Dr.Smita Datar

Others

0.8  

Dr.Smita Datar

Others

जनी

जनी

4 mins
22.7K


जनी नामयाची रंगली कीर्तनी , मिहीर हातात टाळ घेतल्यासारखा अभिनय करून माझ्याभोवती नाचत होता . आणि मी येणारे हसू दाबत खोट्या रागाने त्याला टाळत होते . ऑफिस ला जाण्याच्या घाईत काय हे तुझें? मी लटका राग व्यक्त केला. पण जिच्याविषयी हे सगळे चालले होते, तिला बिचारीला काय कल्पना की मिहीर तिला चिडवतोय.

जनी ..वय पन्नास असेल जेमतेम ...पण जीवनाची लढाई लढताना झालेले वांर तिला साठीकडे घेऊन गेलेले . चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या ,पण ज्या होत्या त्या जखमांची खोली दाखवणाऱ्या होत्या . सामान्य रूप , पण तोंडावर कायम हसू , कपाळावर मोठ्ठ ठसठशीत कुंकू ..या बायकांना नवरे सोडून जातात , प्रेम नाही , कर्तव्य पार पाडत नाहीत , तरी त्याच्या नावाचे कुंकू, मंगळसूत्र आणि उपासतापास मात्र चालू ..जनी पण त्यातलीच . नवऱ्याचा उल्लेख चुकुनही एकेरीत करायची नाही . नवरा दोन मुले पदरात टाकून सोडून गेला , दुसरया  बाईशी त्याने पाट लावला , हे माहित असूनही ही वटपौर्णिमा करत होती. मी म्हटले , तुला वाटतंय तो परत येईल म्हणून ...तर म्हणते , नाही हो ताई , तो असेल तिथे सुखात राहावा म्हणून करते मी सगळे .  कपाळाला हात लावला , आणि चरफडत मी माझी स्त्री मुक्तीविषयी ची मते माझ्याच मनात कोंबून लॉक करून टाकली .

तर अशी आमची जनी ..थोडी स्थूल , बरीचशी संथ ,मंद , माझ्या सुपरफास्ट स्पीड पुढे मला अगदी कासव वाटणारी , मी कितीही चीडचीड केली तरी मनाला लावून न घेता परत हसतमुखाने , परत सांगा न ताई..विसरले मी ..असे म्हणणारी भोळी जनी . तिच्या हाताला चव मात्र अप्रतिम ..निगुतीचे आणि सुंदर रांधणे . स्वयंपाक करताना तंद्री लागायची तिची ..प्रत्येकाच्या आवडी निवडी लक्षात ठेवून स्वयंपाक करणार. माझा मुलगा जिम वाला म्हणून त्याला लागणारे ऑम्लेट, चिकन वेळेवर हजर , साहेबांना दोन वेळ डबा, मुलीला तर केवळ तिनेच शेफारून ठेवलेले ..राणी ही भाजी खाईल, राणीला थालीपीठ आवडते म्हणून रोज थालीपीठ? माझे डायट....तर तीच सांभाळायची . प्रेमाने मुलांना जेवू घालायची .मनात यायचे माझे करीअर सांभाळण्यासाठी डायरेक्ट नामदेवांकडून जनी इम्पोर्ट झाली की काय? .

मी पण तिच्या छोट्या छोट्या चुका माफ करत असे . जनी भावाच्या घरी आश्रित होती. पण वहिनीला मदत करून , दोन घरची कामे धरून मानाने रहायची . तिची मुले काही फार शिकली नव्हती . एक ड्रायवर आणि एक सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा . मुले दारू पिणे , आकडा लावणे पण करत असावीत , पण जनीची त्याविषयी फार तक्रार नव्हती . किंबहुना ती जिथे रहायची त्या समाजातला तो अविभाज्य घटक प्रत्येकीच्याच वाटणीला येत असावा. त्रास काय तो मलाच व्हायचा, मी तिला मुलांना तिने कसे धाकात ठेवले पाहिजे , पिऊन आल तर बखोटे धरून घराबाहेर कसे काढले पाहिजे , असे तावातावाने सांगत असे . जनी माझे वाक्ताडन सुद्धा तितक्याच शांतपणे व मंद हसून सोडून देई आणि मुलांना आणि मिहिरला माझे समाज सुधारणेचे फसलेले प्रयोग पाहून मजा येई .

आणि एक दिवस जनीच्या मुलाला अपघात झाला . त्याचा एक हात आणि एक पाय निकामी झाला. तिच्यावर आभाळ कोसळले . आम्ही सर्वतोपरी मदत केली. दुसरा मुलगा त्याच्यावर पांगळ्या भावाची जबाबदारी पडेल म्हणून निघून गेला . हा मुलगा अपघातातून उठल्यावर त्याला काही बैठी

कामे, टेलिफोन बूथ असे पर्याय आम्ही सुचवले ..पण व्यर्थ ..तो नुसता घरी बसून राहू लागला ..त्यात व्यसन . जनीने आमचे न ऐकता निर्णय घेतला ..मुलाचे सारे काही करायला मी पण घरी राहणार . झाले ...परिणाम .......भावाने जनीला घराबाहेर काढले . माझ्या घरी मुलासह मी तिला ठेवू शकत नव्हते . खूप वाईट वाटले पण ईलाज नव्हता.. पळणाऱ्या सोसाट्याच्या काळाबरोबर जनी भिरभिरत मनाच्या एका कोपऱ्यात अलगद जाऊन पडली .

ऑफिस मधून दमून आले तर घरात थालीपिठाचा खमंग वास सुटलेला ...आणि मागोमाग लेकीचा खिदळण्याचा आवाज . जनी ? संथपणे , मंद हसत जनी थालीपीठाची ताटली आणि चहाचा कप घेऊन बाहेर आली . तशीच ..पूर्वीसारखी . फक्त कपाळावर ते ठसठशीत कुंकू नव्हते . जनी ? अग , काय झाले? मालक कुठेत तुझें ? कुठे असतेस हल्ली ? माझे एका मागोमाग एक प्रश्न , काही ओठावर , काही चेहऱ्यावर उमटलेले ..जनी ने सावकाश तिची कहाणी ऐकवली .भावाने घराबाहेर काढल्यावर जनी नवऱ्याकडे अंबरनाथ ला गेली . त्याने बाहेरचा रस्ता दाखवला . तिथेच एका पडक्या घरात राहून घरात खानावळ चालवली . मुलगा ही हळू हळू त्यात लक्ष घालू लागला . दरम्यान तिचा नवरा वारला . सवत आणि तिची मुले एकटी पडली. सवतीची काय चूक? जनीने सवती समोर प्रस्ताव ठेवला ..आपण दोघी झाडाच्या तुटलेल्या फांद्या ..एकत्र राहिलो तर मोळी बनेल. सवत कर्जबाजारी झालेली .तिने हे मान्य करून दोघींनी हिमतीने खानावळ चालवली .दोघी एकत्र राहू लागल्या. खूप कष्ट केले. जमेल तसे कर्ज फेडून गाडा रेटू लागल्या .

मी सुन्न . एवढी सहनशीलता? , एवढी क्षमाशीलता ?...शिकून सवरून तरी आपल्यात आहे ? जनीने संथपणे पुढे होत, मंद हसून मुलाच्या लग्नाची पत्रिका माझ्या हातात ठेवली. पण दोन अश्रूंच्या अक्षता माझ्याकडून सांडल्याच.


Rate this content
Log in