काही कमी आहे?
काही कमी आहे?
काया कधीच भरभरून नाही जगली.ती नेहमी काय नाही, कसली कमी आहे जिवनात ? हेच शोधत रहायची. त्याउलट जिया होती.जिया काही कमी असलं तरीही ते उचलून नाही धरायची,त्या ऐवजी दुसरं काय केलं तर कमी भरून निघेल हेच बघायची.एक सकारात्मक आणि एक नकारात्मक,दोघीही एकाच घरी राहत होत्या.
एकदा घरी पाहुणे आले.काया गेली स्वयंपाक घरात काही नाश्ता बनवायला.बघते तर काय, जियाने ना टोमॅटो आणले ना कोथिंबीर ना मिरच्या! तिच्या शरीराचा पारा भराभरा वाढला.तिने उचलली जिभ आणि लावलीच टाळ्याला लगेच. ह्या जियाला ना घर सांभाळताच येत नाही? टोमॅटो नाही ?कोथिंबीर नाही ? नाश्ता कसा बनणार ? पाहुणे नाव ठेवणार इ.इ.बरेच काही! जियाने कायाची टिवटिव ऐकली ! ती बोलली काया ! जरा डोळे उघडून बघ आणि विचार कर! कित्येक इतर वस्तू आहेत आणि जिन्नस पडून ,त्यापासून 10-12 नाश्त्याचे प्रकार बनवता येतील, मी बनवायला घेते, तू बस कांदा नाही, टोमॅटो नाही करत! जियाने पटकन कांदा कापला,रवा,बेसन,पिझ्झाबरोबर आलेले ओरिगॅनो,चिली फ्लेक्स टाकले, पाणी, मिठ टाकलं, मिश्रण भिजत ठेवलं, तोपर्यंत चहाचं आधण ठेवल गॅस शेगडीवर, काया पचकलीच मध्ये, अगं चहापुड संपली सकाळीच ! मला चहापण नाही करून पिता आला ! अगं काया, काय तू अशी रडवी आहेस नुसती? मी फ्रिजमध्ये चहाचे डिप वाले पाऊचेस ठेवतेच नेहमी, असं म्हणत जिया ने डिपवाल्या 2-3 पाऊचेस ना फाडून आतली चहाची भुकटी गॅसवर ठेवलेल्या आधणात टाकली! तोपर्यंत वेज कांद्याच्या ऑम्लेटचे मिश्रण चांगले भिजले होते,जिया ने पटापट 4 कांदा ऑम्लेट बनवले, 2-2 करत 2 प्लेट मध्ये घालून, चहाचे कप चहाने भरून हाॅल मध्ये पाहुण्यांना द्यायलाला निघाली.काया अजूनही नकारात्मकतेत बुडालेली! तिचं बोलणं चालूचं!नाही आवडला नाश्ता तर ? काया ? काया ? तुझं काहीच होऊ नाही शकत ! जिया स्वयंपाकघरात पाऊल टाकत काया ला म्हणाली,पाहुुण्यांनी खाल्लं आणि आवडल
ंही त्यांना , तु आपली ते काय म्हणतील हा विचार करत बसशील , ऐवजी जरा अजुन 2 ऑम्लेटंं काढ बनवून,रिकाम्या डोकी, सैतान वास करी ! काय ? काया म्हणाली ! जे नुसतंच विचार,विचार करत बसतात ना, त्यांच्या मेंदूत बिनकामाचा कचरा जमा होतो,कचरा! तुुझ्या मेंदूत तोच भरला आहे !
म्हणुनच तुला समोर असलेल्या वस्तूही दिसत नाहीत.फ्रिज उघडतेस लिंबू डोळ्यांसमोरच असतो,पण तरी लिंबू कुठे ? लिंबू नाहीत ? बोलून मोकळी होतेस ! डोक्यातली जळमटं काढ आणि फेकून दे! मग मनही साफ आणि नजरही साफ! आणि नुसतं हे नाही,ते नाही,नुसती नकारात्मकतेतच वावरतं राहतेस आणि घरातील माणसांना पण उगाचच भंडावून सोडतेस,कशाला करतेस अशी?
मघाशीही बोललीस टोमॅटो नाही,हे नाही,ते नाही? टोमॅटो ऐवजी लिंबू,कोकम,आमचूर पावडर,दही, व्हिनेगार आहेतच ना घरात आंबटपणासाठी! मग उगाचच टोमॅटो वरच अडून का बसायचं ? एखादा दिवस बदल चालतो ! आणि तुझं हे जीवन जगताना सुध्दा आहे,हे नाही,ते नाही,हे कमीच आहे,ते कमीच आहे! सोड काया ,हे कमी,ते कमी! प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही कमी आहेचं आणि असतेच! पण म्हणुन कोणी आयुष्य जगायचं सोडून देत नाही ना? दिलखुलास जग! संकुचित वृत्ती सोडून दे, स्विकार कर त्या प्रत्येक गोष्टीचा ,ज्या कमी आहेत,आयुष्य जगणं जास्त सुखद आणि सोयीस्कर जातं ! आता बघत काय बसलीस जा! जा ती 2 ऑम्लेटं देऊन ये बाहेर पाहुण्यांना !
नाही तु जा जिया! कांदे संपलेत हो! आता फ्रिज मध्ये कोबी आणि शिमला मिरचीच आहे,आपल्या साठी कोबी,शिमला मिरच्यांची ऑम्लेटं काढते तोपर्यंत! हे असं काया बोलली ह्यावर जिया चा विश्वास बसणं कठिण होतं पण कायाच्या नकारात्मक तोंडातून पहिल्यांदा सकारात्मक वाक्ये बाहेर पडली होती, मग काय जियाला हसू आवरेना, मग ती पण बोलली ,हो ,हो ,का नाही? आणि मेयाॅनिज दे बरोबर, टोमॅटो सॉस संपलाय! शिकली शिकली! मुलगी शिकली प्रगती झाली!