इच्छिलेले स्थळ
इच्छिलेले स्थळ


अकरावीत असताना शाळेची ट्रीप दिल्लीला गेली होते. आमच्या अकराविच्या पाच तुकड्या होत्या. बरीच मुले गेली होती तर माझ्यासारखी काही जण गेली नव्हती. ट्रीपवरून आल्यावर त्या मुलांनी ताजमहलचे खूप सुंदर वर्णन केले होते. व फोटो वगैरे पाहून मनाला एक चुटपुट लागली होती.
बराच कालावधी गेला. मी ही मुंबईच्या शाळेत शिक्षिका बनले आणि माझ्या मुलांना घेऊन आम्ही सर्व शिक्षक शिक्षिका ट्रीपला जाऊ लागलो. बेंगलुरु ,उटी, हैद्राबाद, राजस्थान अशी अनेक स्थळे बघितली. दिल्लीची ही तयारी झालेली. खूप वर्षाची माझी इच्छा पुरी होणार म्हणून मी ही आनंदित झालेले. पण म्हणतात ना इच्छिलेले सगळ मिळत नाही. आमची दिल्लीची ट्रीप ही कॅन्सल्ड झाली त्याच कारण म्हणजे अतिरेक्याचे बोंब हल्ले. त्या भितीने नको बाबा पोरांना घेऊन जायचं म्हणून रद्द केलं. झाले माझ्या आशेवर पाणी पडले.
"दिल्ली अब बहुत दूर है।" असे झाले. परत कधी दिल्लीचा योग आला नाही.
पुन्हा बरीच वर्षानी अचानक असं जुळुन आलं कि ह्यालाच योग म्हणतात असे वाटले.
मी भारतीय योग संस्थान मध्ये योगाभ्यास करायला जाऊ लागले. एवढी काही योगाची आवड नव्हतीच. संगळी आग्रह करतात म्हणून जात होते. तेथे आसन, प्राणायाम काय शिकवत होते ते कळत होते. व मी करत होते. एकदा सरांनी मलाच शिकवायला सांगीतले मी जरा घाबरले कारण वर्गाला येऊन चारच दिवस झालेले. पण सरांनी सांगीतले मग बोलावेच लागणार. मी सरांनी शिकवले होते त्याप्रमाणे आसने घेतली
( शाळेची टीचर होते ना मग त्यात काय अवघड?)
सर माझ्यावर खूप खूश झाले. मग अधून मधून ते मला वर्ग घ्यायला सांगायचे.
आमच्या भारतीय योग संस्थानची मार्च महिन्यात दिल्लीला शिबीर भरतात तेव्हा सरांनी आम्हाला जरा जबरदस्तीनेच दिल्लीला जायला सांगीतले " चला शिबीराचा फायदा होईल व नंतर दिल्ली आग्रा वगैरे फिरून ही या." आता ताजमहल बघायला मिळणार ! माझ्या आनंदाला पारावा राहिला नाही.
शिबीर झाल्यावर दिल्ली फिरायला गेलो. दुपारी ताजमहल बघायच ठरलं.
ताजमहलचे वर्णन इतिहासात वाचले होते. आणि मुलांना ही शिकवले होते. मनात एक सुंदर पुस्तकतल्या वर्णना सारखे चित्र साकारलेले होती. आणि खरंच शहाजाननी अमाप पैसा खर्चून बांधलेले अलोकिक शिल्पकला. खरंच किती श्रेष्ठ ते शिल्पकार! त्यांचं कौतुक करावे तितके थोडे. ताजमहलात फिरताना बारिक सारिक कोरीव काम पाहताना मन भरून येत होत. किती दुष्ट होता शहाजहान त्या अलौकिक कला सादर केलेल्यांची त्यांनी बोटे कापून टाकली. आप मतलबी होता. वीस वर्ष सतत खपून एवढां भव्य ताज महल उभारला. जगातला सातवा नंबर पटकावणारा "वंडर ऑफ द वर्ल्ड "
शहाजहानची प्रिय पत्नी मुमताज चे स्मारक.
ते बघून प्रत्येक स्त्रिला मनातून हेवा वाटण्याची गोष्ट कुठे शहाजहान आणि कुठे आपले हे एक गजरा सुध्दा आपण रागावल्यावरच मिळतो.
पुस्तकात वर्णिले त्याहुन ही जास्त कला कुशलता प्रत्यक्ष डोळ्यांनी पहाता आली. व खंत वाटली ती त्याच्या रंगाची. सफेद असलेला ताज पहल आता बाहेरून पिवळसर झाला होता. एखादे वेळे त्यावर प्रदूषणचा प्रभाव पडला असेल. तसेच यमुना नदी पाण्याने भरलेली असायची पण मी गेले तेव्हा पाणी अतिशय कमी होते व सगळा कचरा घाण प्लास्टिकच्या पिशव्या पाहून मन खूप दुःखी झाले. अजून एक गोष्ट खटकली ती म्हणजे ताजमहलच्या मागच्या बाजूचा स्तंभ थोडा तिरका दिसला. आता खरच तो तसा होता की मला वाटला माहीत नाही.
कारंज्यांचे फवारे ही सगळे दिसले नाहीत. त्यामुळे मन थोडेसे नाराज झाले. ताज महलचा जेवढा अभ्यास करून एक सुंदर प्रतिमा मनात साकारलेली ती कुठे तरी कमी जाणवली.
बाकी. एवढी वर्षे मनात बाळगलेली इच्छा पुर्ण झाली त्याचा आनंदच झाला. ताजमहलात फिरताना आणि बाहेर आलो तरी किती तरी वेळ मी मुघलच्या इतिहासातच रमले होते.