Dr.Smita Datar

Others

2.6  

Dr.Smita Datar

Others

देवा

देवा

4 mins
22.5K


   डोळ्याला पोथी लावून आजीने ती बाजूला ठेवली. भक्तिभावाने पोथीला नमस्कार केला.तिला लाल कापडात गुंडाळू लागली आणि तिच्या तोंडाचा पट्टा चालू झाला . “ चहा मिळेल का मला घोटभर ? “ स्वयंपाक घराकडे तोंड करून परत म्हणाली, “ सगळ्यांचा नट्टापट्टा , अभ्यंगस्नान झालं असेल तर या म्हातारीकडे बघेल का रे कुणी ? “

                     मनालीन घड्याळात बघितलं, बरोब्बर ९. रोजच ९ वाजता , ऐन ऑफिस ला निघायच्या घाईत , आईवर ही वाकसुमनांची मुक्त उधळण आजी करते , हे मनालीच्या लक्षात आलं होत. सध्या तिला बारावी च्या परीक्षेआधीची स्टडी लिव्ह चालू होती. एरवी या वेळी ती घरी असण्याचा कधी प्रसंगच आला नव्हता. त्यातून आता १७ व्या वर्षी , तिला नात्यातले ताणेबाणे नव्याने कळायला लागले होते.

                    आजीवर मनालीच जीवापाड प्रेम होत. आजीनेच तिचं आतापर्यंतच शाळा, क्लासेस, दिवसभराच खाण पिण , दुखणी बाणी ..सगळ संभाळल होत. मनाली ला आठवतंय तेव्हा पासून तिची आई ऑफिसला जायची. आई खूप पहाटे पासूनच अंथरुणावर नसायची. निघतानाच घामेजलेली, थकलेली असायची. आई प्रचंड धावपळीत असायची. जेवण. मनालीचा डबा, दुपारचा खाउ, आजीचं उपवासच ..असे अनेक जिन्नस आईने सकाळीच ओट्यावर ताजे करून झाकून ठेवलेले असायचे. आई निघताना मनालीचा एक खूप मोठासा , ओला पापा घ्यायची. मनाली रागाने तो पुसून टाकायची. राग असायचा आई आपल्याला सोडून ऑफिस ला जाते याचा, राग असायचा आई नव्या नव्या साड्या नेसते याचा..साड्या नव्या असतात ..असं अर्थात आजी म्हणायची. राग असायचा इतरांसारखी आई शाळेत सोडायला येत नाही याचा...हा सगळा राग आजीने पेरलेला असायचा. मनाली मोठी होत गेली . कुठेतरी आई ची धडपड मनापर्यंत पोहचायला लागली.

                 बाबाच्या जागी आजोबाच होते मनालीला. पण ते निमूट मूग गिळून बसलेले असायचे. मनालीवर प्रेम करायचे.पण जबाबदारी आजीच घ्यायची , त्यामुळे आजीच त्या घरातली कर्ती धर्ती होती.मनालीला प्रश्न पडायचा , ज्या देवाचं एवढ पोथ्या पुराण आजी वाचते, ज्या कृष्ण यशोदेच्या प्रेमाचे कढ आजीला येतात, त्या आजीला माझ्या आईच मन , तिची तडफड कळू नये ?

काय उपयोग त्या देव देव करण्याचा ? आज मनालीने देव्हारयाकडे एकटक बघत आईच्या बाजूने ठाम उभं राहण्याचा निर्णय घेतला.

                                                              २.

                     पाध्ये आजोबा चिखलात पाय घट्ट रुतवून नीट उभे राहिले. चिखलात खराब होऊ नये म्हणून लेंगा त्यांनी आधीच वर दुडून घेतलेला. छत्रीच्या वाकड्या मुठीने त्यांनी जास्वंदीची ती फांदी वाकवली. एकाच फांदीवर सात लालभडक जास्वंदी उमललेल्या. आजोबांना त्या सगळ्याच्या सगळ्या हव्या होत्या . आज चतुर्थी होती ना.. मुक्या कळ्या कालच गोळा करून ठेवलेल्या. घरी पितळीच्या भांड्यात त्याही टपोऱ्या झाल्या होत्या. आजोबांनी आकडेमोड केली. या सात, घरी फुललेल्या दहा ..झाल्या सतरा.. अजून सावंताच्या बागेतल्या चार जरी मिळाल्या तरी एकवीस जास्वंदीचा हार होईल गणपतीला. पावली मला संकष्टी.

                     मुलगा सोफ्ट वेयर इंजिनियर असलेले, निवृत्त पालिका कर्मचारी असलेले पाध्ये आजोबा रोज सकाळी अनेकांच्या बागेतली फुले , मालकांना न दिसण्याआधीच खुडून घेत. मुलगा , सून फुल्पुड्यांचा रतीब लावून दमले..पण आजोबाना अशीच फुलं गोळा करायची असत. निगुतीने बाग राखणाऱ्याला उमललेली फुलं बघण्याचा पण आनंद घेऊ न देण. हा किती मोठा गुन्हा आहे ? .कुठल्या देवाची सेवा करत होते आजोबा ?

                                                       ३.

                      घरातल्या गणपती समोर लखलखीत ताम्हणात पूजेची सगळी तयारी मांडली होती. भटजी खोळंबले होते. प्रदीप घाईघाईने सोवळे नेसून पाटावर बसला. सकाळी दहा वाजता सुद्धा पूजा करताना तो पेंगत होता. रात्रभर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तो रांगेत उभा होता. त्याच्या घरातल्या गणपतीची तयारी, आमंत्रण , धावपळ सगळ त्याच्या बायकोने दर वर्षीप्रमाणे ऑफिस सांभाळून केलं होत. प्रदीप ची आई चिडून म्हणाली सुद्धा “ बायकांनी मेलं मरमर मरायचं आणि यजमान म्हणून हे पाटावर बसणार ..गुळाचे गणपती . काही नाही, सरिता , आपण दोघी मिळून बसवू पुढल्या वर्षीपासून गणपती.”

                  प्रदीप मानभावी पणे म्हणाला,” अग, माझी पण अंधश्रद्धा वगैरे नाहीये, सहज आपलं मित्र निघतात म्हणून मी ही जातो. गेली दोन वर्ष जातोय लालबागला , म्हटलं या ही वर्षी जाऊ. “ पण गोम अशी होती की गेली दोन वर्ष प्रदीप चा बिझिनेस बरा चालला होता, म्हणजे तो नीट लक्ष देत होता. आणि गेली दोन वर्ष तो लालबाग ला जायला लागला होता. प्रदीप ने मनोमन क्रेडीट लालबाग च्या राजाला दिल होत. जुन्या वळणाच्या आईने म्हटलंच.”.अरे, आमच्या वेळी कुठे होते हे नवसाचे गणपती ? खर सांगू का प्रदीप, घरातला असो की देवळातला , गणपती मातीचाच असतो रे, माणसामुळे तो देव होतो. माणसाने कर्मयोग आचरणात आणावा. देव मनाची शक्ती वाढवण्यापुरता असावा. स्तोम माजवू नये त्याचं. स्वतः ची कर्तव्य करण म्हणजेच देवाची सेवा करण न..”

                 कॉलेज ला जाणारी देविका आजीच्या गळ्यातच पडली, वोव आज्जी...काय टोपिक दिलायास तू मला डिबेट ला..लव यू.. ठरलं डिबेट च नाव....”.कॉलिंग देवा.....”

                                               *****************************

                                                                                                  


Rate this content
Log in