कद्रू...म्हातारा...!
कद्रू...म्हातारा...!
कद्रू म्हातारा..
कणा ताठ..
पुरता माठ..
हीच खूण गाठ..
वय वरचढ साठ...
हीच खरी ओळख ज्याची म्हणावी लागेल असा म्हातारा माझ्या पाहण्यात आला आणि पहाताच क्षणी हा किती कदृ पासून ते जी जी बिरुद नकाराची, घृणेची असतील ती ती सर्व अगदी तंतोतंत चपखल बसतील अशी ही व्यक्ती रेखा म्हणजे हा नको नको वाटणारा पुणेरी म्हातारा. पुणेरी म्हणून थोडा जास्तच द्वेषास पात्र ठरलेला.
त्याच अस झालं, आम्ही कोल्हापुरातल्या माळी कॉलनीतील गार्डन मध्ये बसलेलो. गप्पाटप्पा रंगलेल्या आणि तेवढ्यात उजव्या बाजूने या साहेबांनी एन्ट्री मारली.
उंच, अस्थिपंजर शरीर,फुल पॅन्ट करड्या रंगाची त्यावर पूर्ण बाहीचा हात झाकणारा हाफ शर्ट, डोळ्यावर तपकिरी जुन्या वळणाचा भिंगयुक्त चष्मा, धारदार नाक, खांद्याला शबनम, हातात स्टील पट्याचं चपट घड्याळ, हातात नासिका स्वच्छ करण्यासाठी चुरगळलेला रुमाल ,पायात थोड्या ढिल्या सँडल्स आणि भेदक बेरकी नजर हा असा अवतार आमच्या गार्डन मध्ये किंबहुना माझ्या जीवनात अवतरला.
अवतरला एवढ्याच साठी म्हंटले कारण अशी माणसं जीवनात येत नसतात ती अवतरतात हे खरे सत्य आहे.
लांब बाहू तसेच लांब कान जे थोड्या बहुत प्रमाणात बहिरे पणाकडे झुकलेले. जीभ ही तशीच वार्धक्याच्या उंबऱ्यावर पाय ठेवलेली त्यामुळे भलती जड पण विचार मात्र धारदार आणि जों त्याही क्षणी बाहेर ओढण्यास आतुर चपळ असणारे.
अहंकाराचा ,अतृप्ततेचा,द्वेषाचा, त्राग्याचा , रागाचा फुगा अगदी टच्च फुगलेला.कोणत्याही क्षणी टाचणी लागण्याचा अवकाश पटकन फुटणार आणि स्फोट होणार यात शंका नाही.त्यामुळे नाजूक पणे हाताळणे इतकेच जे जे सहावासात येतील त्यांच्या हाती असायचे. अशी सारी थोड्या बहुत फरकाने वातावरणाची निर्मिती भोवती फेर धरून सदैव असायची.
मला आठवत त्याच्या सुदैवाने आणि आमच्या दुदैवाने त्याला आमच्या जवळ बाकड्यावर बसायला जागा मिळाली. चिकटू , चिपकु, गुळ काढू वगैरे जी काही संकल्पित बिरुद संज्ञा रूप आहेत ती सर्व अनुभवण्यास मिळाली. कधी काळी वाचलेली,पाहिलेली, वारंवार पारायण केलेली तीन चार पुस्तक बाहेर पडली आणि यांची गाडी इतिहासात रुतून पडली.इतिहासा ऐवजी यांचाच इतिहास एक विशिष्ट पण घृणास्पद वाणीत गुंतून कुंतून कुंतून बाहेर पडू लागलाआणि आमच्या सय्यमाचा गळफास आवळत जाऊ लागला. एक एक मेम्बर अंग काढून बाजूस सरत सरत नजरे आड झाला. शेवटी मीही मग हळूच सुटका करून घेतली आणि घरचा मार्ग धरला.
त्याच्या अंतरंगात जाण्याची इच्छाच पहिल्या क्षणात मेली कारण त्या व्यक्तिमत्वाचा दर्पच इतका उग्र होता की जणू आपण काळा टच्च पेंगुळ पहावा आणि धक्का लागण्या आधीच त्याने आपला घाण दर्प नाकात शिरावा अशी अवस्था अनुभवास आली.
तो दिसला तरी आम्ही मनोमनी दूर दूर जाऊन बसतो किंबहुना दूर बसावे लागते ही वास्तवता जाणवते.
आताशा आठवण जरी आली तरी कसे म्हातारपण जगू नये ,असू नये याची उत्कृष्ट उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहणे होते आणि आदर्श इतकाच घ्यावा वाटतो, नाळ जोडली म्हणतात पण नाळ कशी तुटते हे त्याने दाखवून दिले याची जाणीव होते.
जादा अभ्यास, जादा वाचन आणि पराकोटीचा अहंकार जर असेल तर एकलकोंडे जीवन किती भयावह असते याचे प्रत्यक्ष मूर्तरूप अनुभवास येते आणि वाटते अति तेथे माती हे खरेच सत्य आहे.
आपण आपले साधे , हलके, फुलके, आंनदाचे जीवन
जगत राहणे किती क्रमप्राप्त आहे हे पटते.
काहीही असले तरी या कदृ म्हाताऱ्याने कसे म्हातारपण असू नये हे दाखवून दिले इतके मात्र खरे.....!
हे सगळं मला लिहावं वाटलं कारण मी पुण्यात शिक्षणासाठी होतो. काही वर्ष कलाप्रसाद मंगल कार्यालयात विजय नगर मध्ये कॉट बेसिसवर रहात होतो. सकाळी सकाळी कॉलेजला जाताना चार पाच जणांच टोळकं चामडी वादी आणि पेन्सील वेटोळ्याचा जुगार लावून वाटसरूना गंडावायचे ते पहात असताना असेच एक सद्गृहस्थ मला हाताला धरून बाजूला घेऊन गेले आणि सांगितलं आशा लोकांच्या नादी आपण लागायचं नसतं. एकदा एका सद्गृहस्थांनी फुटपाथवरून सायकल नेताना सल्ला दिला फूट पाथ माणसांसाठी असतो आणि माझ्या तोंडून पटकन" आपण कसे '? इतकाच शब्द बाहेर पडला. ते गृहस्थ अर्धा तास माझी वाट पहात बादशाही खानावळी समोर उभे होते.असे अनेक खडूस पणाचे सल्ले ,अनुभव कनवटीशी असल्या मुळे पुणे म्हंटल की काय काय उण हे आपण हुन बाहेर येत.त्याच पैकी हे कथानक गार्डन मध्ये फिरायला येणाऱ्या आजोबांना पाहून सुचलेल .आजोबांचे नाव वगैरे माहीत नाही पण त्यांनी आपला फोटो काढू दिला आणि पुरेपूर आठवण मात्र पुण्याची ताजी केली.