का होत असावी? 

       मग आम्ही सारखे खोप्यामध्ये डोकावून पहायचे टाळत असू. आम्ही लांबूनच त्यांचे निरीक्षण करायचो आणि त्यांची प्रत्येक छबी आपल्या जीवनाशी तोलत असू. त्या इवल्याशा मांसल गोळ्यांचे डोळे बंद असले तरी त्यांना आई आल्यावर तिची चाहुल लागे. बंद चोची भुकेच्या काहुरतेने आवासत. आम्ही टाकलेले दाणे कधी पक्ष्याने टिपले नाहीत, स्वावलंबी असावा बहुधा! त्यांची पिल्लांना पाणी पाजण्याची पद्धत पाहून आम्ही अवाकच झालो आणि जाणवले आपल्यात आणि त्यांच्यात फक्त शब्दाचा फरक आहे . तो पक्षी कापसाचा गोळा पाण्यातून बुडवून आणत असे आणि लहानशा चोचीत धरून पिल्लांची तृष्णा भागवी. काही दिवसांत मांसल गोळ्यांचे रूपांतर मऊ कापसाच्या गोळ्यांत झाले! इतके दिवस सुस्त बसलेले शरीर बाहेरच्या जगाची भ्रमंती करण्यास धडपडत असे. तिथल्या तिथे होणार्‍या पंखांच्या फडफडीत जरा चार पावलं उडण्याचे बळ येई. अशा वेळेस आईची मात्र द्विधा मनस्थिती होत असे. पिल्लांच्या गगनविहाराची स्वप्न पाहत असलेले तिचे मन बाहेरच्या जगातील कपटांनी कावरेबावरे होत असे. 

    परंतु बाहेरच्या जगास किती काळ घाबरावे याची समज त्या आईला नक्कीच होती. कितीही परंतु असले तरी ते लढवय्या विचारांच्या पाठी दडून जात. एकटेच भरारी घेण्यास घाबरत असलेले ते पंख आईच्या साथीने उंच झेप घेत. उंचीवरून सुरक्या मारीत. आईच्या शाळेत स्वावलंबनतेचे धडे गिरवत पाखरे मोठी झाली आणि अशीच स्वावलंबनतेची शिदोरी जवळ बाळगून ती पिल्ले खोपा कायमचा अनोळखी करून निघून गेली. सर्वजण आपापल्या स्वप्नपूर्तीच्या पाठीमागे दाही दिशां! आणि तो खोपा एकटाच फांदीस आठवणींचा झुला झुलत राहीला. 


Rate this content
Log in