गोधडीत लोळत पडणे कितपत योग्य?
गोधडीत लोळत पडणे कितपत योग्य?
*गोधडीत लोळत पडणे कितपत योग्य???*
आपलेच पूर्वज रात्री लवकर झोपून ,पहाटे लवकर उठत असत. दिवसभर कष्टाची काम करून थकत असत आणि रात्री लवकर झोपून जात. पहाटे लवकर उठून परत कामाला जायची लगबग चालूच असायची. आपल्या ह्या पूर्वजांचे जीवनमान खूप वेगळे होते.
कष्टाची काम केल्यामुळे आपोआप व्यायाम घडत असत. ओझी उचलण,पायी चालत जाणं, शेतातील कष्टाची काम करणं इत्यादी कामामुळे माणसांचे व्यायाम घडत असत. आणि त्या व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहत असत. वेगळा व्यायाम करायची त्यांना काही गरज नव्हती. या व्यायामामुळे कोणतेही आजार होत नव्हते. आणि होत असतील तरी माणसाला ते कळत नव्हते. कारण हे आजार पूर्वीपासूनच आहेत पण ते समजायला त्यांना अवधी लागत होता आणि माणूस कधी दगावला तरी कळत नव्हते.
पण हल्ली माणसाची जगण्याची पद्धत खूप निराळी झाली आहे. विविध तंत्रज्ञानाच्या शोधाने माणूस पुढे जात आहे. पण पुढे जाताना कुठेतरी स्वतःच्या शरीराकडे,स्वतःच्या शरीराच्या मेंटेनन्स कडे दुर्लक्ष होत आहे. बहुतेक आयटी क्षेत्रात काम सर्व असल्यामुळे त्यांना अजिबात वेळ मिळत नाही.
या मुलांना खूप कामे असतात. 12,14 तास ही मुले काम करतात. तरी या मुलांना व्यायाम करायला कधी वेळ मिळणार. घरातला चौरस आहार खावा म्हटलं तर त्यांना वेळ नाही. मग काय कोणीतरी एक बाई काम करून जाते आणि मग तेच अन्नपदार्थ त्यांना खावे लागतात. बऱ्याचदा बर्गर,पिझ्झा हॉटेलिंग हे चालूच असते. जे नको ते पदार्थ आवडीचे होऊन जातात. मग काय बीपी, डायबेटीस, मानसिक आजार मुलांना होतात. या आजारांना ते कधी बळी पडतात हे सुद्धा समजत नाही.
दिवसभर काम करून थकायचं रात्री व्हाट्सऍप, इंस्टाग्राम, फेसबुक या माध्यमातून तंत्रयुगात रमायचं. अशावेळी घरातल्या मुलांकडे,कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. स्वतःची चिडचिड होते. कुटुंबाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष होते. मग काय आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा सर्व कुटुंबाला घेऊन एक छान ट्रिप करायची. त्यांच्यामध्ये रमायचे. इतकेच हा मुलगा किंवा मुलगी करू शकते. कारण त्यांना नोकरीचे टेन्शन अफाट असते.
पण ही मुलं रात्रभर जागतात सकाळी बारा एक पर्यंत झोपतात अंथरुणात, गोधडीत अक्षरशः ही लोळत असतात.
कारण त्यांना आराम पण तेवढाच हवा असतो.
पण या सर्व मुलांनी स्वतःला एक शिस्त लावून घ्यावी. जाग आल्यावर उठावे किमान जॉगिंगला जावे. थोडेसे स्ट्रेचिंगचे व्यायाम करावेत. दिवसभरातनं घरचं जेवण एकदा तरी जेवावं. आणि ते चौरसाहारयुक्त असावे. कुटुंब,आपली मुले यांच्यासाठी थोड्या वेळ राखून ठेवावा. घरी आल्यानंतर मोबाईल कडे थोडेसे दुर्लक्ष करावे. हा नियम नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी लागू आहे. हल्ली मोबाईल युक्त युग झालेल आहे. अगदी एक वर्षाच्या बाळापासून ते 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत मोबाईल मुलांना,वृद्धांना हातात लागतो. अनेक चांगल्या गोष्टी त्यावर शिकता येतात. पण वाईट गोष्टी पण तेवढ्याच आहेत.परंतु मोबाईलच्या जास्त आहारी मात्र जाऊ नये. मुलांना मैदानी खेळ खेळायला सांगावे. त्या मैदानी खेळांची ओळख आपणच करून द्यायला लागते. मुलांना या खेळांची नावे सुद्धा माहित नाहीत. मुलांबरोबर आपणही खेळले तर आपलाही तेवढाच व्यायाम होतो. या सर्वांमुळे किमान स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष राहील. डॉक्टरांकडे जाणे कमी होईल. आणि जीवनाची पुढील वर्ष सुखात जातील.
तर आजच्या या युगात व्यायाम करून, चौरस आहार घेऊन तंदुरुस्त रहावे. आजाराला दूर लोटावे. पहाटे जाग येता क्षणी उठून व्यायाम करावा. गोधडीत लोळत राहू नये. असे मनापासून मला वाटते.
जीवन जगण्याची ही गुरुकिल्ली आहे त्या किल्लीचा वापर करून जीवन आरामात जगावे. 'HEALTH IS WEALTH' ही इंग्लिश म्हण आहे. चांगले आरोग्य ही आपली संपत्तीच आहे.
म्हणजे वृद्धत्व आल्यानंतर कोणावरही अवलंबून रहायला नको. शेवट आपला कसा आहे हे माहीत नाही. जे आपल्या हातात आहे ते कायम करावे. शेवटी देव ठेवेल तसे रहावेच लागते. पण 'प्रयत्नांती परमेश्वर 'असे म्हणून आपण आपले जीवन सुखमय जगूया!
वसुधा वैभव नाईक
धनकवडी,जिल्हा- पुणे
मो. नं. 9823582116
