धाडसी तानी
धाडसी तानी
एका गावात एक तानी नावाची आईवडीलांना एकुलती एक मुलगी होती.त्यामुळे तिचा घरात खूप लाड होता.मुलासारखी धीट,धाडसी तानी लहाणपणापासूनच शेतातल्या विहीरीवर गावातल्या मुलींना सोबत घेऊन पोहायला जायची.तानीला खूप छान पोहता येत होतं.तानी पाण्यावर किमान पाच मिनिटे अधांतरी वर रहायची.पाण्यावर न हातपाय हलवता स्थिर झोपायची.इतकी कला तानीला आली होती.सर्वच मुलींना पोहता यावं असं तानीला मनोमन वाटायचं.पण गावातल्या बायका तानीसोबत त्यांच्या मुलींना पाठवायला भ्यायच्या.एक दिवस दोन मैत्रिणीसह तानी शेतातल्या विहीरीवर पोहायला गेली.पोहून झाल्यावर तानी विहीरीच्या बाजूला ऊस खात बसली होती.तानी म्हणजे कुणालाच न भिणारी मुलगी होती.तेवढ्यात एक बाई शेजारच्या वावरातली कडेवर हंडा घेऊन आली... विहीरीच्या पाय-या उतरून पाणी आणण्यासाठी आत गेली.तेवढ्यात त्या बाईचा पाय सटकला आणि दणकन ती बाई विहीरीत पडली.तानीला आवाज ऐकू येताच तानीने क्षणाचाही विलंब न करताच विहीरीत उडी घेतली.आणि त्या बाईचे प्राण वाचवले.गालात वा-यासारखी बातमी पसरली.तानीने एका बाईचा जीव वाचवला.गावक-यांनी तानीला शाबासकी दिली.व तिला सन्मानित केले.
तात्पर्य: पोहणे शिकल्यामुळे एखाद्याचा जीव वाचवला जाऊ शकतो.
