दिवस कट्टी बट्टी चे
दिवस कट्टी बट्टी चे
आई झोपली आणि हळूच मागच्या दरवाजाची कडी काढून मेघा घराबाहेर पडली. अगदी चोरपावलांनी हं.आई दुपारी उन्हाचं खेळायला जाऊ द्यायची नाही ना!
दोन आळी समोरच्या चाळीतल्या त्या मैत्रिणी कशा दिवसभर खेळायच्या. त्यांच्या आया पण काही म्हणायच्या नाही कारण त्या पण अगदी दिवसभर मेळ जमवून गप्पा छाटायच्या ना! इकडे मेघाची आई मात्र मे महिन्याचे उन भारी असते म्हणून तिला दुपारी बाहेर खेळायला मज्जाव करायची.कित्ती राग यायचा मेघाला मग आईचा!
आज हे सगळं आठवलं अन् मेघाला हसू आलं. आईचं तिची काळजी घेणं तिला किती नकोसं व्हायचं न तेव्हा? आता मात्र आई झाल्यावर आईची काळजी कळत होती.
पण ते दिवसच भारी होते ना बालपणाचे. रम्य ते बालपण म्हणतात ते काही उगीच नाही हो!
ती हळूच बाहेर पडायची आणि मैत्रिणी सोबत जाऊन खेळायची. किती मजा यायची! ती चाळ तिच्या मैत्रिणीच्या वडिलांच्या मालकीची. त्या समोर ते भव्य पटांगण . त्या ग्राउंड च्या दोन टोकांना वसलेली दोन नगरे आणि उरलेल्या दोन टोकांना दोन शाळा. त्या चाळीच्या मागच्या बाजूला असलेले मोठे अंगण म्हणजे त्यांचा खेळायचा अड्डा. त्या अंगणात असलेली पेरू,आंबा,लिंबू आदींची झाडं म्हणजे त्यांचा विसावा.
तिची मैत्रीण शीला, बाजूची मोहिनी, रंजू,श्वेता,राणी ह्या चाळीतल्या मैत्रिणी !सोबतीला अजून बाल्या ,पक्या,विकी हे पोरं सुद्धा ! मस्त खेळ रंगायचा मग लपाछपी चा! अगदी जिथे जागा असेल तिथे लपायचं .राज्य देणाऱ्याची मात्र शोधता शोधता पुरेवाट व्हायची.हिवाळ्यात अड्डा मग पेरूच्या झाडावरच! झाडावर अगदी बंदरे शोभवित तसे झाड मेघा आणि तिच्या सवांगड्यांनी भरलेले असायचे.
संध्याकाळी ग्राउंड होतेच की मैदानी खेळ खेळायला...! शाळेत मात्र मैत्रिणी बदलायच्या कारण सगळ्यांचे वर्ग वेगवेगळे ना! शीला मात्र तिची अगदी बालपणापासून बारावी पर्यंत सोबत असलेली मैत्रीण!
शीला सोडली तर मेघा चं मन मात्र मोहल्ला मैत्रिणीं पेक्षा शाळेच्या मैत्रिणी मध्ये जास्त रमायचं. शीला सोबतच शबाना,माधवी,उरूची,अबोली, नागश्री,रेखा,प्रणिता,त्रिवेणी, स्वप्ना,गीता ,दुर्गा अशा कितीतरी मैत्रिणी होत्या की तिला. मधल्या सुटीत त्यांच्या सोबत मस्त धमाल चालायची. शाळेचे कार्यक्रम त्यात असलेला त्यांचा सहभाग.शाळेच्या नाटकात त्यांनी अगदी लहानपणी केलेल्या भूमिका. सगळे अगदी मस्त अन् आनंददायी असलेले. सुवर्ण काळ च जणू आयुष्याचा!
अगदीच लहान वय ते! तेव्हाचा काळही वेगळाच!एकदा अबोली आणि गीता या दोघी मैत्रिणींनी घरी चलायचा खूप आग्रह केला मेघा आणि शीला ला.या पठ्ठ्या त्यांच्यासोबत गेल्या पण! घरी मात्र शोधाशोध आणि घाबरगुंडी साऱ्यांची.
मैत्रिणीच्या बाबांनी मात्र त्यांचे वय जाणून घरी आणून दिले आणि घरच्यांचा जीव भांड्यात पडलेला. एकदा तर मेघाला श्रावणी ने लिमलेट ची गोळी जबरदस्ती ने खाऊ घातली अन् त्या गोळीपायी मेघाला मग जबरदस्ती शाळा बुडवावी लागलेली .घरी हे माहीत झालं तर किती ओरडा होईल हे माहीत असूनही तिने त्या दिवशी दुपार नंतर शाळा बुडवली.कारण शाळेत जायचं असेल तर माझी लीमलेट ची गोळी वापस कर असं ती म्हणाली ना तेव्हा.!! अन् मग झालेली फजिती. तेव्हा पासून तर तिने कानाला खडा लावत कुणीही दिलेला खाऊ नाकारणे च श्रेयस्कर समजले.
अजून एक आठवण आठवली अन् मेघा अगदी पोट भरभरून हसली. त्याचं काय झालं एका रविवारी या दोघी दुसऱ्या कॉलनी मधल्या मैत्रिणी कडे खेळायला गेलेल्या तिथे दोघी जणी संध्या आणि स्वप्ना राहायच्या आणि यांच्याच बरोबरीचा एक मुलगा पिंक्या पण. मग काय खेळ कोणता तर आई बाबा आणि बच्चे कंपनी ! ह्या काही जणी बच्चे कंपनी होत्या, एकटाच पोरगा असल्याने पिंक्या बाबा.आता आई कोण? मग काय? स्वप्ना म्हणे मी होणार पिंक्या ची बायको तर संध्या म्हणे मी आणि त्यावरूनच दोघींमध्ये जुंपलेली अन् मग कुठेतरी compromise होऊन खेळ सुरू झालेला. आज हे आठवून मेघा मात्र खळखळून हसलेली !
आता जर स्वप्ना आणि संध्या ला ही गोष्ट आठवत असेल तर आठवून आठवून काय मजा येत असेल नाही? याचा विचार करून पुन्हा हसली ती! पण काळाच्या ओघात दोघीही वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी गेलेल्या अन् तिथून कुठे कुणास ठाऊक? गोरी गोमटी, घाऱ्या डोळ्यांची मोना सुद्धा आठवली तिला. फोन वैगरे जास्त नसलेले ते दिवस त्यामुळे पुढे कोण कुठे गेले कळलेच नाही! पण स्वप्ना आणि संध्या च्या भांडणाचे कारण आठवून ती पुन्हा हसली... हसणारच ना! कारण बालपणीचे दिवस तसेच असतात अगदी आनंददायी. निरागस निष्पाप जीवन अगदी! मिनिटातच कट्टी अन् मिनिटातच दोस्ती. अगदी छोट्या छोट्या गोष्टी वरून रुसणे तर कधी क्षुल्लक गोष्टींवरून मनमुराद हसणे.
मैत्रिणी शेवटी मैत्रिणीच असतात. त्या कोणत्याही असोत पण बालपणीच्या मैत्रिणींचा बाज हा वेगळाच असतो. कारण जगण्याचे,बेगडीपणाचे,औपचारिकता आदी सगळ्या गोष्टींचे वलय तेव्हा आपल्या पासून कोसो दूर असते. असते ती फक्त मैत्री अन् निखळ मैत्री...! आज काही बाल मैत्रिणी मेघाच्या संपर्कात असलेल्या तर काहींचा अगदी काहीच पत्ता नसलेल्या! आभासी जगामुळे निदान त्यापैकी काही जणी एकमेकींच्या सोबत तरी असलेल्या. तिनेच नाही का पुढाकार घेऊन त्यांना जोडलेलं! कारण मैत्र असणं तर असतेच पण ते मैत्र जपणं सुद्धा गरजेचं आहे हे वयाच्या या टप्प्यावर तिला चांगलंच कळलं होतं अन् म्हणून मैत्रिणींचे मैत्र आठवत ती पुन्हा गेली होती कट्टी बट्टी च्या विश्वात.....!
