एक प्रसंग असाही
एक प्रसंग असाही
पश्चिम दिशेला सूर्य मावळत चालला होता. त्या दिशेला लाल रंगाच्या छटा पसरलेल्या होत्या. दाट जंगलामधून वाट शोधत सदाबा पुढे चालला होता त्याला त्याची हरवलेली म्हैस सापडत नव्हती. सगळे पक्षी घरट्याकडे परतत होते. त्यांच्या पंखात अजब बळ आलं होतं, अजब स्फूर्ती साकारली होती. सदाबा घाईघाईने पावले उचलत होता. तो जिथून चालत होता तिथून नदी जवळच होती. ओलावा जाणवत होता वातावरण गार होतं. हवेचा गारवा अंगाला झोंबत होता. अंगाला हवेचा स्पर्श होताच पूर्ण शरीरभर शहारे उभा राहत होते. हिरवंगार गवत दाट दाट होत चाललं होतं. त्याच्यातून किर्रकिर्र... असा भेडसावणारा आवाज येत होता.
सदाबाला याचं काहीच देणं घेणं नव्हतं. त्याची लाडकी म्हैस राणी त्याला सापडत नव्हती. अगदी स्वतःच्या लेकीप्रमाणे त्याने तिला जीव लावला होता इतकंच नाही तर तिला चारा घातल्याशिवाय स्वतः अन्नाचा कणही खात नव्हता. तिला रोजच्या रोज धुवून, तिला स्वच्छ ठेवणं, तिला चरायला घेऊन जाण आणि तिझ्यासोबत मनसोक्त गप्पा मरण ही त्याची नित्याची काम. सकाळची न्याहारी उरकली की निघालाच तिला घेऊन जंगलाकडं. हिरवंगार लुसलुशीत गवत खायला घालायचा तिला. राणीचाही मालकावर जीव त्याच्याशिवाय तिला हातही लावू द्यायची नाही कोणाला. सदाबा दिसला रे दिसला की ती हंबरडा फोडायला सुरुवात करायची. खूप जिव्हाळा दोघांमध्ये.
