Dr.Smita Datar

Others

4  

Dr.Smita Datar

Others

खेळ

खेळ

8 mins
15K


 “ साई ssss सुट्ट्यो ...” सुमी च्या अंगात वीरश्री संचारली होती. खेळून खेळून तिचा मूळचा गोरा रंग लालबुंद झाला होता. नकट्या नाकावर सगळ्यांना हरवल्याचा सार्थ अभिमान विराजमान झाला होता. सोनेरी केसांच्या दोन घट्ट वेण्या, गाठीची परकर चोळी,लाल गोबरे गाल धुळीने माखलेले, सुमीचा पार अवतार झाला होता. माधवदादा तत्परतेने परसातल्या आडाच पाणी शेंदायला लागला. दुपारी लवंडलेली मोठी माणसे उठायच्या आत , वानरसेना हात पाय धुऊन स्वच्छ व्हायला हवी होती. आज नेहमी प्रमाणे परत माधव दादा चा गट जिंकला होता. यमुताई धुसफूस करत होती. श्रीकांत दादा तिचा गटप्रमुख होता. पण त्याला नुकतच अठराव लागल्या मुळे तो फक्त देखरेखीच काम स्वतः कडे घेत असे. या लहान मुलांबरोबर उनाडक्या करण आता त्याला आवडत नसे. शिवाय त्याच्या लग्नाची बोलणी पण वाड्यात सुरु झालेली. दीक्षितांच्या वडिलार्जित पेढीवर ही तो आता कोट, टोपी घालून अण्णांबरोबर जाऊ लागलेला. तो गाल्यातल्या गालात हसत , माधवला पाणी शेंदायला मदत करायला लागला. तितक्यात धाकले मालक पाणी काढताहेत बघताच महादु मामा धावतच आडावर पोहचला.

        खेळणाऱ्या मुलांमध्ये सगळीच असायची . स्वतःला सुधारक समजणाऱ्या दिक्षितांच्या वाड्यात, दीक्षितांची मुले श्रीकांत, माधव, यामिनी, गोदा , सई बरोबरच पूजा सांगणाऱ्या गणेश भटजींची सुमी, कमी, मोहन, पेढीचे हिशेबनीस, शास्त्रीबुवांची मुल , सुरेंद्र, महेंद्र, विभा, कारकुनांची , आचाऱ्यांची मुल, एवढंच काय महादुमामाचा भिवा पण असायचा.

        यमुताईचा आरोप होता, दररोज माधवचा गट जिंकतो , त्यामुळे या गटाला कायमचं हद्दपार करावं आणि इतरांना जिंकायची संधी द्यावी. माधवदादा तिला मनातल्या मनात हसत , सुमी बरोबर विजयोत्सव साजरा करत होता.दहा वर्षांची सुमी होतीच चुणचुणीत. पाढे, परवचा , अभ्यासातही हुशार. खेळातल तिचं कसब वाखाणण्याजोग होत. छापापाणी , सूरपारंब्या, सागरगोटे..ती सगळ्यांपेक्षा अव्वल खेळायची. पण माधवचा गट बाजी मारायचा , ती लपंडाव आणि आंधळी कोशिंबीर मध्ये. सगळी मुल लपली की सुमी बेधडक सरसर वर चढून जाई. दीपमाळ असो, माड असो, वाड्याची भिंत असो की विहिरीचा काठ, तिला भीती म्हणून कशाची वाटत नसे. डोळ्याचं पात लवत न लवत तो ती वर चढून सर्वाना पाहून घेई . माजघर, कोठीघर, मांगर , न्हाणी ..कुठे कुठे लपलेल्या मुलांचा माग ती माधवदादा आणि गटातल्या ईतर मुलांना अचूक सांगे. माधवदादाला लहानपणापासूनच अंधाराची आणि उंचीची भीती वाटे. खेळातही तो यथातथाच पारंगत होता. म्हणून सुमी त्याचा हुकुमाचा एक्का होती. दोघांचही हे खेळ जिंकण्याचं गुपीत होत. सुमी ने मोर्चेबांधणी करावी, चपळाई करावी आणि गटाने त्या बरहुकुम खेळ जिंकावा. त्या बदल्यात माधवदादा सुमीला कारखान्यातून रंगीत शिंपले, मणी, मुंबईच्या लाल फिती, दुर्बीण..असं काहीबाही देत असे. पण त्यांचं हे खेळातलं गुपीत दोघही कोणाला सांगत नसत.

                  निरभ्र मनांनी खेळता खेळता, सगळेच सवंगडी मोठे होत होते. मोठ्या मुलांनी खेळातून काढता पाय घेतला होता . श्रीकांत चं लग्न झालं. श्रीकांत, माधव घरातल्या कर्त्या पुरुषांबरोबर पेढीवर जाऊ लागले. दिक्षितांचा धंदा उत्तरोत्तर झपाट्याने वाढत होता. पंचक्रोशीत दिक्षितान्कडेच गलबते होती. तळी गावातून समुद्रातून गलबते मुंबईकडे शंख, शिंपले, मोती असा कच्चा माल घेऊन जात.,मुंबईला बटनांच्या कारखान्यात पोहचवत आणि तयार मालाची गलबते पुन्हा विजयदुर्गला बंदरात येत. हा तयार माल , मसाले, नीळ परत थेट पोरबंदर , कराची पर्यंत रवाना होई. श्रीकांत ला मधल्या काळात राजयक्ष्म्याने गाठल्याने तो फक्त काकांबरोबर स्थानिक व्यवहार, शेती वाडी , जमीन जुमला पाही.

                 माधव इंग्रजी बुके शिकलेला, व्यवहारात कुशल म्हणून तो कायम गल्बातांबरोबर जाई.व्यापार त्याने उत्तम सांभाळला होता.वाढवतही होता. दिक्षितांकडे लक्ष्मी पाणी भरत होती.श्रीकांत, माधव दोनच मुलगे. बाकी साऱ्या मुली. मुली एक एक करून सासरी गेल्या. सख्खं चुलत असं काही दिक्षितांकडे नव्हतंच.श्रीकांत चे वडील गेल्यावरही माधव च्या अण्णांनी वाहिनीना आणि श्रीकांत , गोदाला काही कमी पडू दिल नव्हत. कोठीच्या चाव्या अजूनही वहिनींकडेच होत्या आणि माधवच्या आईलाही मोठी जाऊ सासूबाईच्या ठिकाणी होती .

          माधवच स्थळ असं तालेवार, दृष्ट लागण्याजोग. माधवसाठी स्थळांची रीघ लागली.गर्भश्रीमंतांची कावेरी त्याला सांगून आली.माधवच्या आईला साध्या घरातली मुलगी हवी होती. पण देखणी कावेरी सगळ्यांनाच पसंत पडली.धूमधडाक्यात लागलेल्या लग्नात सोन्याच्या अक्षता सांडल्या आणि मोत्यांनी सवाष्णींच्या ओट्या भरल्या गेल्या.आठ दिवस तळी गावात कोणाकडेच चूल पेटली नाही. दीक्षितांच्या वाड्यावर तुपाच्या आपोष्णीपासून पानविड्यापर्यंत सगळ आग्रहाने साजर होत होत.लग्नात सुमी मिरव मिरव मिरवली.लग्न करून माधव लगेच गलबत घेऊन निघाला.तो परत येईपर्यंत इथे कावेरी मोठी झालेली. माधव आल्यावर लगेच गर्भाधान विधी झाला. जेमतेम एक महिना माधव वाड्यावर राहिला आणि महिन्याने परत गलबत घेऊन तो कराचीकडे रवाना झाला.

         .....आणि वाड्यावर आक्रीत घडलं. एका रात्री कावेरीने केळीच्या बागेतल्या आडात उडी टाकली.माधवच्या आईच्या भोवती अख्खा वाडा गरकन फिरला. पायाखालची जमीन निसटली. गेला महिनाभर कावेरीचा अबोलपणा आणि म्लान चेहरा त्यांच्या नजरेतून सुटला नव्हता.पण गर्भाधानानंतरचं हवंनकोपण असेल म्हणून त्या गप्प राहिल्या होत्या. आता कर्माला दोष देत होत्या.काय घडलं असाव ?कुणालाच अंदाज येईना. थोरामोठ्यांच्या घरचं प्रकरण म्हणून कुणी उघड चर्चा करत नव्हते , पण तर्क कुतर्कांना उधाण आलेलं. गणेश भटजी मनातल्या मनात स्तोत्र म्हणून पूजा करून जात होते, जणू मोठ्याने आरत्या म्हटल्याने वाड्याची शांतता भंग पावली असती. सुमी नेमाने येऊन काकू आणि माधवच्या आईची चौकशी करून जात असे. स्वयंपाकीण काकूंना सूचना देऊन जात असे. तेवढीच काय ती वाड्यावर हालचाल.

           वाड्यावर जणू वास्तुपुरुष रुसला होता.कावेरीचा आत्मघात, श्रीकांतचा राजयक्ष्मा, तोळामासा तब्येत, श्रीकांतच्या लग्नाला चार वर्ष उलटूनही पाळणा हलला नव्हता. दीक्षितांना वारस लाभेल ना, माधवच्या आयुष्याचं गलबत किनाऱ्याला लागेल ना ? माधवची आई आज पोफळीच्या बागेत येरझाऱ्या घालत होत्या.समुद्रातल्या लाटांसारखे मनातले विचार हेलकावे खात होते. दूरवर दिसणाऱ्या दगडी विजयदुर्गाला जणू त्यांची नजर विचारत होती, आमच्या वैभवाचा साक्षीदार ना रे तू ? का आज असा पाषाणवत उभा ? का आज दिक्षितांचा वाडा अबोल झालाय ? त्यांचे अश्रू एकेका प्रश्नाचा प्रतिध्वनी बनून टपटपत होते.

           वर्ष ..दोन वर्ष वाडा जणू सुतकात होता. आता मात्र अण्णांनी आणि माधवच्या आईने एकमताने गणेश भटांच्या सुमीसाठी शब्द टाकायचं ठरवलं. मोठ्या वहिनींची पण पसंती होतीच. सुमी हुशार, सुंदर आणि तरतरीत होती, शिवाय वाड्यावरच लहानाची मोठी झालेली. माधव आणि सुमीच्या वयात थोडं अंतर होत, पण ते गौण वाटलं सर्वाना. गणेशभट आधीच दीक्षितांच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबलेले होते. त्यात सुमी जाणती झालेली. सहा मुलींपैकी एक उजवली तर गरीबीतला हा भार नक्कीच थोडा हलका होणार होता. त्यातून अण्णांनी सांगितलं, आम्हाला फक्त मुलगी आणि नारळ द्या . एवढ तालेवार स्थळ, महिन्याभरासाठीच तर बिजवराचा ठपका लागलेला.आणि धाकटे मालक तर डोळ्यासमोरच वाढलेले, सुशील, कर्तृत्ववान. नशीब काढलं सुमीन . गणेशभटांनी डोळ्याला उपरणं लावलं.

            वाड्यावर साध्याश्याच कार्यक्रमात विवाहविधी आणि गर्भाधान विधी एकत्रच उरकले. आत्ता आता पर्यंत वाडाभर धावपळ करणाऱ्या सुमीन आज हिरवा शालू नेसला होता, माधवच्या आईन तिला सोन्याची वेणी, सोन्याचा बाजूबंद, कमरपट्टा , चिंचपेटी , मोहनमाळ , हिऱ्यामोत्यांची नथ सगळ्या दागीन्यांनी मढवून टाकली. सुमीन सलज्ज चेहऱ्यान हलकेच माप ओलांडलं आणि हळद कुंकवाच्या पावलांनी वाड्यात धाकटी मालकीण म्हणून प्रवेश केला. माधवदादाच्या कडेवर बसून केलेला हट्ट,उंचावर चढून सर्वांचा केलेला भोज्जा , अंधारात शिरून सगळ्यांना शोधून काढून ‘ साईसुट्ट्यो ‘ करण, आपलं खेळातलं गुपीत जपणाऱ्या सवंगड्यासोबतच लग्न होण, सुमीला सप्तपदीच्या एक एक पावलात आज सगळ सगळ आठवलं होत. अजूनही त्या आठवणींनी मनातल्या मनात तिला हसू फुटत होत. इतक्यात केशरदुधाचा चांदीचा पेला कुणीतरी तिच्या हातात दिला आणि त्यांच्या खोलीचा चंदनी दरवाजा बंद झाला.

              गर्भाधानानंतर जेमतेम पंधरा दिवसात माधव परत प्रवासाला निघाला. सुमीच्या चेहऱ्यावरची नाराजी जास्तच गडद झालीये , असं उगीच माधवाच्या आईना वाटून गेलं. होणारच पोर नाराज.असा कितीसा सहवास मिळाला बिचारीला पतीचा ? अर्धे दिवस तर मांडव परतवणी , सत्यनारायण यातच गेले.नव्या सुनेकडे इतकं टक लावून बघण बर नाही बर सासूबाई, माधवच्या आईने स्वतःलाच दटावलं. ईश्श ...इकडची स्वारी कधी तालुक्याला गेली दोन दिवस, तरी अजून सैरभैर होते मी , ही तर काय बोलून चालून नवी नवरी . या वयात तर जास्तच ओढ असायची एकमेकांची. चालायचंच. तशी समजूतदार आहे सुमी. शिवाय हुशार, गुणी. नारळी पोफळीवर आल्यापासून लक्ष देतेय. भात मोजून घेतेय कुणब्याकडून. दिक्षितांना खर तर अशीच कर्तबगार सून हवी होती. आता एकदा हिची कूस उजवली की धन्य होईन मी.विचारांच्या भोवऱ्यातच त्यांनी माधवच्या हातावर दह्याची कवडी ठेवली आणि त्याला निरोप दिला.

               या वेळचा माधवचा मुक्काम सहा महिने लांबला. मुंबईच्या कारखान्यात तशी त्याने तार पाठवली . इथे दीक्षित वाडा मात्र सुमीच्या कौतुकात मग्न होता. सुमीला पाचवा नुकताच संपला होता. ‘ चोर ओटी ' नुकतीच भरून झालेली सुमी तेजाळत होती.मोठ्या वहिनीना आणि माधवच्या आईला सुमीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होत. श्रीकांतची बायको पण आपलं दु: ख विसरून सुमीचे डोहाळे पुरवत होती. वाड्याला नव्या युवराजाचे वेध लागले होते. बाळंतपण दीक्षितच करणार असं गणेशभटांना सांगून वहिनी मोकळ्या झाल्या होत्या. 

              आज माधव घरी आला. वाड्यात शिरा पुरी चा दरवळ पसरला. रात्री चंदनी दाराआड सुमी उभी होती. गर्भाने जडा वलेली, पण चेहऱ्यावर करारी तेज असलेली. प्रश्नांच्या आवर्तनात भेंडोळलेल्या माधवच्या नजरेला नजर दिली तिने आणि म्हणाली, “ का असा खेळ मांडलास असं विचारणार सुद्धा नाही तुम्ही मला ? माधव हडबडला . चाचपडत म्हणाला, “ सुमे, मला माफ कर. घरात हे सगळ सांगायचं धाडस झालं नाही माझं. पण मी.. माझे.....मी तुझा आणि कावेरीचा सुद्धा अपराधी आहे. पण तू गर्भार आहेस सुमे?" माधवच्या चेहऱ्यावर पराभव आणि आश्चर्य एकत्र मिसळल होत.

             विध्द हरिणीसारखी सुमी उद्गारली, तुम्ही गेल्यावर मी नाराजच होते. तुमच्या वागण्याचा अर्थच लागत नव्हता. बायको म्हणून स्वीकारलं नव्हत तुम्ही मला, मग लग्न का केलं याचा विचार करत होते.मला वाटलं कावेरी ताईच्या आठवणीनी तुम्हाला अजून बांधून ठेवलय. लगेच गलबत घेऊन तुम्ही निघून गेलात. एक दिवस कपाटात आवरा आवरी करताना संदुकीत तुमची आणि कराचीच्या सुलेमान शहा ची प्रेम पत्र मिळाली. माझ्या मनात धरणीकंप झाला. तुमचे त्या कराचीच्या व्यापाऱ्याशी ..शी.. .एकीकडे आयुष्याला मिळालेलं स्थैर्य, काकू आणि आईंच प्रेम, मान मरातब , वडिलांना झालेलं सुख आणि एकीकडे हा मोडलेला रडीचा डाव..आयुष्य फाटून फाटून गेलं.मी पण अवसेच्या रात्री पुळणीवर धावले, समुद्र जवळ करायला. पण..पण अण्णांनी मागे ओढलं, धीर दिला. आणि... आणि सगळ दिल जे मला तुमच्याकडून हवं होत , माधवदादा. ...सुमीच अवघ शरीर गदगदत होत. तिच्या अश्रूंत तिरस्कार, लज्जा, मानहानी सगळे कढ मिसळले होते. माधव सुन्न झाला.या सगळ्या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत, याची पुन्हा एकदा त्याला शरम वाटली. तो भानावर आला , सुमीच्या पायाशी बसला, “ सुमे, मी तुझा अनंत अपराधी आहे. खूप वेळा मनात आलं, तुझ्याशी लग्नाआधीच बोलावं.पण घाबरलो ग, आई..अण्णांना, प्रतिष्ठेला, तुला...पण तुझे उपकार आहेत दिक्षितांवर , तू वंश वाढवलास दिक्षितांचा.तुझी परवानगी असेल तर हा खेळ असाच चालू ठेवू , लहानपणच्या खेळासारखा .हे गुपित तुझ्यामाझ्यातच राहील. पण .. आपण दोघे हरलो ग या खेळात, पण तू नेहमीसारखं सावरलस आणि दिक्षितांचा गट जिंकला." दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडायला लागले. दोन हतबल सवंगडी मूकपणे पराभवाचे अश्रू ढाळत होते, एका अनिर्णीत खेळासाठी.....

                                                                                

                

         


Rate this content
Log in