नासा येवतीकर

Children Stories Others Children

3  

नासा येवतीकर

Children Stories Others Children

जीवाभावाची मैत्री

जीवाभावाची मैत्री

5 mins
309


अजय आणि विजय दोघे जीवाभावाचे मित्र. एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकलेले. आज त्यांच्यात एवढी गाढ मैत्री असली तरी शाळेत शिकताना ते मित्र नव्हते तर एकमेकांचे वैरी आणि प्रतिस्पर्धी होते. शाळेत कोणतीही स्पर्धा असो त्यात अजय आणि विजय यांच्यात चुरशीची स्पर्धा होत असे. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच छत्तीसचा आकडा राहत असे. पण ही एवढी दुश्मनी पक्या मैत्रीत कशी रूपांतरित झाली ? दोघे जीवाभावाचे मित्र कसे बनले? 


अजय हा एक गरीब घरातला मुलगा. त्याचे वडील मोंढ्यात हमालीचे काम करत असत. दिवसभर हमाली करायची आणि सायंकाळी येतांना दारू ढोसून यायचं त्याचं नित्याचं काम असायचं. आई देखील त्याच मोंढ्यात काम करायची. रोज येताना ती पिशवीत काही ना काही बांधून आणायची. मोंढ्यात जो कोणता माल यायचा त्यातला खाण्यापूरता माल ती येताना घेऊन यायची. आपलं लेकरू खूप शिकावं असे तिला वाटायचं मात्र अजयचे वडील विरुद्ध मताचे होते. शिकून काय करणार आहे ? त्यापेक्षा कोण्या दुकानावर राहिलास तर चार पैसे मिळतात आणि तेवढंच घर चालवायला मदत होईल. पण अजयची आई ऐकायची नाही आणि अजयला खूप शिकवण्याचं स्वप्न पहायची. अजय अभ्यासात हुशार नव्हता पण इतर खेळाच्या बाबतीत सर्वात पुढे राहायचा. दिसायला सुंदर जरी नसला तरी त्याची शरीरयष्टी दणकट होती, जे मिळेल ते खात असल्याने त्याच्यात शक्ती भरपूर होती. रोज सकाळी तो कसरत करायचा आणि रनिंग देखील करायचा. त्याचं जास्तीत जास्त लक्ष खेळाकडे असायचं त्यामुळे त्याचे वडील त्याला नेहमी टाकून बोलायचे. प्रत्येक प्रजासत्ताक दिनी तो भरपूर बक्षिसं जिंकून आणायचा तेव्हा आईची छाती भरून यायची तर त्याचे वडील म्हणायचे ," ते सगळे बक्षीस त्या चुलीत घाल, यापेक्षा रुपये दिले असते तर ते कामाला तरी आले असते." वडिलांचे हे बोलणे ऐकून अजय खूप नाराज व्हायचा. पण त्याची आई त्याला प्रेरणा देत राहायची, त्यामुळे पुन्हा तो नव्या उमेदीने सराव करायचा. 


अजय ज्या शाळेत आणि वर्गात शिकत होता, त्याच वर्गात विजय ही शिकत होता. विजय हा एका श्रीमंत घरण्यातला मुलगा. त्याला दुःख म्हणजे काय असते ? याची माहितच नव्हते. तो आपल्याच दुनियेत मदमस्त राहायचा. वर्गातील सारी मुले त्याच्याभोवती नेहमी घुटमळत राहायची फक्त विजयला सोडून. विजय देखील अभ्यासात तेवढा हुशार नव्हता मात्र त्याला विविध खेळाची आवड होती आणि अजय सारखा तो देखील शाळेतील अनेक खेळात बक्षिसं मिळविली होती. फक्त फरक एवढाच होता की, अजय मैदानावर म्हणजे आउट डोअर वर आपलं वर्चस्व गाजवयाचा तर विजय इन डोअर गेममध्ये वर्चस्व मिळवायचं. जे खेळ विजयला चांगल्याप्रकारे खेळता येतात, ते अजयला खेळायलाच मिळत नसल्याने तो त्या स्पर्धेत सहसा भाग घेत नव्हता. मात्र विजय कधी कधी आउट डोअर गेममध्ये सहभागी व्हायचा आणि अजयला टक्कर देण्याचा प्रयत्न करायचा. पण अजय त्याला कधी ही पहिल्या क्रमांकावर येऊ दिले नाही. राहून राहून विजयला त्याचे दुःख वाटायचे. माझं नाव विजय आहे म्हणजे सर्व गेममध्ये माझाच विजय झाला पाहिजे असे त्याला मनोमनी वाटायचं आणि त्यासाठी अजय फक्त अडसर ठरत होता. त्यामुळेच ते दोघे एकमेकांचे वैरी बनले आणि परस्परविरोधी प्रतिस्पर्धी देखील. विजयचे मित्र नेहमी त्याची स्तुती करायचे आणि अजयविषयी काही बाही बोलून कान भरायचे. त्या दोघांमध्ये मैत्री होऊच नये असे मित्रांना वाटत असे. 


जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड करायची होती म्हणून शाळेत काही स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. बहुतांश गेममध्ये अजयची निवड पक्की झाली होती. धावण्याच्या स्पर्धेत अजयच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे सर्वाना माहीत होतं, पण घडलंय उलटंच. त्यादिवशी शाळेत धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अजय आणि विजयसह अनेक विद्यार्थी त्या स्पर्धेत सहभागी झाले होते. विजयच्या मित्रांनी मिळून एक प्लॅन तयार केला. धावण्याची स्पर्धा सुरू झाली की, अजयच्या ट्रॅकवर काचेच्या गोट्या टाकायच्या. ठरल्याप्रमाणे धावण्याची स्पर्धा सुरू झाली, विजय एका कडेला उभा होता, अजय मधोमध उभा होता आणि विजयचे मित्र त्याच्या आजूबाजूला उभे होते. जशी स्पर्धा सुरू झाली तशी विजयच्या काही मित्रांनी अजयच्या पळण्याच्या ट्रॅकवर काचेच्या गोट्या फेकायला सुरुवात केली. अजय अनवाणी पायाने पळत होता. एका काचेच्या गोटीवरून त्याचा पाय निसटला आणि तो मैदानावर कोसळून पडला. तो मागेच राहिला आणि विजय पहिल्या क्रमांकावर आला. अजयला बरंच मार लागले होते. आपला क्रमांक हुकला आता आपली जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार नाही म्हणून अजय खूप नाराज झाला होता. अजयचा पडलेला चेहरा पाहून विजय खूपच खुश झाला होता. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी अखेर विजयची निवड झाली. एका महिन्याने जिल्ह्याच्या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न होणार होती. 


दुसऱ्या दिवशी सकाळी रोजच्या प्रमाणे शाळा भरली. सर्व मुले वर्गात आली. विजयने वर्गात नजर फिरवली असता, त्याला अजय कोठे ही दिसला नाही. अजय त्याचा वैरी आणि प्रतिस्पर्धी होता. पण तो वर्गात असेल तरच विजयला वर्गात बसावे असे वाटत होते. तो शाळेत आला नाही तो दिवस त्याला खूप जड गेले. सलग तीन-चार दिवस अजय शाळेत आलाच नाही. अजय शाळेत का येत नाही, धावताना पडल्याने आजारी तर पडला नाही ना ? त्याचे मन त्याला खात होते. शेवटी विजयला राहवले नाही आणि त्याने दोन मित्र घेऊन अजय ज्या ठिकाणी राहतो त्याठिकाणी त्याच्या घरी गेला. 

अजयचे घर म्हणजे एक झोपडीच. समोर मोठ्या अंगणात काही कोंबडे होते, बाजूला चूल होती, त्यावर पाणी गरम करायचं एक भांड ठेवलं होतं, बाजूला लाकडाची मोळी होती. विजय असं कधी पाहिलं नव्हतं. ते सारं पाहून तो थबकून गेला. झोपडी जवळ जाऊन त्याने अजय म्हणून हाक मारली. त्याचा आवाज ऐकून अजय बाहेर आला. पाहतो तर काय विजय आणि दोन मित्र बाहेर उभे होते. विजय आपल्या घरी आला याचे त्याला खूप आश्चर्य वाटत होते. अजयची परिस्थिती पाहून विजय शरमून गेला. त्याने केलेल्या चुकीची त्याला लाज वाटू लागली. त्याने अजयला " सॉरी ......" म्हटले. अजयला काही कळाले नाही. तेव्हा दुसऱ्या मित्राने धावण्याच्या स्पर्धेतील विजयने केलेली चिटिंग सांगितली. अजय देखील मोठ्या मनाने विजयला माफ केलं. दुसऱ्या दिवशी शाळेत येण्याचे सांगून विजय आणि मित्र निघून गेले. विजयच्या एका भेटीने अनेक वर्षाची दुश्मनी व वैरभाव संपून गेलं. 


शाळा भरली. एका वर्गात दूर दूर बसणारे आणि एकमेकांविरुद्ध खुन्नसपणे पाहणारे अजय आणि विजय एकमेकांच्या गळ्यात हात टाकून एका बाकावर बसले होते. हे दृश्य पाहून वर्गातील विद्यार्थ्यांसह गुरुजी देखील आश्चर्यचकित झाले. विजयने गुरुजींना सर्व खरी माहिती सांगितली तेव्हा धावण्याच्या स्पर्धेत विजयच्या ऐवजी अजयची निवड करण्यात आल्याचे जाहीर झाले. सर्वानाच आनंद झाला. त्यावर्षी अजय आणि विजय मिळून जिल्हास्तरावरून अनेक पारितोषिक आपल्या शाळेसाठी घेऊन आले. धावण्याच्या स्पर्धेत विजयने अजयची नुसती निवड करायला भाग पाडले नाही तर त्याला छान शूज आणि ड्रेस देखील दिला. त्यामुळे तो जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकला, विभागीय स्पर्धेत देखील त्याने पहिला क्रमांक मिळविला त्यामुळे राज्यावर त्याची निवड झाली. अजय जेव्हा पळतो तेव्हा नुसतं पाहत राहावं वाटतं, तो हरणासारखा चपळ पळतो, त्याचे पाय जमिनीवर राहतच नाहीत मुळी, तो हवेवरच राहतो. अर्थात राज्याच्या स्पर्धेत देखील त्याने पहिला क्रमांक मिळविला आणि शाळेचे नाव प्रसिद्ध केला. आज ही तो आपल्या विजय सारख्या मित्रांची नेहमी आठवण काढतो. त्याची जर मला साथ मिळाली नसती तर मला हे यश मिळाले नसते असे अजय म्हणतो तर माझ्या जीवनात तो आला म्हणून मला हे सुंदर जीवन जगता आलं, नसता मी माझ्या गर्वात कुठं राहिलो असतो, माझे मलाच माहीत नाही, असे विजय म्हणतो.


Rate this content
Log in