एक सुंदर निसर्गानंद
एक सुंदर निसर्गानंद


श्रावण महिन्याचे दिवस होते ते. पावसाने तांडव रूप सोडून रिमझीम स्वरूप घेतलं होतं. अवघ्या सृष्टीवर मनमोहक, हिरव्यागार निसर्गाची दुलई पांघरलेली दिसत होती. अशा वातावरणात घरी बसणं अशक्य होतं. आम्ही तिघा मित्रांनी पत्नीसह वर्तमान माळशेज घाटात जाण्याचं ठरवलं. कल्याणहून एस टी पकडून आम्ही माळशेजला पोहोचलो. माळशेजला पावसाळ्यात जाण्याची मजा काही औरच असते हे एक आणि माळढोक पाहण्याचा आनंद घेणं हे दुसरं अशी दोन कारणं होती तिथे जाण्याची. परंतू पोहोचल्यापासून कमनशीबाने आमच्या उधाण आणि उतावीळ मनावर खो घालायला सुरवात केली. त्या दिवशी सकाळपासूनच उन्ह पडलं होतं. आणि माळशेजला उतरलो तेव्हा तर कडकडीत रखरखीत ऊन पसरलेले होते. कोणता ऋतु सुरू आहे तेच कळेना. सगळ्या प्रकारे वैतागून झालं. अगदी परत घरी जाऊया इथपर्यंत वैतागाची गाडी आली. मग ठरवलं आता इतकं आलो आहोत तर राहूया आजची रात्र.
दुपारचं जेवण आटोपून जरा पेंगुळलो. जाग आली तेव्हा सूर्य मावळला होता. विजा आणि पावसाचं धुमशान सुरू झालं होतं. निसर्गाचं सकाळचं रूप पूर्ण पुसलं जाऊन सारीकडे मस्त थंडावा दाटून राहिला होता. रिसॉर्टच्या व्हरांड्यात आरामात बसून आम्ही पावसाचा मनसोक्त आनंद घेत होतो. दुसऱ्या दिवशी लवकर उठून निसर्गानंद घ्यायला बाहेर पडायचं हे पक्कं ठरवून ब्लँकेट पांघरून सगळे गुडुप झोपून गेलो. रात्रभर पाऊस पडतच होता.
अचानक मला जाग आली तेव्हा पहाटेचे साडेपाच पावणेसहा झाले होते. मी सगळ्यांना उठवायला सुरवात केली. परंतू कुणीही उठण्याचं चिन्ह दिसेना. शेवटी मी माझ्या प्रियाला उठवलच. म्हटलं ' अगं बाहेर बघ किती सुंदर वातावरण झालंय आणि काय झोपतेस , चल बाहेर जाऊया '. आता ती ही झोपेतून सावरली आणि आम्ही दोघं छत्र्या घेऊन बाहेर पडलो. पावसाची रिपरिप सुरू होती. बाहेर पहाटेचं स्वच्छ हिरवागार वातावरण पसरलं होतं. चहाची इच्छा असूनही तिकडे दुर्लक्ष करून आम्ही मोकळ्यावर आलो अणि चालायला सुरवात केली. पुढे आलो तर दरीतून दाट धुक्याचे ढग वर येत होते. पुढे जाता जाता सहजच मागे वळून पाहिलं तर धुक्याच्या दाट चादरीने मागचं दृश्य बंदिस्त करून टाकलं होतं. आणि अगदी पुढच्याच क्षणी धुकं पूर्णपणे नाहीसं होऊन सारा परिसर हिरव्यागार रूपाने न्हाऊन निघाला. धुक्याने अडवलेलं अगदी लांबचं दृष्यही स्वच्छ दिसू लागलं. आम्ही दोघंही निसर्गाच्या या विलोभनीय जादुई रूपाने अक्षरशः वेडे झालो. मन उचंबळून यायला लागलं. कानात उधाण वारं शिरल्यासारखं सारीकडे धावत सुटावं असं वाटू लागलं. सृष्टीच्या रंगमंचावरील या निसर्ग नटसम्राटाच्या विविध रूपाने आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं होतं. हे कमी की काय म्हणून अचानक पांढरयाधोप माळढोक पक्ष्यांचा थवा समोरच्या बाजूने आकाशात झेपावला. सहस्र नेत्र इंद्राचा त्याक्षणी आम्हाला खूप हेवा वाटला. दोन डोळ्यांनी काय काय म्हणून पहायचं तेच कळेना.
आणि निमिषार्धात निसर्गाचं ते विश्र्वरुप मावळलं. धुकं विरळलं , पक्षी तळ्याकाठी विसावले. आमचं उधाणलेलं मन काही ताळ्यावर यायला तयार नव्हतं. डोळे घट्ट मिटून आम्ही त्या अलौकीक सृष्टी सौंदर्याची उजळणी करत होतो. हे वर्णन शब्दात करणं खरंच कठीण होतं. पण आम्ही त्याची अनुभूती मात्र आकंठ घेतली होती.
आमच्या माळशेजला येण्याचं सार्थक झालं होतं. हा निसर्गानंद मित्रांनी मात्र गमावला होता.