Rahul Shinde

Others

2.5  

Rahul Shinde

Others

इंजिनियरिंग दिवस

इंजिनियरिंग दिवस

10 mins
1.6K


माझं इंजिनियरिंग पूर्ण होऊन ६ वर्षे झाली आहेत.ते चालू असताना असाइनमेंट,ओरल,प्रॅक्टिकल,टेस्ट्स अशा 'रात्र थोडी आणि सोंगं फार' प्रकाराने जेव्हा वैताग यायचा तेव्हा आमचे काही मोटिवेशनल स्पीकरसारखे भूमिका घेणारे मित्र आम्हाला 'अरे रामाने तर १४ वर्षे वनवास भोगला होता,आपल्याला तर चारच वर्षे भोगायचा आहे' अशा पद्धतीचे विनोद करून धीर द्यायचे. वास्तवात आता वाटते,ती चार वर्षे कशी सर्रकन निघून गेली, कळलंच नाही.

इंजिनियरिंगमध्ये संपूर्ण चार वर्षात शेवटच्या वर्षी असणारा 'प्रोजेक्ट' संपूर्ण टप्प्यात महत्वाचा मानला जातो,जणू तुम्ही संपूर्ण इंजिनियरिंग मध्ये काय काय शिकला( किंवा काहीतरी शिकला की नाही?)या संकल्पना प्रात्यक्षिकपणे त्यात मांडाव्या लागतात.कॅम्पस सिलेक्शनच्यावेळीही मुलाखतीत या शेवटच्या वर्षीच्या प्रोजेक्टबद्दल विचारले जाते..आजकाल आता 'आमच्याकडे इंजिनीरिंगचा प्रोजेक्ट २०-२५-३० हजारात बनवून मिळेल' असंही बऱ्याच बाहेर खाजगी ठिकाणी चालू झालं आहे. हद्द म्हणजे आजकाल एवढे इंजिनियरिंग कॉलेजेस वाढले आहेत की काही कॉलेजमध्ये शिक्षकच मुलांना सांगतात 'तुम्ही प्रोजेक्ट बाहेरून विकत बनवून आणलात तरी चालेल.'(प्रोजेक्ट स्वतः करताना विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या,आणि त्या आपल्यालाच झेपल्या नाहीत तर उगच फुकटचा डोक्याला ताप, असा यापाठीमागे शिक्षकांचा थोर विचारही असावा), पण आम्हाला आमच्या कॉलेजच्या ENTC च्या (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकॉम्म्युनिकेशन) हेडनी आधीच 'तुमचा प्रोजेक्ट पूर्णपणे वर्क नाही झाला तर कदाचित तुम्हाला थोडे कमी मार्क मिळतील, पण जर कोणी प्रोजेक्ट बाहेरून विकत आणला आहे हे समजलं तर मात्र त्याचं काय खरं नाही.२० वर्षाचा अनुभव आहे मला, ओरल मधल्या २-४ प्रश्नानीच मी पकडतो कोणी प्रोजेक्ट स्वतः न बनवता बाहेरून एक्स्पर्टकाढून विकत आणला आहे.' अशी आम्हाला प्रेमळ धमकी दिली होती.यामुळेही आणि 'आपलं ज्ञान वापरण्याची हीच संधी आहे, स्वतः प्रोजेक्ट करून आपल्याला अनुभव मिळेल' या विचाराने आमच्या तीन जणांच्या ग्रुपने (सुजित शिंगटे आणि नकुल शर्मा हे माझे प्रोजेक्ट पार्टनर) प्रोजेक्ट स्वतःच बनवायचा असं ठरवलं.

असं नुसतं ठरवून ठेवलं असलं तरी शेवटचं वर्ष चालू झाल्यावर दोन महिन्यांनी जेव्हा प्रोजेक्टचा विषय फायनल करून त्यावर बेसिक प्रेजेंटेशन देण्याची तारीख नोटीस बोर्डवर झळकली,तेव्हा आम्हाला जाग आली(सहसा कुठलीही डेडलाईन आल्याशिवाय इंजिनीयरिंगची बहुतांश मुलं जागी होत नाहीत,जे मोजके आधीपासून प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतात त्यांना ३ इडियट्स मधला 'चतुर' वगैरे अशा प्रकारची दूषणं दिली जातात.)आता काही करून प्रेजेंटेशनच्या आधी सबजेक्ट फायनल करावा लागणार म्हणून आम्ही कॉलेजपासून अगदी जवळ,अर्ध्या किलोमीटरवर असणाऱ्या सुजितच्या रूमवर जाऊन इंटरनेटवर विषय शोधू लागलो.त्यातून 'इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रोगॅमींग' दोन्ही अँपलाय होईल असा एक विषय फायनल केला,त्यावर (कसंबसं) प्रेजेंटेशन बनवलं आणि ठरलेल्या दिवशी तो विषय तज्ज्ञ कमिटीसमोर मांडला….

"is this project really feasible in one year?" त्यांच्यापैकी एक शिक्षक.

"आ? ...we will do ."आम्ही म्हणालो पण आम्हालाच त्याबद्दल काही ठामपणे सांगता येत नव्हतं.

"Really? and what about the total cost?"

"पूर्ण एस्टीमेट नाही काढलं पण होईल फायनल इयरच्या लेव्हलच्या जेनेरल बजेटमध्ये.." आमच्यापैकी एकजण.

"हे बघा,मला नाही वाटत हे एका वर्षात होणारं प्रोजेक्ट आहे, असा प्रोजेक्ट इंडस्ट्रियल लेवलला केला जातो,तेही ४-४ वर्ष अनुभव असलेल्या माणसांकडून.यातला बेसिक पार्ट करायचा ठरवला तरी तुम्हाला २ वर्ष लागतील किमान.आणि कॉस्टसुद्धा खूप जाईल."

आम्हाला यावर काहीही एक्सप्लेनेशन देता आलं नाही,आम्ही हिरमुसून ऐकत होतो...

आम्ही ठरवलेला प्रोजेक्ट रिजेक्ट झाला याच्या दुःखापेक्षा 'आता नवीन प्रोजेक्ट शोधावा लागणार' याचं जास्त दुःख होत होतं.

त्याच दिवशी परत तसंच सुजितच्या रूमवर जाऊन तिथे नवीन प्रोजेक्टचा सबजेक्ट नेटवर शोधू लागलो.

"आपल्यालाच प्रोजेक्ट सबजेक्ट नीट प्रेझेन्ट करता आला नाही,म्हणून रिजेक्ट झाला."

"बहुत कम ग्रुप्स के प्रोजेक्ट रिजेक्ट हो गये,और उसमे हम है!" नकुल.

"साले तेरा खून ही B-ve है इसलिये हमेशा ऐसे बोलता है! आठवतंय ना सर म्हणाले, हा स्टुडन्ट लेवलला जड जाईल करताना, पुढे वर्षभर प्रॉब्लेम होण्यापेक्षा बरं झालं आत्ताच रिजेक्ट झाला...और जितना बडा संघर्ष होगा,जीत उतनी ही शानदार होगी." हे मोटिवेशन सुजीतचं.

"आणि ज्या प्रोजेक्ट ग्रुपचे प्रोजेक्ट अप्रूव्ह झालेत त्यापैकी बऱ्याच जणांनी ऑलरेडी कोणी ना कोणी मेंटॉर निवडून त्यांच्यासोबत टॉपिक डिसकस केला होता..." मी.

"आपणही आता तेच करूया..परत उगच आपण नेटवरून सर्च करून टॉपिक सिलेक्ट करून त्यांना दाखवणार आणि परत रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत..त्यापेक्षा कॉलेजमधल्या कुठल्यातरी मेंटॉरकडे आपणच जाऊन त्यांच्याकडूनच प्रोजेक्ट ठरवूया .."

"हा ऐसा ही करते है....."असं म्हणत नकूलनेही दुजोरा दिला आणि परत एकदम आठवल्यासारखं म्हणाला," ये तो हमे पहले ही करना चाहिये था( असं संपूर्ण इंजिनियरिंगमध्ये आम्ही खूपदा म्हणतो,पण मुहूर्त आल्याशिवाय काही होत नाही)." यावर कोणी काहीच बोललं नाही.

दुसऱ्या दिवशी आम्ही २० वर्षाचा लेक्चररशिपचा अनुभव असणाऱ्या सरांकडे गेलो,आमचा प्रोजेक्ट रिजेक्ट झाल्याबद्दल सांगितलं आणि आता तुम्हीच आम्हाला एखादा 'feasible ' सब्जेक्ट द्या आणि आमचे मेंटॉर व्हा म्हणून त्यांना विनंती केली.

"माझ्याकडे आहे एक सब्जेक्ट ,त्यावर फायनल इयर लेवलचा प्रोजेक्ट होऊ शकेल 'Magnetostrictive Level transmitter and its applications '." सरांनी सबजेक्ट दिला.

"ok ...magnetostruc ....tive ..." अख्या चार वर्षात आम्ही नावही कधी ऐकलं नव्हतं.

"काय फंकशन करतं हे?" पुढे आमच्यापैकी एकाने विचारलं.

"तेही मीच सांगितलं तर तुम्ही काय सर्व्हे करणार?" सर म्हणाले.

"..येत्या सोमवारपर्यंतच सिनॉप्सीस आणि मेंटॉरच नाव सबमिट करायचंय ना,सो तुम्ही थोडं ब्रिफली सांगितलं तर..."

"मी सबजेक्ट सांगितला.तुम्हाला नेटवर याची सगळी माहिती मिळेल.ते शोधण्याचे कष्ट करा..काय कळाले ते मला उद्या येऊन सांगा..काही शंका असतील तर डिसकस करू..आणि मग परवापर्यंत सिनॉप्सीस बनवा.."

आम्ही त्याच दिवशी सुजितच्या रूमवर गेलो,'Magnetostrictive Level ट्रान्समीटर' बद्दल माहिती मिळवली,त्यातले महत्वाचे पॉईंट्स लिहून काढले आणि दुसऱ्या दिवशी सरांना जाऊन भेटलो,

"सर माहिती मिळवली....हे एक असं डिव्हाईस आहे जे मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये टॅंकमधील केमिकल्स वगैरेची लेवल मोजण्यासाठी उपयोगी पडते.म्हणजे उदाहरणार्थ १० मीटरच्या टॅंकमध्ये त्या केमिकलची लेवल किती मीटरपर्यंत प्रेसेंट आहे,ते हे डिव्हाईस मोजणार, त्यानुसार रिडींग डिस्प्ले होणार." आम्ही स्पष्ट केले,

"यासाठी अनेक ऑपशन्स असतील, मग हेच डिव्हाईस का?" सरांचा हा प्रश्न माहिती शोधताना आम्हालाही पडला होता आणि आम्ही त्याचे उत्तर शोधले होते.

"कारण हा डिव्हाईस खूप accurate आहे, हा कॉस्टली आहे ,पण मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये मिलीमीटरचा डिफरेन्स मॅटर करतो आणि म्हणूनच हा डिव्हाईस." आमचं उत्तर बरोबर होतं, पण 'फायनल इयरच्या लेवलच्या आमच्या कॉस्ट मध्ये हा बसेल का?' हा आमचा प्रश्न होता,पण त्यासाठी १ मीटरपर्यंतचे प्रोजेक्टलेव्हलला वापरता येतील असे डिव्हाईस मिळतात आणि ते आम्हालाच शोधावे लागणार असं सरांनी सांगितले.

शेवटी प्रोजेक्टचा सब्जेक्ट फायनल झाला,आणि त्याचे सिनॉप्सीस आम्ही नंतर सबमिट केले.

**

प्रत्येक पंधरा दिवसांना मेंटॉरना भेटून त्यांना प्रोजेक्टची प्रगती कुठे पर्यंत आली आहे हे सांगावे लागत असे,आमची एक सेमिस्टर तर प्रोजेक्टबद्दल आणि त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या पार्टसची माहिती,अभ्यास करण्यातच निघून गेली.दुसरी सेमिस्टर चालू झाल्या झाल्या जेव्हा आम्ही मेंटॉर सरांना भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला दाखले दिले,

"अजून किती नुसता सर्व्हे करत बसणार? सगळं वर्ष त्यातच निघून जाईल आणि इम्प्लिमेंटेशन राहील बाजूलाच. झाला तेवढा theoritical survey बास झाला,आता प्रक्टिकल बिल्ड करायला चालू करा.पार्ट बाय पार्ट प्रोग्रामिंग अँड टेस्टिंग करा.Magnetostrictive Level transmitter चं काय झालं?"

"हो त्याचा केला ना आम्ही स्टडी.."

"स्टडीचं नाही,तो पार्ट कुठे मिळतोय शोधला का?"

"करतोय सर्च इंटरनेटवर..."कदाचित हे उत्तर काही वेळाच्या विरामानंतर आले असावे ,तेही हळू आवाजात.

"कधीपर्यंत सापडेल? फायनल ओरल झाल्यावर?"

"......"

"प्रोजेक्ट साठी हे डिव्हाईस मिळणं महत्वाचं आहे, आणि ते स्टुडन्टलेवलसाठी कमी किमतीतले सहजासहजी मिळत नाहीत."

"हा तेच तर सर,आम्ही जे शोधतोय त्याची किंमत ५० हजार ते ७० हजार अशी आहे,आणि ते इंडस्ट्रियल लेवलला उपयोगी होणारे आहेत,जास्त हाईट असणारे."

"म्हणूनच म्हणतोय,ते आधी शोधा, तुमच्या बजेटमधलं..१५ दिवसात जर शोध नाही लागला, तर ते डिव्हाईस पण तुम्हालाच बनवावं लागेल,त्यासाठी मग दोन महिने घालवावे लागतील डेडीकेटेडली."सस्पेन्स चित्रपत्राचा एखादा सस्पेन्स उलघडावा तसा हा सस्पेन्स सरांनी आमच्यासमोर उलघडला.

'बाप रे, आता फक्त ६ महिने राहिलेत आणि ट्रान्समीटर बनवण्यासाठी हे वेगळे दोन महिने काढले तर बाकी प्रोग्रामिंग आणि सेटअप कधी करणार..आणि शिवाय सेमिस्टरचे सबजेक्टस,त्याचा अभ्यास कधी करणार?/काहीही करून हा स्टुडण्टलेव्हलसाठी असणारा ट्रान्समीटर मिळवणं गरजेचंच आहे.' हे आम्हा तिघांनाही प्रकर्षानं जाणवत होतं.

ट्रान्समीटर मिळवण्यासाठी आम्ही इंटरनेटवर युद्धपातळीवर शोध मोहीम चालू केली.अनेक इलेक्ट्रॉनिक साईट्सवर तो ट्रान्समीटर उपलब्ध होता,पण इंडस्ट्रियल लेव्हलचा महागडा,...स्टुडण्टलेव्हलचा सापडेनाच.आठ-दहा दिवस गेले आणि एके दिवशी आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरच्या एका कंपनीच्या साईटवर आमची माहिती दिली होती तिथून आम्हाला ई-मेल आला. 'आम्हाला हवा असणारा पार्ट त्यांच्याकडे उपलब्ध नसला तरी स्पेसिफिकेशन्सनुसार ते आम्हाला १५ दिवसात पार्ट बनवून पाठवतील.' असे ई-मेल मध्ये त्यांनी नमूद केले होते.त्याचा खर्चही एकूण आठ हजार,आमच्या बजेटमध्ये होता.महत्वाचा बोजा हलका झाल्यामुळे आम्ही हरकलो आणि हा पार्ट मागवला.ट्रान्समीटर मिळाल्याची वार्ता आमच्या मेंटॉरना आम्ही संपूर्ण प्रोजेक्टच यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याच्या अविर्भावात सांगितली.

मागवलेला 'magnetostrictive level Transmitter ' १५-२० दिवसांनी आला आणि आम्ही तो सुजितच्या रूमवर ठेवून दिला.हा ट्रान्समीटर मिळाला आहे हे दोन दिवसांनी सरांना भेटून सांगितले.

"गुड,टेस्टिंग केलं ना ट्रान्समीटरचं?" सरांचा लगेच तार्किक प्रश्न,

"------" आम्ही काहीच बोलू शकलो नाही,खरंतर तो ट्रान्समीटर आल्या आल्या आम्ही त्याचं विशिष्ट आउटपुट येतंय का याचं टेस्टिंग करायला हवं होतं, इतकी साधी गोष्ट आपण विसरलो या अविर्भावात आम्ही तिघांनी एकमेकांकडे पाहिले.

"सर,टेस्टिंग करणारच आहे,पण विचार केला तुम्हाला एकदा विचारावं?" अशी थाप मारून सुजितने सावरून घेण्याचा प्रयत्न केला.

"मला काय विचारावं, टेस्टिंग साठी कोणता मुहूर्त चांगला आहे?"सरांचा पलटवार.

"करतो सर,आजच टेस्टिंग करतो."

आमचा मोर्चा थेट सुजितच्या रूमकडे वळला .ट्रान्समीटर १ मीटरचा होता, त्यामुळे उंचीने मोठ्या बॅरेलमध्ये त्याचं टेस्टिंग करायचं आम्ही ठरवलं... तिथला बॅरेल अर्धा भरलेला होता...आणि आम्हाला संपूर्ण टेस्टिंग करण्यासाठी आधी बॅरेल रिकामा हवा होता...त्यावेळी आउटपुट झिरो यायला हवं होतं.आणि नंतर आम्ही बॅरेलमध्ये जसंजसं पाणी ओतू तसं आउटपुट वाढून पाणी ट्रान्समीटरच्या उंचीपर्यंत आल्यावर १००% यायला हवं होतं.

आम्ही बॅरेलमध्ये असणारं पाणी बादल्यांमध्ये काढून घेतलं,बॅरेल रिकामा झाल्यावर त्यात ट्रान्समीटर ठेवला आणि रिडींग घेतलं तर एक विनोदी(त्यावेळी धक्कादायक) प्रकार दिसला,पाणी काहीच नसताना ट्रान्समीटरमधून आउटपुट झिरो यायला हवे तर तिथे १००% येत होते.आम्हा तिघांनाही काही कळेना.परत आम्ही त्यात पाणी टाकायला लागलो तर आउटपुट हळूहळू कमी होऊ लागलं आणि पूर्ण बॅरेल भरल्यावर (जिथे आउटपुट १००% हवं) आउटपुट झिरो दिसायला लागलं.

"हे काय?..ट्रान्समीटर उलटा वर्क होतोय..."

"आता काय करायचं?"

"जहाँ से ट्रान्समीटर ऑर्डर किया उसकोही बोलते है कॉल करके..."

तोच एक मार्ग होता, आम्ही त्या माणसाला कॉल केला,पण हद्द म्हणजे तो माणूस ट्रान्समीटर मध्ये अशी काही चूक आहे हे मान्यच करायला तयार नाही..अजिबात प्रोफेशनल माणूस नव्हता तो.आम्हाला डोळ्यासमोर परत अंधार दिसू लागला.

"मेंटॉर को ये बात बोलनी होगी यार.." नकुल.

"हा पण ते तरी काय करतील? ते फक्त गाईड आहेत आपले,यातून मार्ग तर आपल्यालाच काढावा लागणार." मी.

"आयडिया..." काही वेळेच्या शांततेनंतर सुजीतला एक युक्ती सुचली,"हे ट्रान्समीटर उलटं वर्क करतंय ना, आपण पुढचं प्रोग्रामिंग पण उलटं करूया.म्हणजे मिनिमम आउटपुट ला फुल रिडींग सेट करूया..आणि वाईस व्हर्सा.." युक्ती एक्दम पटण्यासारखी होती, तसाही याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता.

यथावकाश या सगळ्या ट्रान्समीटरच्या रामायणाबद्दल सरांनाही कल्पना दिली.प्रोजेक्ट प्रोग्रामिंग आणि हार्डवर्क बनवण्याच्या कामाला आम्ही समांतरच सुरुवात केली.ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा ट्रान्समीटर कामासाठी कॉलेजमध्ये घेऊन गेलो तेव्हा आमच्या मित्र-मैत्रिणीच्या चेहऱ्यावर कौतुकमिश्रित आश्चर्य आम्हाला दिसत होतं.

"बाप्पा,फारच मोठा प्रोजेक्ट करून राहिला तुम्ही.केवढा मोठा आहे ट्रान्समीटर.'

"अरे,काय आहे हे?...."प्रोजेक्टचा पार्ट?एवढा मोठा?"

"अख्या युनिव्हर्सिटीत तुमचा प्रोजेक्ट गाजणार बघा..."

अशा पद्धतीचा शाब्दिक वर्षाव आमच्यावर होत होता.

***

सेमिस्टर संपायला महिनाभर राहिलेला असताना आमचं प्रोजेक्टचं प्रोग्रामिंग बऱ्यापैकी आटोक्यात आलं होतं.हार्डवेअर बनवणं आणि त्यातल्या काही गोष्टींचं टेस्टिंग आम्ही शक्यतो कॉलेजमध्येच करायचो,प्रोजेक्टसाठी आम्हा विद्यार्थ्यांना एक स्वतंत्र रूमच दिली गेली होती. एकदा असेच आम्ही आमच्या ट्रान्सफॉर्मरचे टेस्टिंग करत होतो, ट्रान्सफॉर्मरला प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन बाजू असतात.आम्ही प्रायमरी आणि सेकंडरी बाजू योग्य ठिकाणी कनेक्ट करून आउटपुट चेक करत होतो,पण अपेक्षित आउटपुट काही मिळत नसल्याने आम्हाला सुचेनासे झाले होते.

"ह्या ट्रान्सफॉर्मरचं पण फंकशन उलटं असलं तर? ट्रान्समीटरसारखं?म्हणजे चुकून आपण प्रायमरी बाजू जी समजतोय ती सेकंडरी असू शकेल.." आमच्यापैकी कोणीतरी अक्कल पाजळली.

"असं असू शकेल?आणि मग काय करायचं?"

"तेच करायचं..जिथे प्रायमरी कनेक्ट करतोय तिथे सेकंडरी आणि वाईस व्हर्सा.."

"काही प्रॉब्लेम नाही ना होणार.."

" प्रयत्न तर करून बघू..."

आणि आम्ही तसे करून बघितले ..काही सेकंद झाले आणि आमची तिघांचीही तंतरली..कनेकशन उलटे आणि चुकीचे केल्यामुळे त्या छोट्या ट्रान्सफॉर्मरला एकदम आग लागली होती...

आमच्या बाजूच्या टेबलवर इतरजण आपापले प्रोजेक्ट काम करत होते, ते सगळे आग बघून घाबरून उभे राहिले..आख्या खोलीत चाललेला आधीचा गोंधळ या लागलेल्या आगीने शांत झाला आणि सगळेजण आगीकडे आणि आमच्याकडे बघू लागले ..लॅब अससिस्टन्ट तिथे धावत आले पण तोपर्यंत थोड्या वेळाने आग आपोआप विझली ..आम्ही तिघेही एकमेकांकडे नुसते पाहत होतो..

"कशामुळे आग लागली?" आग विझल्यावर लॅब अससिस्टन्टच्या या प्रश्नावर "असं कसं झालं ते आम्हालाच कळालं नाही" असं आम्ही ऊत्तर दिलं.आम्ही केलेली प्रायमरी आणि सेकंडरीची करामत कोणालाही कळाली असती तर आख्या कॉलेजमध्ये तो चर्चेचा विषय झाला असता.. या झालेल्या आगप्रकरणाने आम्हाला कामासंदर्भात पुढे काही सुचत नव्हते,आम्ही सगळा सेटअप आवरून प्रोजेक्ट रूममधून गाशा गुंडाळला.

त्या दिवशी घरी पोचल्यावर मला दोन मित्र-मैत्रिणींचे या आगप्रकरणासाठी सांत्वनपर कॉल आले.

"तुमच्यापैकी कोणाला काही इजा नाही ना झाली."मित्र.

"तू होतासच ना त्या लॅबमध्ये..तेव्हा काही विचारले नाहीस? "

"अरे तेव्हा एकतर त्या आगीमुळे केवढा गोंधळ झाला,म्हणलं तुम्ही धक्क्यात असाल, त्यातून सावरण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा.." काय थोर विचार होता मित्राचा.

आता ट्रान्सफॉर्मर जाळल्यामुळे ,सॉरी जळल्यामुळे त्याच स्पेसिफिकेशनचा दुसरा ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेतून परत आणावा लागणार होता आणि मग परत टेस्टिंग. पार्ट बाय पार्ट..मग पूर्ण सर्किट बनवून परत प्रोग्रामिंग लोड करून टेस्टिंग..उरलेल्या एक महिन्यात कसा होणार प्रोजेक्ट?....पण हे आगप्रकरण आमच्या मेंटॉरपर्यंत पोचलं नाही,नाहीतर आमचं काही खरं नव्हतं,हा आशावाद घेऊन आम्ही परत पुढच्या कामाला लागलो.

***

प्रोग्रामिंग करून ते इलेक्ट्रॉनिक पार्ट मध्ये लोड करून त्याचं टेस्टिंग करणं, विशिष्ट आउटपुट नाही आलं तर रिप्रोग्रॅमिंग करणं, परत रीलोड,पेपरवर्क..अशा सगळ्या दिव्यातून आम्ही जात जात संपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण केला...

प्रोजेक्ट बनवून झाला तरी फायनल प्रोजेक्ट ओरलचा वेगळाच माहोल असतो, ओरल घेणारे एक्सटर्नल परीक्षक किती डीप किंवा सोपे प्रश्न विचारतात त्यावरही प्रोजेक्टचे मार्क आणि पास/फेल होणे अवलंबून असते..

तोंडी परीक्षेचा दिवस उजाडला..आमच्या स्लॉटमधले लॅबमध्ये आमच्यासहित प्रत्येक ग्रुप आपआपला प्रोजेक्ट सेटअप करून बसला होता.रोलनंबर नुसार आमच्याच ग्रुपचा ओरलचा पहिला नंबर..त्यामुळे परीक्षकांचे गुणधर्म कसे त्याबद्ल काहीच अंदाज नव्हता.वर्षभर,विशेषतः शेवटच्या दोन महिन्यात कितीही उपदव्याप.. सॉरी कष्ट केले असले तरी प्रत्यक्ष मैदानावर कसा खेळ करू त्यावरच आमचा स्कोर ठरणार होता. आमची तोंडी परीक्षा घेण्यासाठी एक्सटर्नल परीक्षकांसोबत आमचे मेंटॉर आणि त्याच बरोबर डिपार्टमेंटचे हेड आमच्याजवळ आले.

"हं...सांगा तुमच्या प्रोजेक्टबद्दल ब्रिफली...अँड एव्हरीवन फ्रॉम ग्रुप शूड स्पिक.." एक्सटर्नल आम्हाला म्हणाले..

आम्ही प्रोजेक्टबदल प्रेसेंटेशन द्यायला सुरुवात केली..त्यातच मधूनच एक्सटर्नल प्रश्न विचारू लागले...आम्ही त्याची उत्तरं देत होतो..सहसा सगळी उत्तरं आम्हाला माहित होती..गेले कित्येक दिवस, रात्र(आणि कित्येकदा स्वप्नातसुद्धा) आम्ही प्रोजेक्टचं काम मनापासून केलं होतं..त्यामुळे सगळी उत्तरं आतून येत होती..प्रश्न उत्तरं चालू असताना मधूनच आमचे मेंटॉर सर म्हणाले,

"हा स्टुडण्टलेव्हलचा magnetostrictive ट्रान्समीटर मिळणं सोपं नाही.पण या मुलांनी खूप शोध घेऊन तो मागवला,शिवाय त्याचं आउटपुट उलट येत असल्यामुळे त्यांनी प्रोग्रॅमिंगही उलट केलं." वर्षभर आमच्या कामाचं कौतुक न करणारे मेंटॉर एक्सटर्नलसमोर आमची मनापासून प्रशंसा करत असल्यामुळे आम्हीही अवाक झालो...

प्रेझेंटेशन आणि प्रश्न उत्तरं झाल्यावर आम्ही प्रोजेक्टचा डेमो दाखवला..तोही व्यवस्थित झाला..

जवळपास अर्ध्या-पाऊण तासानंतर आमची प्रोजेक्ट ओरल पार पडली..अपेक्षेपेक्षा जास्त चांगली....

आम्ही प्रोजेक्टचा सेटअप आवरून त्या लॅब मधून बाहेर पडलो...स्लॉटमधील सर्वांच्या ओरल संपल्यावर आमच्या मेंटॉर सरांना जाऊन भेटलो,प्रोजेक्टबद्दल,त्यातल्या अडचणींबद्दल खूप गप्पा मारल्या.पहिल्यांदा कदाचित कुठल्याही दडपणाशिवाय आम्ही त्यांच्याशी बोललो आणि मग तिथून निघालो, त्यांच्यापासून एकच गुपित लपवून..,..

'प्रोजेक्टकाम करताना भर लॅबमध्ये आमच्या ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीबद्दल त्यांना आजही माहिती नाही...'...

हा लेख त्यांच्यापर्यंत पोचला तर मात्र........


Rate this content
Log in