गनिमत
गनिमत


"माह्या चिमन्यांनो इकडं या! म्या आत्ता गावात जातू अन तुमच्या मायकडून आपल्या समद्याली भाकरी घिऊन येतू.तुमी दोघांनी अजीबात हिकडं तिकडं हिंडू नका बगा.इथं रानातली जनावरं हिंडतात झाक पडायच्या येळेला!आपल्या म्हशी बैलांकड लक्ष राहू द्या.इथं कोट्यातच बसून रहा!कोट्यातून पाय बाहेर टाकू नगा.म्या असं गेलु अन असं आलू! तवर तुमी लेकरांनी इथं निगराणी करा!"असं म्हणत रावसाने लेकरांपासून निरोप घेत गावाची वाट धरली.रावसाहेबाचं शेत गावाबाहेर माळरानावर होतं.डोंगर भागाने वेढलेलं रावसाहेबाचं गाव! पोटाला दोन लेकरं अन जिवाभावाची बायको असा एवढाच त्याचा प्रपंचा! लेकरं अन गुरं घेऊन रावसाहेब शेतातच रहात असे जागलीला! दोन्ही लेकरं पण गुणाची!थोरला जालिंदर अन धाकटा प्रताप! दोघे बापासोबत गुरं घेऊन रानमाळावर हिंडत,खेळत अन बापासोबत गुरं सांभाळत! आज रोजच्या सारखं रावसा रात्रीच्या भाकरी आणायला गावात गेला होता.लेकरांना समजावून त्यानं घर गाठलं अन बायकोनं बनवलेली शिदोरी घेऊन त्यानं किराणा दुकानाचा रस्ता धरला .दुकानातून त्यानं लेकरांसाठी आज बिस्कीट अन गोळ्या घेतल्या होत्या. लेकरांकडे येता येता रावसा गालात हसत मनात विचार करत होता."आज लेकरं लई खूस होतील बबा!बापानं आणलेलं लई आवडीनं खातील!धाकल्याला म्या माह्या हातानं चारतु आज!पोरगा मायचं नाव बी घेत नाई म्हयापुढं.बापाची कसली मया करतंय. घरी थांब म्हणलं तरी माह्या मागं येतंय.आज जरा त्याची गंमतच करतो!" मनाशीच बोलत बोलत रावसा कोट्यापाशी आला!
इकडे तिकडे पाहिलं,पण अंधार खूप पडला होता आज येता येता! रावसाने लेकरांचा कानोसा घेतला पण लेकरं काही दिसत नव्हती .गुरं पण आज रावसाची चाहूल लागली तरी गप्प बसली होती.रावसाच्या काळजाने जरा धीर सोडला !रोज बापाची चाहूल लागली की आबा,आबा करत पोटाला कवटाळणारी लेकरं आज कशी दिसेनात म्हणून रावसाचा जीव थबकला! त्यानं हातातली पिशवी तिथेच खाली टाकली अन दबक्या पावलाने बाजूला पडलेली काठी हातात उचलली. एखादं रानटी जनावर तर नाही न......उगीच रावसाच्या जीवाला भयंकर घोर लागला तसा रावसा घाम पुसत पुढे सरकला.अचानक कसली तरी चाहूल लागल्यागत झाली.समोरच्या उंचवट्यावर काहीतरी लपल्याची भनक रावसाच्या मनाला लागली.काहीतरी गडबड झाली म्हणून हातातली काठी रावसाने खाली टाकली अन एक न झेपावा असा दगड रावसाने ताकदीनिशी उचलला. रावसा दबक्या पावलाने जीव मुठीत कसला, दगडात आवळून पुढे सरसावला.काहीतरी वंगाळ घडलं की काय म्हनून रावसाचा जीव घाबरायला लागला,डोकं काम करेनासे झाले होते.दगड तसाच हातात घेत परत रावसाने पाऊल पुढे टाकले.परत काहीतरी वळवळ केल्यासारखे जाणवले!काहीतरी नक्कीच इथं लपून बसलंय याची खात्री रावसाला झाली होती.एखादं श्वापद तर नाही न...आपल्या लेकरांचा यानं घात तर....ना ना विचार त्या अल्प सेकंदात रावसाच्या डोक्यात येऊ लागले.छाती जड झाली होती रावसाची! तो अजून दबकत पुढे सरसावला...सरसावला तसाच परत चुळबुळ झाल्याची भनक रावसाला झाली ...काहीतरी नक्की आहे..यानेच तर आपल्या लेकरांचं काही...असा विचार करतच जोरात ओरडत रावसाने तो दगड पुऱ्या भीमताकदीने त्या दिशेने फेकला ! फेकताच एकच ओरड कानावर आली..."आबाव!" अन लेकरं भाम्बवून उठून उभी राहिली अन त्यांनी जोराने आ वासला!लेकरं कालवा करू लागली,जोराने टाहो फोडून रडू लागली! जालिंदर इव्हळतच ओरडला,"आबा!आमी हाऊत!"तोच रावसा गळून खाली बसला ! "आरं देवा!ह्य काय झालं होतं माह्या हातानं!माह्याच हातानं म्या....."असं म्हणत कपाळावर हाथ मारत रावसा हंबरडा फोडून रडू लागला.गुरं पण धन्याचा आक्रोश ऐकून हंबरडा फोडू लागली!सारं माळ रान अचम्बा करत अंधार सारून काय घडलं म्हनून पाहू लागलं!लेकरं तशी बापाला जाऊन चिटकली!"आबा आत लई गरमाय लागलं मनुन आमी बाहीर झोपलु होतु.!"प्रताप रडतच म्हणाला.रावसानं दोघा लेकरांना घेत त्यांचे मुके घेतले."लई बेकार झालं असतं वासरानो आज!लई बेकार झालं असतं!"रावसा पुटपुटला.रावसाने डोळे पुसत आपण टाकलेल्या दगडाकडे पाहिलं.दगड निमूटपणे एका बाजूला जाऊन पडला होता.नेमका धाकटा प्रताप झोपला होता त्याच्या अगदी थोडसं बाजूला जाऊन! गनिमत झाली म्हणायची आज!