डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

4.3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

जिंदगी धूप तुम घना साया

जिंदगी धूप तुम घना साया

4 mins
238


तुम को देखा तो ये ख्याल आया

ज़िंदगी धूप तुम घना साया

आज फिर दिलने एक तमन्ना की

आज फिर दिलको हमने समझाया

आज फिर दिलको हमने समझाया

ज़िंदगी धूप तुम घना साया

माझी जिवाभावाची मैत्रीण रुपाली हिचं हे आवडतं गाणं. तिच्याच तोंडून ऐकून ऐकून मी सुध्दा या गजल च्या प्रेमात कधी पडले ते मलासुद्धा कळलं नाही. असेच एक दिवस गुणगुणत बसली होती मी ही गजल, अन् डोळ्यांसमोर फक्त तात्या तुम्ही आले. डोळे पाण्याने काठोकाठ भरले अन् हुंदके तेवढे उरले....!


खरंच ह्या रखरखीत आयुष्यात मायेची सावली देणारे झाडच होते ना तात्या तुम्ही!

तात्या ,म्हणायची मी तुम्हाला.. ! लहानपणी शेजारील आजूबाजूची मुलं बाबा म्हणायची त्यामुळे मला हे वेगळंच वाटायचं पण तुमच्या आवडीसाठी मी तात्या च म्हणत राहिली अन् तेच जिव्हाळ्याच होऊन गेलं.


तुमच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला माझे म्हणून संकुचित करणे म्हणजे नतद्रष्ट पणाच! पण आज तो मी करणार आहे. तुमची लेक म्हणून अगदी एकुलती एक लेक म्हणून.


शिक्षकी पेशात असणारे तुम्ही. फक्त तेवढेच करून थांबणारे अन् चाकोरीबद्ध जीवन जगणारे नव्हतेच कधी!अगदी बालपणीच वडिलांचे छत्र हरवलेले अन् सगळ्यात धाकटे असलेले ,कष्ट करत,आईला काम करू लागतं ,डोक्यावर दगडाच्या गोट्यांचे टोपले वाहून नेत शिक्षण घेणारे तुम्ही..!


कष्ट करून मी तर शिकलो पण माझे इतर कुटुंबीय ,समाज यांचेही मी काही देणे लागतो म्हणून फक्त स्वतः चा विचार न करता त्यांच्या मदतीला धावणारे ,अहोरात्र झिजणारे तुम्ही,अशा थोर माणसाची मी लेक!

तात्या तुमच्या अशा चळवळ्या स्वभावापायी बालपणी तुम्ही माझ्या वाट्याला फारसे आलेच नाहीत. तुम्ही अत्यंत कडक शिस्तीचे  होता  ना त्यामळे लहानपणी तुम्ही केलेल्या लाडा पेक्षा तुमच्या शिस्तीच्या अन् तुम्ही दिलेल्या माराच्याच जास्त आठवणी माझ्या खात्यात!

मी जरी एकुलती एक असली तरी माझ्या जन्माच्या आधीपासूनच जी सगळी मुलं घरात राहायची त्यांच्यापेक्षा वेगळी अन् स्पेशल ट्रीटमेंट मला मिळू नये यावर तुमचा नेहमीच कटाक्ष असायचा. अन् या अशाच संस्कारांत मोठी झाली मी! म्हणूनच आज भक्कमपणे पाय रोवून सामना करू शकते येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा अगदी न डगमगता.कारण या साऱ्याचच बाळकडू पाजलय संस्कारांतून तुम्ही नी आई नी!


पण तुमच्या इतक्या व्यस्ततेतूनही तुम्ही जेव्हा स्नेहसंमेलनाला माझ्या कौतुकाला उपस्थित राहायचे ना तेव्हा तुम्हाला समोर बघून माझा उत्साह अजून दुणावायचा!


सत्तर ऐंशीच्या त्या दशकात सुद्धा मुलगा नाही म्हणून खंत न करता मला एक स्वतंत्र विचारांची व्यक्ती बनवणारे तुम्ही!

एक परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून माझी सर्वांगीण जडण घडण करणारे तुम्ही!माझ्या साठी अगदी आदर्श आई वडील असणारे तुम्ही.


तुम्ही उभारलेल्या अनेक साहित्य चळवळी. त्यातून तुमच्यासोबत असलेला जनसमूह. आपल्या भागातील लोकांना हक्काचं व्यासपीठ मिळावे म्हणून विदर्भ साहित्य संघाच्या शाखेची पायाभरणी. या अनोळखी प्रांतात आपल्या भागातील नवोदितांसाठी दीपस्तंभ असलेले तुम्ही. नुसतीच सामाजिकता जोपासली नाही लेखणीतून... तर ती दाखवली तुमच्या कृतीतूनही!

गरीब हृदय रुग्ण मुलासाठी उभारलेली देणगी,या सगळ्यातून च वैनगंगा मानव सेवा संघ या संस्थेची झालेली स्थापना. अनेक गरजू व्यक्तींना दिलेला मदतीचा हात...

मा. बा.गांधी चॅरीटेबल ट्रस्ट शी असलेले तुमचे बंध. त्या संस्थेमार्फत अनेक समाजपयोगी कार्य करणाऱ्यांचे केलेले सत्कार सारं अगदी जवळून पाहिले मी.अन् पहिली या साऱ्यात आईची तुम्हाला असलेली साथ....!

साहित्य अन् समाजकार्याचं हे यज्ञ तुम्ही चेतवलं अन् आई अगदी समिधा बनून त्यात एकरूप झाली....

असं अद्भुत अन् दिव्य दाम्पत्य असलेले तुम्ही...!

या कार्यात चंदनासारखी झिजत आई अचानक काळाच्या कवेत गेली......!


अगदीच असह्य होतं ना सगळं ...

पण सावरलो आपण एकमेकांसाठी....!


आजपर्यंत आईच्या मायेच्या पदरा आडून तुम्हाला न्याहाळणारी मी..

आता तर माझे विश्र्वच तुम्ही झाला होतात तात्या..!

माझा विशाल वटवृक्ष! ज्याच्या घनदाट सावलीत अगदी निर्धास्त होते मी जीवनातल्या त्या होरपळीपासून...


उणेपुरे सतरा वर्षाचे वय माझे पण तुमचे मन, तुमच्या मनाचा हळवा कोपरा वाचू लागले होते मी...!


शिक्षणासाठी घराबाहेर पडले ना......

किती हेलावले मन माझे तुमच्या काळजीने ..तुमचेही ते पापण्या आड दडलेले अश्रू....पण दोघेही चढवत होतो हास्याचा मुखवटा एकमेकांसाठी...!


मी बाहेर पडले शिक्षणासाठी अन् तुम्ही आता पूर्णपणे वाहून घेतलं तुमच्या कार्याला ,नोकरीचे पाश सांभाळून....

गाठलीत एवढी उंची की ज्या ट्रस्ट साठी तुम्ही काम करायचे त्याचं संस्थेने त्यांच्या फुले शाहू आंबेडकर या सर्वोच्च पुरस्काराने तुम्हाला गौरवले..

याहून मोठा बहुमान काय असावा नं?


माझे लग्न झाले अन् मला सुखी समाधानी पाहून तुम्ही तृप्त झाले.


नातवंडांच्या मेळ्यात रमले..!

गावचेच सासर असल्याने अन् तुम्ही रोज दिसत असल्याने किती खुश होतो मी अन् माझी पिल्लं..!


आई गेली !वर वर शांत संयमी दिसणारे तुम्ही मात्र आतल्याआत होरपळत राहिलात तिच्या आठवणीत..!

ती गेल्यानंतर चा प्रत्येक क्षण तिच्यापर्यंत पोहचवला तुम्ही तुमच्या लेखणीतून.. अन् तुमच्या सत्तराव्या जन्मदिनी तुमचा विरही हा कविता संग्रह केला तुम्ही लोकार्पण...

प्रत्येक शब्द न शब्द पिळवटून टाकणारा...

स्वर्गीय पत्नीच्या प्रेमात आर्त विरही प्रत्येकालाच चटका लावून जाणारा.........

तुम्ही दोघांनी शिकवले मला त्याग आणि समर्पणात वसलेले प्रेम...!


तुम चले जाओगे तो सोचेंगे

तुम चले जाओगे तो सोचेंगे

हमने क्या खोया हमने क्या पाया

हमने क्या खोया हमने क्या पाया

ज़िंदगी धूप तुम घना साया

तुम को देखा तो ये ख्याल

आता तर तुम्हीच विश्व होतात माझे, आई नी तिच्या मागे माझ्यावर सोपवलेली एक गोड जिम्मेदारी...

विरही च्या निर्मिती नंतर मात्र तुम्ही थोडे विरक्त झालात.

अन् मग मग ते मात्र माझ्या मनाला खूपच सैरभैर करून गेलेलं.

माझी लहानगी.. ती झाली अन् तुमचं मन तिच्या जन्मानंतर तिच्या लीलांमध्ये गुंतत चाललेलं..

पण आता मात्र तुम्ही खूप गुंतायचे नाही म्हणून स्वतः ला विरक्त केलेलं... ..

तुमचं ते भावनांना बांध घालणं अन् तिचं " आई तात्या कां नाही आले गं..?" असं लाडिकपणे विचारणं..

तिला काहीतरी उत्तर देऊन चूप करायची मी!

पण....

कां कोण जाणे अनाहुताची चाहूल वाटायची मला ती...!

अन् तो विचारही असह्य वाटायचा मला..........


एका रात्री..

तुम्ही काही वेळे पूर्वी माझ्या घरून अगदी आनंदात घरी गेलेले..

तुमच्या जावयानेच सोडून दिलेलं म्हणून मीही निश्चिंत...


अन् अचानक ....

एक दिड तासात तुमचं आम्हाला सोडून जाणं....


क्षणात पोरकी झाली होती मी !माझ्या डोक्यावरचा तो घना साया अकस्मात मला सोडून गेलेला......


का गेलात तात्या मला सोडून?...का गेलात अज्ञाताच्या वाटेवर...?


शेवटी तेच झालं होतं ना..

हम जीसे गुनगुना नही सकते,

वक्त ने ऐसा गीत क्यू गाया.....?


तात्या तुम्ही निघाला होतात अनंताच्या प्रवासाला माझ्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह ठेऊन....!


हम जिसे गुनगुना नहीं सकते

हम जिसे गुनगुना नहीं सकते

वक़्त ने ऐसा गीत क्यों गाया

वक़्त ने ऐसा गीत क्यों गाया

ज़िंदगी धूप तुम घना साया

तुम को देखा तो ये ख्याल आया

तुम को देखा तो ये ख्याल आया.   


Rate this content
Log in