Jyoti gosavi

Others

4.8  

Jyoti gosavi

Others

द्रौपदी

द्रौपदी

5 mins
643


पुस्तकाचे नाव -पांचाली

मूळ लेखिका - श्रीमती शची मिश्र

अनुवाद - डॉक्टर सुशीला दुबे

प्रथमावृत्ती जानेवारी 2018


द्रौपदीबद्दल एका वेगळ्या पैलूनी या पुस्तकांत पाहिले आहे. द्रौपदीचा एक स्त्री म्हणून यामध्ये विचार केला गेलेला आहे. हे पुस्तक वाचताना मला पदोपदी जाणवले की अरे! या दृष्टिकोनातून आपण कधी द्रोपदी कडे पाहिलेच नाही.

"अहिल्या सीता तारा द्रौपदी मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम्"

यापैकी मंदोदरी सोडता बाकीच्या सर्व स्त्रियांवरती अन्याय झालेला आहे आणि मंदोदरीला देखील रावणासारख्या स्त्रीलंपट पतीबरोबर आयुष्य काढावे लागले.

खरोखर पाचांची पत्नी बनताना, तिच्या मनात काय भावना असतील कदाचित ती शरीराने एकरूप झाली असेलही पण तिच्या मनाचे काय? तिच्या लग्नातला "पण" अर्जुनाने जिंकलेला होता त्यामुळे प्रथम दृष्टीने तिने त्यालाच पती मानले असणार , पण तिला पाचांची भोग्या बनावे लागले . असं कपडे बदलल्या सारखं प्रत्येक पतीबरोबर तिला मनाने समरस होता आले असेल का? या साऱ्या गोष्टींचा परामर्श या पुस्तकांमध्ये घेतलाय.


जन्मापासून ती एक "वेगळी स्त्री" होती योनी संभवा न होता, यज्ञवेदीतून निर्माण झाली होती. तिला बालपण आणि त्याबरोबर होणारे संस्कार या गोष्टी माहीतच नसल्यामुळे प्रत्येक गोष्ट समजून घेताना ती कशी गोंधळली असेल? गडबडली असेल? याचे वर्णन यात आहे. तिला प्रत्येकाने आपल्या स्वार्थासाठी वापरले मातेने देखील आपल्या पतीचा अपमान करणाऱ्या कुळाचा नाश करणारी कन्या म्हणूनच तिला मागितले होते. तिचे सावळे सौंदर्य कुरळे कुंतल आणि अंगी चा सुवास यामुळे तिला सगळीकडे वेगळेपणाची वागणूक मिळाली एका सामान्य स्त्रीचे दुःख तिलाही असतील असा कोणी विचार केला नाही.


कुंतीने आपल्या स्वार्थापोटी पाच मुलांची एकी अबाधित राहावी म्हणून तिला भिक्षेप्रमाणे वाटून घेण्यास सांगितले आणि युधिष्ठिराने देखील मातेचा शब्द प्रमाण मानून पाचांशी लग्न करायला भाग पाडले. द्रौपदीच्या सौंदर्यामुळे भावाभावात भांडणे होऊ नयेत हा एक हेतू कुंतीचा होता. पण वडिलांनी देखील आपण पांडवांपुढे

दुर्बल आहोत हा विचार करून या बाबतीमध्ये दुर्लक्ष केले आणि पाच पतींशी लग्न लावून दिले.


आयुष्यात द्रौपदी दोनदा पणाला लागली एकदा बापाने स्वयंवरासाठी आणि दुसऱ्यांदा नवर्‍याने जुगारात पणाला लावली. द्रौपदी शिवाय प्रत्येक पांडवांना आपापली वेगळी पत्नी होती व स्वतःची खाजगी पत्नी युधिष्ठिराने पणाला का लावली नाही? असे अनेक प्रश्न यातून उद्भभवले आहेत. सुरवातीच्या काळात प्रत्येक पतीची "मर्जी" राखताना त्यांच्या आवडीप्रमाणे कपड्या पासून ते जेवणापर्यंत सर्व गोष्टी सांभाळताना द्रौपदीची त्रेधातिरपट उडत होती. उदाहरणार्थ युधिष्ठिराला सारीपाट खेळण्यासाठी, भीमाला व्यायामानंतर अल्पोपहाराच्या वेळी, अर्जुनाला विश्रांतीनंतर वार्तालाप करण्यासाठी, त्याच वेळी नकुलाला अश्वारोहण करण्यासाठी, आणि सहदेवाला आपले ज्ञान देण्यासाठी द्रौपदी पाहिजे असायची. त्यांची कितीही मर्जी राखली तरी ते तिच्या निष्ठेवर शंका घेत असत. यातून तिची सुटका नारदमुनींनी केली आणि प्रत्येकाला एक वर्षे वाटून दिले पण द्रौपदीच्या स्वतःच्या खाजगी आयुष्यासाठी मात्र कोणताही कालावधी शिल्लक ठेवला नव्हता.


कौरव दुष्ट आहेत त्यांचा द्रौपदी वर राग आहे तिची अभिलाषा आहे ,हे माहित असताना देखील हस्तिनापूरला जाताना ते द्रौपदीला बरोबर घेऊन गेले. आपल्या वैयक्तिक खाजगी स्त्रिया मात्र त्यांनी सुरक्षित ठेवल्या. बाकी सारे महाभारत आपण जसे वाचतो तसेच ते लिहिलेले आहे पण जेव्हा तिला प्रत्येक पतीपासून एकेक मूल होते तेव्हा तिची अवस्था यात वर्णन केलेली आहे. छातीत एकाच्या मुलाचे दूध, पोटात दुसऱ्याचे बाळ ,आणि तिसऱ्याच्या शय्येवरती ती चढत होती. इथे मला लेखीके कडून थोडीशी अतिशयोक्ती वाटते. कारण ते बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात असताना पांडव आणि द्रौपदी बरोबर संग केलाच नसेल का? आणि जर केला तर तेव्हा मुले झाली नाही याचा अर्थ तेव्हा ते संततीप्रतिबंधक वापरत असतील. तेव्हा तिच्याजवळ जातही नसतील .पण मग एकदा एकाचे मूल पोटात असताना ते पूर्ण होईपर्यंत दुसरा पांडव तिच्याजवळ कसा जात असेल? कदाचित जातही नसेल, कारण त्यांना स्वतःच्या अशा राण्या होत्या.


पांडवांचे राज्य गेल्यानंतर प्रत्येकाच्या बायका आपल्या माहेरी गेल्या पण तिला मात्र वनवासात जावे लागले. तिच्या मुलांना पितृ सुख मिळाले नाही आणि तिला अपत्यसुख मिळाले नाही. ती सारी मुले तिने एकटीने वाढवली जेव्हा दुसऱ्या पांडवाचा नंबर असेल तेव्हा ती पहिल्या मुलांसहीत त्यांच्या महालात राहत होती तेव्हा दुसऱ्या पांडवाला तिथे प्रवेश नव्हता. त्यामुळे साहजिकच त्या मुलांना पित्याचे प्रेम मिळत नसेल शिवाय इतर बायकांपासून झालेल्या मुलांचे ते लाड करत असतील.

ही मुलं मात्र द्रौपदीची मुलं म्हणून त्यांची ओळख होती आणि वनवासाच्या काळात तिने मुले माहेरी ठेवली. तेव्हा सर्वात लहान चार पाच वर्षाचा होता. त्यानंतर ते युद्धात मारले गेले त्यामुळे द्रौपदीला अपत्य सुख असे भोगता आले नाही. उलट युद्धानंतर तिला सवतीं कडून शिव्या शापच मिळाले, कारण युद्ध द्रोपदी वरील अन्यायाचा बदला घेण्यासाठी झाले होते त्यात त्यांची मुले मारली गेली.


कृष्णाचं आणि तिचं नातं मोठ्या सुंदर रीतीने यात उघडलेल आहे. कृष्णाला पाहण्याच्या आधीपासूनच ती त्याच्या प्रेमात होती. त्याची पत्नी बनण्याचे स्वप्न बघत होती तिच्या वडिलांनी देखील कृष्णाला तसेच सुचवले होते. परंतु कृष्णाने पहिल्या भेटीतच तिला सखी बनवले .आपल्या मनातील सगळी सुखे दुःखे ती त्याला सांगत होती कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष कधी मनातल्या मनात. त्याने निव्वळ डोक्यावर हात जरी ठेवला तरी ती मनातून शांत होत होती. कारण कोणत्याच पतीचे तिच्याशी भावनिक नाते नव्हते. द्रौपदी सारखी त्रेलोक्य सुंदरी मिळून सुद्धा त्यांनी आपापले संसार थाटले होते .पण कृष्णाशी मात्र तिची भावनिक जवळीक होती. वस्त्रहरणाच्या प्रसंगी देखील कृष्णच मदतीला आला होता. तेव्हा पाच पराक्रमी पती खाली मान घालून बसले होते .द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कृष्णानेच वरील युद्ध घडवून आणले. कृष्णशिष्टाई करून देखील द्रौपदीची मनीषा पूर्ण केली त्या युद्धात द्रौपदीची अपरिमित हानी झाली. तिचा पिता पुत्र भाऊ सारे सारे मारले गेले त्या प्रत्येकी जवळ आपला पती होता पण ती मात्र एकटीच होती तिला व्यथा दुःख सांगायला देखील कृष्णाशिवाय कोणी नव्हतं


शेवटी जेव्हा त्यांच्या महानिर्वाणची गोष्ट येते, त्याआधी कृष्णाचा मृत्यू झालेला असतो. अर्जुन सुभद्रेजवळ जाऊन तिची समजूत काढत राहतो. सर्वांची सहानभूती सुभद्रेला मिळते परंतु द्रौपदीचे सांत्वन करण्यासाठी कोणीही जात नाही. याउलट वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीची कृष्णा वरून देखील टिंगल-टवाळी होते. ही पाचांची पत्नी असूनदेखील तिला कृष्ण नावाचा सखा आहे. कृष्णाच्या निर्वाणानंतर द्रौपदी जगण्याविषयी निरिच्छ होते व पांडवांबरोबर महानिर्वाणाला हिमालयात जाण्यासाठी निघते. जेव्हा रस्त्यात द्रौपदी पडते तेव्हा भीम तिच्यासाठी थबकतो व तिला सहारा द्यायला पुढे जातो तेव्हा युधिष्ठिर भीमाला हाताला धरून पुढे नेतो. भीम विचारतो ही का पडली ती तर सती होती

त्यावर युधिष्ठिर आयुष्यभराची मनातील खदखद बाहेर काढतो आणि तिच्यावर शेवटचा घाव घालतो. भीमाला सांगतो आमच्या पाचपैकी तिने एकावर जास्त प्रेम केले तो म्हणजे "अर्जुन".


युधिष्ठिराचा स्वार्थी स्वभाव, इतर पांडवांचा नको इतका आज्ञाधारकपणा, भीष्म आणि द्रोण यासारखे महापुरुष कर्तव्यापोटी चुकीच्या पायी निष्ठा वाहतात. यज्ञातून जन्मलेली याज्ञसेनी आयुष्यभर जळतच राहते. तेरा वर्षे पांडवांची युद्धाबाबतची बदल्याची भावना फडकावत राहते आणि तरीदेखील युद्धानंतरही रिक्तच असते आणि शेवटी कृष्णाच्या चरणी विलीन होते. एकंदरीत या पुस्तकात द्रोपदीबद्दल वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेले आहे तो दृष्टीकोन मला भावला.


Rate this content
Log in