जीवन मिसळ
जीवन मिसळ
*जीवन मिसळ*
जीवन ही एक छान मिसळ आहे.
ज्यात सुखाचे मोड आलेले आहेत. त्यात विविध मूड आणावे लागतात. असंख्य अनुभवाचे फरसाण अधिक असतं. ढीगभर आणि डिशभर दुःखाचा कांदा डोळ्यात पाणी मात्र आणतो.
स्नेह, प्रेम,आपुलकी यांची हिरवीगार कोथिंबीर मिसळीची शोभा छान वाढवते. जीवन मिसळीवर छान पेरली जाते. जीवनातील दुःखाला जरा ही कमी करते.
मतभेदांचे दही आणि लिंबू जिभेला मात्र चटका मारत जातं. तरीसुद्धा ते हवस असतं. कारण त्याशिवाय जीवनाला अर्थ राहत नाही. आंबट चिंबट अनुभवाशिवाय आपण पुढे जात नाही. आणि सर्वांनाच हे जीवनामध्ये आंबट चिंबट अनुभव आलेले असतात. नव्हे ते घ्यावेच लागतात.
जीवनातल्या स्वप्नांचे ठिसूळ पापडाने क्षणात तुकडे तुकडे होतात. काही क्षण गोळी सारखे विरघळूनही जातात.
मनोरथाच्या या रसामध्ये मनाचा पाव जितका बुडवता येईल तितका तो फुगत जातो. पण मनोरथ पूर्ण होत नाहीत.
शेवटी काय तर जीवाच्या मित्रांबरोबर अशा मिसळीची लज्जत घ्यायला खूप मजा येते. जेव्हा जिवाभावाच्या मित्रांबरोबर ही जीवन मिसळ शेअर करून खाल्ली तर निश्चितच आपल्या अशा वेळेला स्टीलचा चमचा देखील सोन्याचा होऊन जातो.
आणि जीवनाच्या मिसळ याला एक उत्तम स्वाद प्राप्त होतो. जीवन मिसळ चटपटीत होते. अशा प्रकारची ही जीवन मिसळ ज्यात मैत्रीचे सुखाचे मोड आलेले आहे ते निश्चित सर्वांनी सोन्याच्या चमच्याने खावेत. आपल्या जीवनाला बहार निश्चित येईल.
वसुधा नाईक, पुणे
मो. नं. 9823582118
