जो आवडे स्वतःला, तोचिआवडे सर्वांना
जो आवडे स्वतःला, तोचिआवडे सर्वांना
आर्या ने माप ओलांडून गृहप्रवेश केला
ती खूप खूष होती कारण तिला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला होता
आर्या आणि विनयचा तसा प्रेम विवाह.... आर्या आणि विनय चे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.... पण दोघेही वेगवेगळ्या जातीतील असल्याने दोघांच्याही घरच्यांचा लग्नाला विरोध होता...
पण आर्या आणि विनय दोघेही आपल्या मतावर ठाम होते.
त्यांच्या ठाम निर्णयापुढे दोघांच्या घरच्यांना झुकावे लागले... आणि लव्ह कम अरेन्ज असे लग्न लावून द्यावे लागले.
साहजिकच आर्याच्या सासुबाई त्यांची मनपसंत सून नसल्याने त्या तिच्यावर नाराजच होत्या... तशी आर्या दिसायला सुंदर,तल्लख बुद्धी, आणि एका नामांकित शाळेमध्ये शिक्षिका होती...शाळेमध्ये देखील ती सगळ्या विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका होती....
विनय एका बँकेत मॅनेजर होता... आर्या बँकेच्या कामासाठी त्या बँकेत जात होती आणि तिथेच दोघांची ओळख झाली होती.
आर्याचा गृहप्रवेश झाल्यावर तिचे थोडे नाराजीत स्वागत झाले होते.... तिच्या सासूबाईंची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती... आर्याला आपण सगळं घर जिंकून घेऊ व सगळ्यांना आपलंसं करून घेऊ याची खात्री होती... लग्नाचे सगळे सोपस्कार उरकून आर्या आता संसाराला लागली होती....
तिच्या सासूबाईंची कडक नियमावली होती... पहाटे 5 वाजता उठायचे, अंगण झाडायचे, रांगोळी काढायची,अंघोळ करून स्वयंपाक घरात प्रवेश करायचा मग चहा नाश्त्याचे बघायचे आणि शाळेत जाण्यापूर्वी दुपारचा स्वयंपाक करायचा..... शाळेतून आल्यावर संध्याकाळी जेवण देखील सुनेने बनवायचे....
आर्याची हे करता करता दमछाक होत असे... कारण तीने माहेरी कधी स्वयंपाकाला हात देखील लावला नव्हता..... पहाटे पाच वाजता कधी उठणे माहिती नव्हते... तिला घरकाम माहिती नव्हते... तरी देखील आर्या आपल्या सासूबाईंना खूष करण्यासाठी ही कामे आनंदाने आणि मन लाऊन करत असे....
पण तरी देखील तिच्या सासूचा सूर नकारात्मक 😏असे... कधी उठायला उशीर झाला तर... आम्ही नव्हतो बाई असा उशीर करत, आज काय मीठ जास्त झाले.... भाजी तिखट झाली... पोळी गोल नाही.. सगळंच व्यवस्थित झालं तर आज ही भाजी करायची नाही वगैरे... असं रोज काही ना काही घालून पाडून बोलत असे....
या वातावरणाचा परीणाम कळत नकळत शाळेतील मुलांवर व्हायला लागला होता.... सगळ्या विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागणारी आर्या आता त्याच्यावर चीडचीड करू लागली होती.... स्वतः चा राग करू लागली होती... त्यामुळे शाळेतील मुले देखील म्हणायची... आर्या मॅडमचे लग्न झाल्यापासून त्या खूप चिडचिड्या झाल्या आहेत.
रोज एकदम परफेक्ट मॅचिंग करून राहणारी आर्या एका विचित्र अवतारात दिसायला लागली... नियमित ब्युटी पार्लर मध्ये तिचे जाने बंद झाले होते... रोजच्या डबल कामाने ती अक्षरशः थकून चालली होती... तिला कसलाच उत्साह राहिला नव्हता...
लग्नाला सहा महीने झाले तरी एकाच गावात असून ती एकदाही माहेरी गेली नाही... इतकंच काय फोनवर नीट बोलने देखील झाले नाही...
आर्याला वाटायचे आज ना उद्या आपल्या सासूबाई आपला मनापासून स्वीकार करतील आणि त्यांची मी आवडती बनेल..
शाळेच्या परीक्षा जवळ आल्या तो तो आर्या चे शाळेतील काम वाढले.. शाळेतील सगळी परीक्षा घेण्याची जबाबदारी त्यांच्या मुख्याध्यापकाने आर्या वर सोपवली... तिला घरी देखील काही वर्गांसाठी प्रश्न पत्रिका तयार करायच्या होत्या....
आता आर्याला घरकाम करता येणार नाही आणि सासूबाईला ते सांगण्याची हिम्मत नव्हती... मग पहिल्या दिवशी आर्याने फूड कोर्ट मधून जेवणाचे पार्सल मागवले... पण तिच्या सासूने तिला चांगलेच धारेवर धरले.... म्हणायला लागल्या पैसे काय झाडाला लागतात का? आता रोज इतका खर्च करणार का?
मग आर्या ने पर्यायी व्यवस्था म्हणून स्वयंपाकीण बाई लावली... तेव्हाही ति
ची सासू आम्ही आतापर्यंत कधी कुठली स्वयंपाकीण बाई लावली नव्हती... आणि कधी कुणी परक्या बाईच्या हातचं खाल्लं नव्हतं असे टोमणे मारायला लागली.... त्यात कधी नव्हे तो विनयने देखील आर्याच्या सासूबाईच्या सुरात सूर मिसळला... तो आर्याला म्हणाला त्या स्वयंपाकीण बाईच्या हाताला चव नाही तूच करत जा ना...
आर्याला जो पर्यंत तिची सासू वेडे वाकडे बोलायची तो पर्यंत तिला काही वाटत नव्हते.... तिला वाटायचे त्यांचा राग आहे म्हणून त्या तसं वागत आहेत... पण आज विनयने त्यांची साथ दिल्यावर आर्या रागाने लालबुंद झाली..... आता मात्र तिची सहनशक्तीच संपली....
आपण इतके काही करून आपली काहीच किंम्मत नाही... आज तर विनयने देखील हद्द केली... बस्स खूप झाले आता असा विचार करून आर्याने स्वतःमध्येच बदल घडवून आणण्याचे ठरवले....
शाळा सुटली की ती पहिले ब्युटी पार्लर मध्ये गेली... छान फेशिअल वगैरे करून घेतले... नंतर मॉल मध्ये जाऊन स्वतःसाठी सगळी मॅचिंग खरेदी गेली... दरम्यान तिला एकदम तणावमुक्त वाटायला लागले....आर्याला आता लक्षात आले की जेव्हा आपण स्वतः साठी हे सगळं करत आहोत आपल्याला किती छान वाटत आहे...
सहाजिकच आर्याला घरी जायला उशीर झाला होता... घरी तिची सासू आणि विनय वाट बघत होते.... आर्या घरी आली आणि कुणाशीही न बोलता सरळ आपल्या बेडरूम मध्ये गेली...
विनय आणि तिच्या सासूबाईना तिचे असे वागणे विक्षिप्त वाटले... स्वयंपाक देखील करायचा राहीला होता.. सगळ्यांना भूक लागलेली होती खरं तर येताना आर्या ने पार्सल सोबत आणले होते पण ते मुद्दाम लपवले होते...
विनयने आर्याला स्वयंपाकाचे काय असे विचारताच ती त्याच्यावर डाफरली.... मला उशीर झाला तर तूला काही व्यवस्था करता येत नाही का?? माझे आता मुलांच्या वार्षिक परीक्षा होईपर्यंत खूप काम वाढले आहे.... त्या मुळे दोन्ही काम होऊ शकत नाही... तुम्हाला स्वयंपाकीण पण चालत नाही.... मग एक तर तू स्वतः स्वयंपाक कर... नाहीतर आईंना सांग.....
मी तुझ्यासोबत लग्न करून या घरामध्ये या विश्वासावर आले की तू मला सांभाळून घेशील...
पण आज सकाळी तर तू देखील हद्द केलीस... माझा बिलकुल विचार केला नाहीस....मला इतक्या दिवसात काय अडचण आहे हे तरी विचारलेस का?? कधी तूला मला थोडी देखील मदत करावी नाही वाटली का?? हे बोलताना तिचे अश्रू अनावर झाले... विनयला त्याची चूक लक्षात आली. तो आर्यावर जीवापाड प्रेम करायचा... तिच्या अश्रूंमुळे त्याला खूप कसंतरी वाटलं.... तो म्हणाला चल मी आज खिचडी करतो... उद्यापासून काय करायचं ते नंतर बघू.... खूप भूक लागली आहे.
आर्याने सोबत आणलेले पार्सल काढले आणि ते तिघे जेवायला बसले.... तिची सासू पहिल्यांदा शांत बसली काहीच बोलली नाही.. आर्याला हा बदल म्हणजे एक जादू वाटली.
सकाळी विनयने त्याच्या आईला स्पष्टपणे सांगितले की एकतर स्वयंपाकीण बाई लावू नाहीतर वार्षिक परीक्षेपर्यंत आपल्या दोघांना मिळून किचन सांभाळावे लागणार....तेव्हा स्वयंपाकीण लावण्याचे ठरले... सासूबाईंच्या छोट्या मोठया टोमण्यांकडे आता आर्या पूर्णपणे दुर्लक्ष करू लागली होती... आणि विनय समोर मारलेले टोमणे तोच खोडून काढत असे....
आर्याला आता स्वतःसाठी वेळ मिळू लागला होता... ती नेहमीसारखी राहू लागली होती... शाळेतही आपल्या विद्यार्थ्यांशी पहिल्यासारखी वागू लागली होती.... तिची चिडचिड बंद झाली होती....
ती सतत "मी कशाला आरश्यात पाहू गं "
"मीच माझ्या रूपाची राणी गं "
असं गुणगुणायला लागली होती.घरातील वातावरण आता बऱ्यापैकी बदलले होते... तेव्हा आर्याला हे लक्षात आले की मी कुणाला आवडो वा न आवडो मला स्वतःला आवडते ना.. तेच माझ्या साठी खूप आहे....जो स्वतःला आवडतो तो आपोआपच सर्वाना आवडायला लागतो...