हिरवे सवंगडी
हिरवे सवंगडी


“राजू, संजू अरे कुठे आहात तुम्ही? आज सामना खेळण्यासाठी मैदानात जायचे आहे नं!”
.......
“कुठे गेलेत कोणास ठाऊक सर्वजण? घरापासून एवढ्या लांब जाऊन खेळावे लागते. जर ही झाडे नसती तर मला इथेच खेळायला मिळाले असते.”
........
“या झाडाखाली हा दिवा कोणाचा असेल बरे? खूपच जुना
दिसतोय. झाकण उघडून तर पाहूया!”
“ हा ! हा ! हा ! थँक्यू व्हेरी मच मेरे आका!
“आं, कोण आहेस तू? आणि आका नाही, माझं नाव हर्ष आहे”
“बरं हर्ष, माझं नाव जिनी. मी खरंतर एक राक्षस आहे!”
“जिनी? राक्षस जिनी? आणि तुला इंग्रजीपण येतं?”
“हो शासनाने पहिलीपासून इंग्रजी सुरू केल्यानंतर आता कोणालाही इंग्रजी येतं!”
“असू दे, पण हे थँक्यू कशासाठी?”
“ हो थँक्यूच! कारण ३०० वर्ष मी या वन आर.के.च्या फ्लॅटमध्ये अडकून पडलो होतो.”
“पण मग तू बागेत कसा येऊन पडलास?”
“काय करणार, मी जरी महाराष्ट्रातला असलो तरी माझे घर असलेला दिवा चीनचा आहे... युज अँड थ्रो! म्हणूनच वापर झाल्यानंतर मला दिव्यासकट फेकून दिलं!”
“मी तुला काय मदत करू?”
“अहं! उलट तुला काय हवंय ते मला सांग. मी तुझी एक इच्छा पूर्ण करू शकतो.”
”मला महेंद्रसिंग धोनीसारखं क्रिकेटपटू बनायचे आहे.”
“अरे मग केस वाढव!”
“केस वाढवून उपयोग नाही. त्याने कधीचेच केस कापलेत आणि आता तर पांढरेही झालेत.”
“मग आणखी काय करू?”
“माझ्या बागेतील सर्व झाडे तोडून मला खेळण्यासाठी मैदान तयार कर.”
“सॉरी मेरे आका! मी या झाडांना हात लावू शकत नाही. मी छत्रपतींच्या काळातही काम केले आहे. त्यांच्या राज्यात झाडे तोडण्यास बंदी होती. मला दुसरे काहीतरी काम सांग.”
“ठीक आहे! मला अशी जादूची कु-हाड दे ज्यामुळे मी ही झाडे तोडू शकेन.”
“जो हुक्म मेरे आका! ही कुऱ्हाड घे. ती ज्या झाडाला लावशील ते झाड नष्ट होईल. फक्त एक मिनीट थांब, मला हे बघवणार नाही. मी निघालो...”
“अरे वा! ही जादूची कुऱ्हाडच मला मोकळं मैदान करून देईल. सुरूवात या मोठ्या आंब्याच्या झाडापासून करतो.”
....
“थांब हर्ष , आम्हाला मारू नको!”
“आता हे कोण बोललं?”
“मी आंब्याचं झाड. आम्हाला मारण्यायापूर्वी एकदा आमचे म्हणने तरी ऐकून घे!”
“अजिबात नाही, माझ्याकडे जरासाही वेळ नाही. मला लवकरात लवकर मैदान तयार करून धोनी, विराटसारखं मोठा क्रिकेटपटू बनायचं आहे.
“तू मोठा क्रिकेटपटू नक्कीच हो. पण आम्हाला कापण्यापूर्वी आठवून बघ, माझ्या फांद्यांवरची आंबट-गोड फळे तू कितीवेळा खाल्लीस? लहान असल्यापासून माझ्या अंगाखांद्यावर कितीवेळा खेळलास? आतापर्यंत तर तुझ्या मित्रांना अभिमानाने ‘माझ्या आजोबांनी लावलेले झाड’ असा उल्लेख करून माझ्याकडे बोट दाखवत होतास. हे
सर्व तू विसरलास का?”
“मी काहीही विसरलो नाही. पण तुम्ही माझ्या खेळामध्ये अडचण ठरत आहात. तुम्हाला तोडल्याशिवाय माझे काम होणार नाही.”
“आंब्यासारखंच माझं पण ऐक जरा. तुला आम्ही अडचण ठरत आहोत? यापूर्वी तर आम्ही कधी अडचण ठरलो नव्हतो. दुपारच्या वेळेत माझ्या शांत सावलीत कित्येक वेळा तू झोपला आहेत. तू आणि तुझे मित्र माझ्या फांद्यावर, पारंब्यांवर कितीतरी वेळा खेळला आहात. तेव्हा मात्र आमची अडचण नव्हती.”
...
“आम्ही तुम्हाला सावली देतो, फळे देतो, फुले देतो!”
“आम्ही जमिनीची धूप थांबवतो, तुमच्या पिकांना पानांचे खत पुरवतो.”
“आम्ही वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजनचे प्रमाण वाढवतो.”
“आम्ही प्रदूषणदेखील कमी करतो.”
“अन्न–वस्त्र -निवारा पुरवतो आणि तरीही आम्ही अडचण ठरतो?”
...
“ये हर्ष. पुढे ये आणि नष्ट करून टाक या संपूर्ण पृथ्वीतलावरची अडचण! तोडून टाक आम्हाला!”
“सॉरी सॉरी! मी चुकलो, खेळाच्या नादात मी विसरून गेलो की राजू, संजू प्रमाणेच तुम्ही देखील
माझे मित्रच आहात. मी तुमच्यासोबत देखील खेळू शकतो. इतकेच नाही तर माझी बॅट आणि स्टंप ही देखील
तुमचीच देणगी आहे!
मी यापुढे कधीही झाडे तोडणार नाही. उलट आता मी आणखी झाडे लावून माझे ‘सवंगडी’ वाढवण्याचा प्रयत्न करेन!”
“राजू, संजू अरे कुठे आहात तुम्ही तुम्हाला माझे जुनेच मित्र दाखवतो... नव्याने!”